छत्रपती संभाजीनगर – महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने ६ एप्रिल या दिवशी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठ रंगार गल्ली, पैठणगेट, सिटी चौक, औरंगपुरा या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली. शहरात साजर्या होणार्या गुड फ्रायडे, हनुमान जयंती उत्सव आणि रमजान ईद या सणांच्या निमित्ताने शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. या गर्दीच्या ठिकाणी काही दुकानदार आणि हातगाडी चालक यांनी केलेले अतिक्रमण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मोहीम राबवून काढण्यात आले आणि रस्ता मोकळा करण्यात आला. (अतिक्रमणकर्त्यांचे अतिक्रमण करण्याचे धाडस होणार नाही अशी कारवाई संबंधितांवर होऊन त्यांना शिक्षा हवी. – संपादक)
व्यापार्यांच्या दुकानासमोर हातगाडीचालक हातगाडी लावून रस्त्यावर व्यापार करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोच आणि व्यापार्यांच्या दुकानासमोर लावल्याने व्यवसायावरही परिणाम होतो. यामुळे अनेकदा भांडणेही होतात. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त २ यांच्यासमवेत ३ एप्रिल या दिवशी पहाणी करून संबंधित अतिक्रमणकर्त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु आज पुन्हा त्यांनी अतिक्रमण केल्याने ही कारवाई करण्यात आली.