बिहारमधील आजन्म कारावास भोगणारे माजी खासदार आनंद मोहन यांची सुटका होणार !

बिहारच्या जनता दल (संयुक्त), काँग्रेस, साम्यवादी आणि राष्ट्रीय जनता दल पक्षांच्या सरकारने पालटलेल्या कारागृह नियमाचा दुष्परिणाम !

माजी खासदार आनंद मोहन

नवी देहली – बिहारच्या गोपलगंजचे जिल्हाधिकारी जी. कृष्णैय्या यांच्या वर्ष १९९४ मध्ये करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी आजन्म कारावास भोगणारे माजी खासदार आनंद मोहन यांची सुटका करण्यात येणार आहे. बिहारच्या जनता दल (संयुक्त), काँग्रेस, साम्यवादी आणि राष्ट्रीय जनता दल पक्षांच्या युती सरकारने १० एप्रिल या दिवशी कारागृहाच्या नियमांत पालट केल्यामुळे आनंद मोहन यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. आनंद मोहन यांचा मुलगा चेतन या सरकारमधील राष्ट्रीय जनता दलाचा आमदार आहे. कारागृह नियमात पालट केल्याने अन्य २६ आरोपींचीही सुटका होणार आहे.


१. आनंद मोहन यांच्या सुटकेवर भाजपने म्हटले की, जर आनंद मोहन यांची सुटका केली जाऊ शकते, तर मद्य सेवन केल्यामुळे कारागृहात असणार्‍या सहस्रो लोकांचीही सुटका सरकारने करावी.

२. आनंद मोहन यांनी सुटकेविषयी म्हटले की, मी माझी शिक्षा भोगली आहे. आता जो निर्णय घेतला गेला आहे तो सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या देखरेखीखाली घेतला जात आहे.

३. दिवंगत कृष्णैय्या यांची पत्नी उमा देवी यांनी आनंद मोहन यांच्या सुटकेवर टीका केली आहे. आनंद मोहन यांच्या सुटकेचा विरोध केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

संपादकीय भूमिका

  • गुन्हेगारांच्या सुटकेसाठी नियमांत पालट करणारे शासनकर्ते बिहारमध्ये पुन्हा जंगलराज निर्माण करत आहेत. ‘ही लोकशाहीची शोकांतिका आहे’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !