आत्‍महत्‍येच्‍या विचारांवर लगाम हवाच !

‘काही दिवसांपूर्वीची घटना. तरुण आणि तरुणी हे दोघे चंडीगडहून आले होते. ते नोएडा या भागात एक सदनिका भाड्याने घेऊन रहात होते. एक दिवस त्‍यांच्‍यात वाद झाला. त्‍यानंतर तरुणाने इमारतीच्‍या २० व्‍या मजल्‍यावरून उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. विषय गंभीर आहे. मुळात प्रश्‍न असा निर्माण होतो की, आयुष्‍य इतके बेभान आणि बेछूट जगायचे असते का ? मतभेद झाल्‍यानंतर आत्‍महत्‍येपर्यंतचे भीषण टोक गाठण्‍याची वेळ आजच्‍या तरुणांवर का येत आहे ? या प्रश्‍नाच्‍या मुळाशी जायचे ठरवले, तेव्‍हा असे लक्षात आले की, आताची तरुण पिढी स्‍वतःचे निर्णय स्‍वतःच घेते आणि त्‍यांच्‍या निर्णयांवर ठामही रहाते. दुसर्‍या राज्‍यात किंवा गावात जाऊन ‘हॉटेल’मधील खोली आरक्षित करून मुलगा आणि मुलगी यांनी एकत्र रहाणे, या गोष्‍टी मुळातच न पटण्‍यायोग्‍य आहे. अशा मुलांच्‍या निर्णयाविषयी त्‍यांचे पालक अनभिज्ञ असतात का? कि पालकांपर्यंत ही स्‍थिती पोचतच नाही ? आता या सगळ्‍या गोष्‍टींमध्‍ये पालकांची कितपत चूक आहे ? त्‍यांनी त्‍यांच्‍या मुलांवर योग्‍य पालनपोषण, संगोपन आणि योग्‍य संस्‍कार केले, तरीही बेभान, बेछूट आणि मुक्‍त आयुष्‍य जगणार्‍या या पिढीने आपल्‍याच आई-वडिलांना अंधारात ठेवून अशा कृती कराव्‍यात, हे समाज विकृतीकडे चालला असल्‍याचे लक्षण आहे आणि ते सर्वच स्‍तरावर धोकादायक आहे.

१. तरुणांनी आत्‍महत्‍या करणे त्‍यांच्‍या कुटुंबियांसाठी धक्‍कादायक

सौ. श्रुती हजारे

मुळातच आजची तरुण मुले अतिशय अल्‍प संयमी होत चालले आहेत. कुठल्‍याही समस्‍येवर त्‍वरित तोडगा न मिळाल्‍यास ते कुठले तरी विमनस्‍क टोक गाठत आहेत. याचा गंभीर परिणाम त्‍यांचे जीवन आणि पालक यांच्‍यावर होत आहे, याचा साधा विचारही या मुलांकडून होत नाही. एखादी गोष्‍ट आपल्‍याला मिळाली नाही, तर त्‍यावर व्‍यक्‍त होण्‍याची जी नकारात्‍मक बाजू आहे, त्‍याचे आत्‍महत्‍या हे एक तीव्र टोक आहे. कुठल्‍याही समस्‍येचे उत्तर हे आत्‍महत्‍या होऊ शकत नाही. एखाद्या तरुणाने आत्‍महत्‍या केल्‍यानंतर त्‍यांच्‍या कुटुंबियांना मोठा धक्‍का बसतो. ही त्‍यांच्‍यासाठी आयुष्‍यभर मोठी समस्‍या बनून रहाते. याचा विचार या बेभान निर्णय घेणार्‍या मुलांनी निश्‍चित केला पाहिजे.

२. तरुण मुले आणि त्‍यांचे पालक यांच्‍यात निखळ संवाद असणे आवश्‍यक !

आपली जशी संगत असते, तसे आपल्‍यावर संस्‍कार होतात. आपण कुठल्‍या संगतीत वाढत आहोत ? आणि त्‍याचा आपल्‍यावर काय परिणाम होत आहे ?, यांविषयीची निखळ चर्चा मुलांनी त्‍यांच्‍या पालकांसमवेत करायला हवी. आपल्‍या मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ? आणि त्‍यांचे स्‍वभाव कसे आहेत ? यांविषयी पालकांना ठाऊक असायला हवे. वेळ पडल्‍यास त्‍यांनी कुणाशी मैत्री ठेवावी ? हे सांगण्‍याइतपत अंकुश त्‍यांनी मुलांवर ठेवायला हवा. अर्थात् जेव्‍हा मुले आणि पालक यांच्‍यात निखळ संवाद चालू असेल, तेव्‍हाच हे होऊ शकते. आपल्‍या संगतीचा आपल्‍या आचार-विचारांवर नकळतपणे संस्‍कार होत असतो. त्‍यामुळे समाजात रहात असतांना आपल्‍याला कुणाची सोबत असावी ? हे ठरवता येणे आवश्‍यक आहे.

३. सद़्‍सद़्‍विवेकबुद्धी जागृत असणार्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये आत्‍महत्‍या करण्‍याचे अल्‍प प्रमाण

तरुण किंवा तरुणी यांनी आत्‍महत्‍या करण्‍यामागील मूळ कारण शोधले पाहिजे. तसे झाले, तर समस्‍येमागील अनेक पैलू उलगडतील. जेव्‍हा आपण या समस्‍यांचा खोलवर विचार करतो, तेव्‍हा आपल्‍याला संस्‍कारांचा सक्षम पायाच नसल्‍याचे लक्षात येते. एखाद्या  व्‍यक्‍तीवर जेव्‍हा उत्तम संस्‍कार असतात, तिला आजूबाजूच्‍या परिस्‍थितीचे भान असते आणि ती योग्‍य-अयोग्‍यतेचा विचार करणारी असते, तेव्‍हा ती इतक्‍या टोकाच्‍या निर्णयापर्यंत जात नाही. अशा व्‍यक्‍तींचे आत्‍महत्‍या करण्‍याचे प्रमाण नगण्‍य आहे. ज्‍या व्‍यक्‍तीला सारासार विचार करता येत नाही, निर्णयाप्रती पोचता येत नाही आणि द्विधा मनस्‍थितीवर संयम राखता येत नाही, जिला कुठल्‍याही समस्‍येवर त्‍वरित तोडगा काढता येत नाही, अशा व्‍यक्‍तीचे आत्‍महत्‍येकडे वळण्‍याचे प्रमाण निश्‍चितच अधिक आहे.

४. आत्‍महत्‍या थांबवण्‍यासाठी साधना करणे हाच उपाय ! 

अशा कितीतरी घटना आपण समाजात प्रतिदिन पहात असतो. तरुण मुले किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचारी वर्गातील काहीजण हे अचानक काहीही कल्‍पना नसतांना त्‍यांच्‍या आयुष्‍याचा शेवट करू इच्‍छितात. या सर्व घटनांमधून आपण सर्वांनीच योग्‍य तो बोध घ्‍यायला हवा. प्रत्‍येक समस्‍येवर आत्‍महत्‍या हे उत्तर निश्‍चितच नाही. प्रत्‍येक अडचणीला पर्याय किंवा उपाय असतात, तसेच वाईट वेळ जाऊ देण्‍यासाठी थोडा कालावधी जावा लागतो. प्रत्‍येक प्रश्‍नाला लगेचच उत्तर मिळाले पाहिजे, असे नसते. आयुष्‍यात काही क्षण थांबताही आले पाहिजे आणि काही क्षण वाटही पहाता आली पाहिजे. या सगळ्‍यांचा सारांश, म्‍हणजे आपल्‍यातील सोशिकता आणि सहनशीलता वाढली पाहिजे, तरच आपले व्‍यक्‍तिमत्त्व प्रगल्‍भ होऊन खुलून येऊ शकते.’

– सौ. श्रुती हजारे, फोंडा, गोवा.