आत्‍मनिर्भर आणि स्‍वावलंबी भारतासाठी ‘सहकार भारती’ने पुढाकार घ्‍यावा ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर स्‍वामी

‘सहकार भारती’च्‍या प्रदेश कार्यकारणी बैठकीच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना प.पू. काडसिद्धेश्‍वर स्‍वामी, तसेच मान्‍यवर

कणेरी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ विविध क्षेत्रांत अनेक संस्‍था, संघटना यांच्‍या माध्‍यमातून सामाजिक कार्य करत आहे. सहकार क्षेत्रात सहकार भारती संपूर्ण भारतात काम करत आहे. काही मूठभर लोकांमुळे सहकार चळवळ अपकीर्त झाली. सहकार क्षेत्रात चांगले काम करणार्‍या संस्‍थांना सहकार भारती मार्गदर्शन करण्‍याचे काम अवितरपणे करत आहे. घर स्‍वावलंबी झाले, तर गाव स्‍वावलंबी होते अन् गाव स्‍वावलंबी झाले, तर देश स्‍वावलंबी होईल, आत्‍मनिर्भर होईल. तरी आत्‍मनिर्भर आणि स्‍वावलंबी भारत निर्माण करण्‍याच्‍या कार्यात ‘सहकार भारती’ने पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजी यांनी केले. ते कणेरी मठ येथे सहकार भारतीच्‍या प्रदेश कार्यकारणी बैठकीच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी बोलत होते.

प्रारंभी इचलकरंजी येथील आमदार प्रकाश आवाडे, सहकार भारतीचे राष्‍ट्रीय महामंत्री उदय जोशी, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, कोल्‍हापूर जिल्‍हाध्‍यक्ष जवाहर छाबडा यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. प्रास्‍ताविक जवाहर छाबडा यांनी केले. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे म्‍हणाले, ‘‘सहकारी बँकांना जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक आणि नाबार्ड यांच्‍याप्रमाणेच शासनाच्‍या योजना तळागाळापर्यंत पोचण्‍यास अनुमती द्यावी.’’ धोंडीराम पागडे यांनी आभार व्‍यक्‍त केले. या कार्यक्रमास महाराष्‍ट्र प्रदेश संघटनप्रमुख संजय परभणी, फेडरेशनच्‍या उपाध्‍यक्ष वैशाली आवडे, ‘स्‍वावलंबी भारत अभियाना’चे विनय खटावकर आणि पदाधिकारी उपस्‍थित होते.