पलूसचे (जिल्हा सांगली) साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज !

संत श्री समर्थ धोंडीराज महाराज

पलूस (जिल्हा सांगली) – पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी असून १६ वा रथोत्सव होणार आहे. पारायण आणि पुण्यतिथी महोत्सव २१ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत होत आहे. यात प्रतिदिन पहाटे ५ ते ६ श्रींना अभिषेक, सकाळी ७ ते दुपारी १२ अभंग गाथा पारायण, दुपारी २ ते ४ महिला भजन, दुपारी ४.३० ते सायं. ५.३० वाजता हरिपाठ, सायंकाळी ६ ते रात्री ८ हरिकीर्तन, रात्री ८.३० ते ९.३० महाप्रसाद आणि संतपंगत असे कार्यक्रम होणार आहेत. २८ एप्रिलला दुपारी ३ ते सायं. ७ पर्यंत भव्य रथोत्सव आणि ग्रंथ दिंडी होणार आहे. २९ एप्रिलला सद्गुरु धोंडीराज महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुष्पवृष्टी आणि काल्याचे कीर्तन सकाळी ९.३० ते दुपारी १२ पर्यंत होईल.

सद्गुरु धोंडीराज महाराजांनी त्यांचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भरवलेली ही यात्रा होय. त्या निमित्ताने नामस्मरण, भजन, कीर्तन, अन्नदान सेवा असे या यात्रेचे स्वरूप असते. त्यासाठी मिष्टान्न म्हणून खीर असते. पुढे ही यात्रा ‘धोंडीराज महाराज यात्रा’ म्हणूनच प्रचलित झाली. त्या निमित्ताने यात्रा झाल्यावर वैशाख शुद्ध प्रतिपदेला गाथा पारायण सोहळा चालू होऊन नामस्मरण, भजन, कीर्तन आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालू रहातो. सद्गुरु धोंडीराज महाराज यांनी समाधी ठेवतांना आदल्या दिवशी पलूस येथील सर्व देवतांचे दर्शन घेतले तो दिवस अष्टमीचा होय. त्यादिवशी रथोत्सव सोहळ्याचे आयोजन आणि नवमीला महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. महाराजांनी वैशाख शुद्ध नवमी वर्ष १९०८ मध्ये देह ठेवला.

पलूस आणि पंचक्रोशीतील लोकांसाठी सद्गुरु धोंडीराज महाराज हे आराध्यदैवत असून सांगली जिल्ह्यातील एक मोठी आणि प्रमुख यात्रा म्हणून या यात्रेचे स्वरूप आहे. श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, गोंदवलेकर महाराज यांचे समकालीन आणि येथील श्रद्धास्थान असलेले महाराज समाधी मंदिर अन् गादीभक्तांकडून याचे आयोजन होत असते. दत्त अवतारी विदेही सत्पुरुषांचे पलूसला पाय लागल्याने आणि त्यांनी केलेली भाकीते तंतोतंत खरी ठरली असून त्याप्रमाणे घटनाक्रम होऊन पलूस तालुक्यात त्यांचा साक्षात्कार होत आहे; म्हणूनच या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी दिलेला गुरुमंत्र, नामस्मरण आणि अन्नदान या कार्यक्रमांचे आयोजन असते. याचसमवेत सोहळा उत्साहात पार पडतो. तरी सर्व भाविक-भक्तांनी या सोहळ्यात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सेवाधारी व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे.