राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेची अधिकाऱ्यांकडून केली जाणारी पडताळणी बंदच !

मुंबई, १६ एप्रिल (वार्ता.) – यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील स्थापत्य अधिकारी, वाहतूक व्यवस्थापक आणि कामगार अधिकारी या अधिकाऱ्यांकडून बसस्थानकांच्या स्वच्छतेची वेळोवेळी पडताळणी करण्याची कार्यपद्धती होती. सध्या मात्र ही पडताळणी बंद आहे, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वी एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एखाद्या जिल्ह्यातील बसस्थानकाला अचानक भेट देऊन स्वच्छतेची पहाणी करायचे. त्यामुळे बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी तेथील यंत्रणा दक्षतापूर्वक काम करायची. बसस्थानकावर अस्वच्छता आढळली, तर संबंधित ठेकेदाराकडून दंड आकारला जात होता. सध्या मात्र तसे होत नाही. काही ठिकाणी संमत असलेल्या संख्येपेक्षा ठेकेदार अल्प कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात आणि त्यांचे पैसे लाटतात. यांतील काही रक्कम संबंधित एस्.टी. विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही पुरवली जाते. त्यामुळे बसस्थानकांची स्वच्छता झाली नाही, तरी ठेकेदारांना दंड आकारला जात नाही. काही ठिकाणी ठेकेदार स्वच्छतेसाठी असलेले साहित्य हडप करतो. असे प्रकार चालू आहेत. बसस्थानके स्वच्छ ठेवायची असल्यास एस्.टी.च्या अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे या अधिकाऱ्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले. एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाने ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ घोषित केली आहे; मात्र ही मोहीम घोषित करूनही बसस्थानकांच्या स्वच्छतेविषयी निश्चित धोरण ठरवण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे.

संपादकीय भूमिका

कर्तव्यचुकार अधिकारी !