सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना करातून मिळाले ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न !

सातारा, १ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीची मोहीम तीव्र केली होती. यामुळे मार्च मासाच्या शेवटी पाणीपट्टी ८७ टक्के, तर घरपट्टी करवसुली ८९ टक्के झाली. यातून ग्रामपंचायतींना अनुमाने ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामीण विकासकामांना याचा लाभ होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या वतीने नागरिकांना विविध सुविधा देण्यात येतात. यासाठी ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च मासाच्या शेवटी हा कर ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. यासाठी विशेष करवसुली मोहीम राबवून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते. काही नागरिक कर थकवतात. त्यामुळे जानेवारी मासापासून ही मोहीम तीव्र करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसर्‍या वर्षी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची पाणीपट्टी आणि घरपट्टी करवसुली चांगली झाली आहे.