शेगाव संस्थानच्या धर्तीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात इच्छुक भाविकांना विनामूल्य सेवा करता येणार आहे. येत्या आषाढी एकादशी पासून ही विनामूल्य सेवा करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक २० एप्रिल या दिवशी पार पडली . या बैठकीत शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर श्री विठ्ठल मंदिरात भाविकांना विनामूल्य सेवा करण्याचा लाभ देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अधिवक्त्या माधवी निगडे आदी उपस्थित होत्या. यासंदर्भात सविस्तर कृती आराखडा मे मासाच्या पहिल्या सप्ताहात सिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना मंदिरासह परिसरात विनामूल्य सेवा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.