अवैध पद्धतीने कृत्रिमरित्‍या आंबे पिकवणार्‍यांवर अन्‍न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई !

फळे पिकवतांना नैसर्गिक पद्धत वापरण्‍याचे शासनाचे आवाहन !

नवी मुंबई – अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्‍या आंबे पिकवणार्‍या मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या व्‍यापार्‍यांवर अन्‍न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई सहआयुक्‍त (अन्‍न) सुरेश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली साहाय्‍यक आयुक्‍त योगेश ढाणे, गौरव जगताप यांच्‍या पथकाने केली आहे. फळविक्रेत्‍यांनी फळे पिकवण्‍यासाठी नैसर्गिक पद्धतीचाच वापर करावा, असे आवाहन सहआयुक्‍त (अन्‍न) सुरेश देशमुख यांनी केले आहे.

सौजन्य एबीपी माझा 

अन्‍न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांनी ‘कॅल्‍शियम कार्बोईड’चा वापर करून फळे पिकवण्‍यावर बंदी घातलेली आहे. कॅल्‍शियम कार्बोईड या रसायनामधून ऍसिटिलीन हा वायू उत्‍सर्जित होतो. त्‍यामुळे फळे पिकतात; परंतु त्‍याचा मानवी आरोग्‍यावर घातक परिणाम होतो. त्‍यामुळे या रसायनाच्‍या वापरावर बंदी आहे; परंतु इथिलिन वायुचा विहित पद्धतीने वापर करून फळे पिकवण्‍यासाठी मान्‍यता आहे. त्‍यासाठी अन्‍न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने मार्गदर्शक तत्त्वे घोषित केलेली आहेत. त्‍यानुसार इथिलिन गॅस सिलिंडर, कॉम्‍प्रेस्‍ड इथिलिन गॅस, इथिलिन गॅस उत्‍सर्जित करणारी रसायने आणि इथेफॉम सॅचेट है विहित पद्धतीने वापरण्‍यास मान्‍यता देण्‍यात आलेली आहे. इथिलिन गॅस उत्‍सर्जित करणार्‍या रसायनांना मान्‍यता दिली असली तरी त्‍या रसायनांच्‍या द्रावणाचा थेट फळांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.

अन्‍न आणि औषध प्रशासन, ठाणे कार्यालयाने सदर तरतुदीच्‍या कार्यवाहीसाठी एकूण ५ अन्‍न सुरक्षा अधिकार्‍यांचे पथक नियुक्‍त केले आहे. या पथकाने कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, मुंबई येथे धाडी टाकून मे. सुनील धोंडिबा राणे, मे. गुलाम फ्रुट एंटरप्रायझेस, मे. ज्ञानेश्‍वर शिवराम गावडे या पेढ्यांमध्‍ये इथलेन / इथेफॉन या इथिलिन गॅस उत्‍सर्जित करणार्‍या रसायनांचे द्रावण थेट आंब्‍यावर स्‍प्रे केल्‍याच्‍या संशयावरून या फळांचे नमुने घेऊन उर्वरित माल जप्‍त करून नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.