आज इंदूरचे प्रसिद्ध संस्‍थापक मल्‍हारराव होळकर यांची तिथीनुसार पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने…

दूरदृष्‍टी आणि सावधपणा असलेले मल्‍हारराव होळकर !

मल्‍हारराव होळकर

‘वैशाख शुक्‍ल एकादशी या तिथीला इंदूरचे प्रसिद्ध संस्‍थापक मल्‍हारराव होळकर यांचे निधन झाले. मल्‍हारराव धनगर असून नीरा नदीच्‍या काठच्‍या होळ गावचे ते रहाणारे. बाजीराव पेशवे यांच्‍याकडे प्रथम साधारण शिपाई म्‍हणून ते कामास लागले आणि पुढे स्‍वकर्तबगारीवर माळव्‍यांतील महसूल गोळा करण्‍याचे काम त्‍यांनी त्‍यांच्‍याकडे घेतले. तिकडे त्‍यांनी चांगलाच पराक्रम केला. बहादुरखान रोहिला आणि महंमदखान बंगश यांचा पराभव केल्‍यानंतर मल्‍हाररावाचे वजन उत्तरेत चांगलेच वाढले. मल्‍हाररावांचा रोहिल्‍यांचा पुरता बीमोड करण्‍याचा विचार होता. कुंभेरीच्‍या वेढ्यात त्‍यांचा पुत्र खंडेराव मारला गेला. त्‍या वेळी त्‍वेशाने पेटून मल्‍हाररावांनी प्रतिज्ञा केली, ‘सूरजमल्लाचा शिरच्‍छेद करीन आणि कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, नाही तर प्राणत्‍याग करीन.’

उत्तर भारतातील सर्व राजकारण मल्‍हाररावांच्‍याच सल्‍ल्‍याने चालत असे. मल्‍हारराव जाटांचे पारिपत्‍य करण्‍यासाठी अलमपुरास आले असता त्‍यांचे निधन झाले. दैवी, मानवी उपाय, अनुष्‍ठान आणि दानधर्म बहुत काही केले. आयुर्मर्यादेमुळे औषधोपचारांचा गुण न आल्‍याने वैशाख शुक्‍ल ११ या तिथीला देवाज्ञा झाली. मल्‍हाररावांचे वय मृत्‍यूसमयी ७३ वर्षे होते. ‘‘पेशवाईच्‍या मराठेशाहीतील सर्व घडामोडी आणि स्‍थित्‍यंतरे पाहून त्‍यांत प्रत्‍यक्ष भाग घेतलेला अनुभविक जुना सरदार या वेळी हा एकच होता आणि तो म्‍हणजे मल्‍हारराव होळकर ! ते केवळ शिपाईगिरीतच तरबेज होते, असे नव्‍हे, तर त्‍यांच्‍या अंगी दूरदृष्‍टी आणि सावधपणा हे गुणविशेष होते.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))