करमाळा तालुक्‍यातील (सोलापूर) श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर प्रशासकाची नियुक्‍ती !

प्रतिकात्मक चित्र’

सोलापूर – श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍याच्‍या संचालक मंडळाची मुदत संपल्‍यानंतर निवडणूक घेण्‍यास विलंब केल्‍याने कारखान्‍याचे संचालक मंडळ विसर्जित करण्‍यात आले आहे. प्रशासक म्‍हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर सध्‍या बागल गटाची सत्ता होती. ‘आदिनाथ कारखाना बारामती अ‍ॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्‍याची प्रक्रिया रहित करून कारखाना सहकारी तत्त्वावर ठेवण्‍यात आला होता; मात्र प्रशासक आल्‍याने आता यापुढे कारखान्‍याची निवडणूक कधी होणार ? हे निश्‍चित नाही. या संदर्भात कारखान्‍याचे माजी प्रशासक श्री. धनंजय डोंगरे म्‍हणाले, ‘‘निवडणूक व्‍यय भरण्‍यासाठी ३५ लाख रुपये भरण्‍यास कारखान्‍याला सांगण्‍यात आले होते. यांपैकी आम्‍ही १० लाख रुपये भरले होते. साखर विक्री करून अन्‍य पैसे भरण्‍याचे आम्‍ही सांगितले होते; मात्र अचानकच कल्‍पना नसतांना प्रशासक कारखान्‍यावर आले आणि त्‍यांनी संचालक मंडळ बरखास्‍त केले.’’

या संदर्भात करमाळा तालुक्‍याचे आमदार संजयमामा शिंदे म्‍हणाले, ‘‘साखर कारखाना वाचावा, एवढीच आमची भावना होती. त्‍यामुळे आम्‍ही निवडणूक लढवण्‍याची सिद्धता दर्शवली होती. प्रशासक जरी नेमला, तरी काही अडचण नाही. प्रशासकाला जे सहकार्य लागेल ते करण्‍याची आमची सिद्धता आहे.’’