खडकवासला धरणाच्या पाण्यात अस्थी विसर्जन !

स्थानिकांची कारवाई करण्याची मागणी !

खडकवासला धरण परिसर

पुणे – खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या गावांतील सांडपाणी, हॉटेल, फार्म हाऊस, रिसॉर्ट आणि आस्थापनातील सांडपाणी, गावठी दारूच्या भट्टीतील घाण धरणाच्या पाण्यात मिसळून पाण्याचे प्रदूषण होत असतांनाच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. खडकवासला धरणाच्या पाण्यात थेट मृतांचे अस्थी, राख, कपडे आणि इतर वस्तू यांचे राजरोसपणे विसर्जन होत आहे. पुणे-पानशेत रस्त्याला लागून सोनापूर गावाच्या हद्दीत काही मासांपासून हा प्रकार घडत आहे. ज्या ठिकाणी हा विधी केला जातो, त्यातील पाण्याला दुर्गंधी येत असून निर्माल्य, मृतांचे कपडे यांचा तेथे खच पडला आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने स्थानिक ग्रामपंचायतीने संबंधित ठिकाणी फलक लावून विधी न करण्याचे आवाहन केले आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हा प्रकार चालू आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याने पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांनी तातडीने हा प्रकार थांबवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

धरणाच्या कडेने दोन्ही बाजूने ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. ग्रामपंचायतींनी अजून जलशुद्धीकरण प्रकल्प किंवा प्रक्रिया प्रकल्प उभारलेले नाहीत, त्यामुळे हे दूषित पाणी नळावाटे थेट नागरिकांच्या घरामध्ये पिण्यासाठी जात आहे. प्रशासनाने यावर कारवाई करणे आवश्यक आहे, असे सोनापूर गावचे उपसरपंच सूरज पवळे यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी अस्थीविसर्जन करण्यासाठी येणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे खडकवासला धरण शाखेच्या पाटबंधारे विभागाच्या अभियंत्या गिरीजा कल्याणकर यांनी सांगितले. खडकवासला धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने असे विधी करणे योग्य नाही. यापुढे कुणी अस्थीविसर्जन करतांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे ग्रामीण हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणार्‍यांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा करून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजीही घ्यायला हवी.