चेहर्‍यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने युवतीला पंजाबमधील सुवर्ण मंदिरात प्रवेश नाकारला

युवतीने चेहर्‍यावर रंगवलेला भारताचा राष्ट्रध्वज

चंडीगड (पंजाब) – येथील अमृतसरमध्ये असलेल्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरासंदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. यामध्ये एका युवतीने चेहर्‍यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने मंदिराबाहेरील अधिकारी तिला आत जाण्यापासून रोखत असल्याचे दिसत आहे. ‘हा पंजाब असतांना तुम्ही भारताचा राष्ट्रध्वज कसा रंगवू शकता ?’, असा प्रश्‍न विचारत हा अधिकारी युवती आणि तिच्यासमवेत असलेल्या व्यक्तीला खडसावत आहे. यावर व्यक्ती विचारते की, पंजाब भारतात नाही का ? त्यावर अधिकारी रागावत युवतीच्या हातातील भ्रमणभाष हिसकावत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या घटनेवरून ‘शिरोमणी गुरद्वारा प्रबंधक कमिटी’चे महासचिव गुरचरण सिंह ग्रेवाल यांनी क्षमा मागितली असली, तरी संबंधित अधिकार्‍याची बाजूही घेतली आहे. ते म्हणाले की, युवतीच्या चेहर्‍यावर रंगवलेल्या ध्वजामध्ये ‘अशोक चक्र’ नसल्याने तो राष्ट्रध्वज असू शकत नाही. तो काँग्रेस अथवा अन्य कोणत्या राजकीय पक्षाचा ध्वजही असू शकतो.

सौजन्य : India Today

या घटनेवरून ट्विटरवर वाद चालू झाला आहे. ‘इस्कॉन’चे प्रवक्ते राधारमण दास यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, या प्रकरणातील संबंधित खलिस्तान्याला तात्काळ अटक करण्यात यावी. या घटनेकडे कानाडोळा केल्याने चांगले होणार नाही, उलट या लोकांचा अहंकार वाढतच जाईल.

काही लोकांनी मात्र संबंधित युवतीला विरोध करत राष्ट्रध्वज ही काय चेहर्‍यावर रंगवायची गोष्ट आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

संपादकीय भूमिका

  • पंजाबमध्ये फुटीरतावाद कोणत्या स्तरापर्यंत पोचला आहे, हे यावरून लक्षात येते. केंद्र सरकारने वेळीच अशा सर्व फुटीरतावादी तत्त्वांवर कठोर कारवाई केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीच शक्यता अधिक आहे !
  • प्रत्येकात राष्ट्रभिमान असलाच पाहिजे; परंतु चेहर्‍यावर राष्ट्रध्वज रंगवणे, हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे, हेही लक्षात घ्यायला हवे !