गोव्यात गटविकास अधिकारी पदांसाठीच्या सूचीत आयआयटी पदवीधर, पीएच्.डी.धारक आदींचा समावेश

पणजी, ३० एप्रिल (वार्ता.) – गोवा सार्वजनिक सेवा आयोगाने गटविकास अधिकारी पदांसाठी निवडलेल्या सूचीत आयआयटी पदवीधर, पीएच्.डी.धारक, अभियंता आदींचा समावेश केला आहे.

आयोगाने मागील वर्षी नोव्हेंबर मासात गोवा सरकारच्या ‘पर्सनल डिपार्टमेंट’मध्ये १० गटविकास अधिकारी पदांसाठी विज्ञापन दिले होते. त्यानंतर या पदांसाठी एकूण ४ सहस्र अर्ज आले होते. पूर्व परीक्षांच्या आधारे अंतिम सूचीत ५४ उमेदवारांची निवड करण्यात आली. ही प्रक्रिया ३ दिवस चालली.

१० पदांपैकी ९ पदांसाठी ९ उमेदवारांची सूची आयोगाने अंतिम केली आहे, तर अन्य एक पद योग्य उमेदवाराविना रिक्त ठेवण्यात येणार आहे. निवडलेल्या सूचीमध्ये डॉक्टरेट ऑफ कॉमर्स, आयआयटी मद्रासमधील अभियंता, भूगर्भशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षणप्राप्त आदींचा समावेश आहे. आयोगाचे अध्यक्ष जोझ नोरोन्हा म्हणाले, ‘‘हल्लीच्या काळात विशेषतः कोरोना महामारीनंतर उच्चशिक्षित उमेदवार सरकारी पदांवर नोकरी करण्यासाठी इच्छुक झालेले आहेत. त्यांना कायमची नोकरी पाहिजे असते.’’