राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना ‘ईडी’ची क्लीन चिट ?

अजित पवार यांचे ‘ईडी’च्या आरोपपत्रात नावच नाही !

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार

मुंबई – गेल्या वर्षी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) या संदर्भात अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींवर धाडीही घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ‘ईडी’कडून अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यातच राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे; मात्र या घोटाळ्याच्या संदर्भात आता ‘ईडी’ने आरोपपत्र प्रविष्ट केले असून त्यामध्ये ‘अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नाही’, असे  समोर आले आहे. त्यामुळे ‘ईडी’ने अजित पवार यांना क्लीन चिट दिली का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पुढील सुनावणी १९ एप्रिलला !

‘ईडी’ने न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले असून त्यावर पुढील सुनावणी १९ एप्रिल या दिवशी होणार आहे. आरोपपत्रात अजित पवार यांचे नाव का नाही ? या संदर्भात ‘ईडी’च्या अधिकार्‍यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. ‘ईडी’कडून अजित पवार यांच्या विरोधात स्वतंत्र आरोपपत्र प्रविष्ट केले जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण ?

जुलै २०२१ मध्ये ‘ईडी’ने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित मालमत्तेवर टाच आणली होती. त्यामध्ये कारखान्याशी संबंधित भूखंड, इमारती आणि यंत्रसामग्री यांचा समावेश होता. याची एकूण किंमत ६५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. कोरेगाव तालुक्यातील हा कारखाना काही वर्षांपूर्वी लिलावात विकला गेला; मात्र तो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांनी मूल्यांकनापेक्षा अल्प रकमेत खरेदी केला आहे, असा आरोप करण्यात आला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यावर ‘ईडी’ला चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ‘ईडी’ने संपत्तीवर टाच आणली.