वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे मलब्याचा ढिगारा ढासळल्याने ३ कामगारांचा मृत्यू !

२ कामगार गंभीर घायाळ !

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारात विहिरीचे काम चालू असतांना विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा ढासळल्याने त्याखाली दबून ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य २ कामगार गंभीर घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे. ही घटना ३ एप्रिल या दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत आणि घायाळ झालेले कामगार हे राजस्थान येथील रहिवासी आहेत.

सीताराम रावत (वय ३५ वर्षे), महावीर रावत (वय ३८ वर्षे) आणि बनाजी गुज्जर (वय ३५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे, तर छोटू भिल्ल (वय २५ वर्षे) आणि रतनसिंग रावत, अशी गंभीर घायाळ झालेल्यांची नावे आहेत. झोलेगाव शिवार येथील साहेबराव करंडे यांच्या शेतामध्ये विहिरीचे काम चालू होते. विहिरीचे काम जवळपास २५ फूट म्हणजेच ४ परसापर्यंत झाले होते. काम चालू असतांना विहिरीचा मलबा लगतच टाकण्यात आला होता. या ठिकाणी कामगार काम करत होते.