१ मे २०२३ या दिवशी ‘महाराष्ट्रदिन’ आहे. त्या निमित्ताने…
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले; मात्र त्या वेळी महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता ! भारत स्वतंत्र झाला, तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेश यांच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार १ मे १९६० या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१. महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली ?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्ये मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्या वेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक रहात होते. त्याच वेळी भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिक स्वत:च्या वेगळ्या राज्याची, तर मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून वर्ष १९६० मध्ये ‘मुंबई पुनर्रचना कायद्यां’तर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा २ राज्यांची निर्मिती करण्यात आली.
२. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी १०६ आंदोलक हुतात्मे !
२१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते; कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते, त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. या निर्णयाचा सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून निषेध होत होता. या संघटितपणामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसर्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाऊंटनकडे जमला. मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांची शक्ती वापरून लाठीमार करण्यात आला; मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. परिणामी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. नंतर गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांचे बलीदान आणि मराठी माणसाचे आंदोलन यांमुळे अखेर सरकारने नमते घेऊन १ मे १९६० मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)