देशभक्तांना अपकीर्त करणार्या फुटीरतावादी लोकप्रतिनिधींना जनतेने वैध मार्गाने घरी बसवायला हवे !
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ‘सावरकर गौरव यात्रा’ चालू आहे. त्या निमित्ताने…
त्याग करण्यात आणि क्लेश भोगण्यात सर्व देशभक्तांत अग्रभागी असलेले, क्रांतीचा अद्भुत इतिहास घडवणारा अन् लिहिणारे, आपल्या अलौकिक बुद्धीने भविष्याचा अचूक वेध घेऊन त्यानुसार देशबांधवांना जागृत करणारे, राजकारण धुरंधर, क्रांतीकारक, महाकवी, लेखक आणि नाटककार असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘गौरव यात्रा’ महाराष्ट्रात ठिकठिकाणी निघत आहेत. या निमित्ताने सावरकर यांच्या जीवनातील काही प्रसंग आणि हिंदूंना आजही मार्गदर्शक असलेले त्यांचे विचार पाहूया !
संकलक : श्री. संजय दिगंबर मुळ्ये, रत्नागिरी
१. हिंदुस्थान हा एकसंघ देश आहे !
दुसर्या महायुद्धात सिंगापूर हरल्यावर जपानी नभोवाणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. त्यानंतर १० मार्च १९४२ रोजी ब्रह्मदेशाची (आताच्या ‘म्यानमार’ या देशाची) राजधानी रंगूनही जपानच्या हाती पडली. आता मात्र दुसरे महायुद्ध हिंदुस्थानच्या दारात येऊन ठेपल्यावर काहीतरी अधिकार देऊन हिंदुस्थानला चुचकारण्याची निकड ब्रिटनला वाटू लागली. अशा परिस्थितीत ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी सांगितले, ‘‘जपानी आक्रमणापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यासाठी हिंदुस्थानवासियांची एकजूट होणे आवश्यक आहे आणि अशी एकजूट झाली म्हणजे युद्धानंतर शक्य तितक्या लवकर हिंदुस्थानला वसाहतीचे अधिकार देता येतील. यासाठी एक मसुदा घेऊन स्टॅफर्ड क्रिप्स यांना लगेच भारतात पाठवण्यात येईल.’’
हिंदुस्थान पूर्णपणे ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांना सामील होऊ नये; हिंदुस्थानला ब्रिटन काहीतरी देत आहे, असे अमेरिकेला भासावे; तसेच मुसलमान संस्थानिक आणि अस्पृश्य यांना काहीतरी अधिक देण्याची लालूच दाखवून त्यांना हिंदूंपासून अलग पाडावे, असे अनेक बेत योजून ब्रिटीश साम्राज्याच्या संरक्षणाची प्रतिज्ञा करणार्या चर्चिलनी धूर्त क्रिप्सना हिंदुस्थानात पाठवले. क्रिप्स एका राजकीय समझोत्याचा मसुदा घेऊन हिंदुस्थानात आले. हा मसुदा बराचसा गुप्त ठेवण्यात आला होता. क्रिप्सच्या योजनेत हिंदुस्थानातील प्रांतांना स्वयंनिर्णयाचा हक्क देऊन त्यांना स्वतंत्र होण्याची म्हणजेच पाकिस्तानची बीजे रोवण्यात आली होती. सावरकरांना क्रिप्स भेटीसाठी देहली येथे येण्याचे निमंत्रण आले. क्रिप्सशी झालेल्या पहिल्या भेटीतच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या मसुद्यातील विषवल्लीचे स्वरूप जेथल्या तेथे उघड केले आणि ‘आम्ही (हिंदु महासभा) असा मसुदा कधीच मान्य करणार नाही’, असे क्रिप्सना ठणकावून सांगितले. सावरकर यांनी क्रिप्सला विचारले, ‘‘या मसुद्यात काही पालट करून घेण्याची सोय आहे काय ?’’ क्रिप्स उत्तरले, ‘‘छे ! छे ! यू आयदर टेक ऑर लिव्ह इट (एकतर तुम्ही तो स्वीकारा किंवा सोडून द्या.)’’ त्यावर तो मसुदा सावरकरांनी त्यांना तसाच परत देऊन म्हटले, ‘‘देन वुई टोटली रिजेक्ट इट (असे असेल, तर आम्ही तो पूर्णपणे नाकारतो.)’’ हा प्रकार घडल्यावर क्रिप्स म्हणाले, ‘‘छे ! सावरकर, असे करण्याचे कारण नाही. असे करण्यामागे तुमची कारणे काय आहेत, ते तरी आम्हाला कळू द्या ?’’ सावरकर म्हणाले की, हा मसुदा म्हणजे अखंड हिंदुस्थानच्या फाळणीकडे वाटचाल आहे. तेव्हा क्रिप्स म्हणाले,‘‘ॲक्च्युली इंडिया वॉज नेव्हर वन नेशन ! (हिंदुस्थान कधीच एकसंघ देश नव्हता !)’’
सावरकरांसमोर असे बोलून क्रिप्सनी घोडचूकच केली. काही मिनिटांपूर्वीच वाचलेल्या क्रिप्सच्याच मसुद्यातील शब्द काढून सावरकर यांनी विचारले, ‘‘तुम्ही स्वत:च यात ‘द इंडियन आर्मी’, ‘द इंडियन गव्हर्मेंट’ असे शब्द वापरले आहेत; याचा अर्थ आतापर्यंत तुम्हीसुद्धा ‘हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे’, ‘हा एकसंघ देश आहे’, असे मानत आहात, हे स्पष्ट होत नाही काय ?’’ हा बिनतोड युक्तीवाद ऐकून क्रिप्स महाशय निरुत्तर झाले !
हा प्रकार लवकरच बाहेर कळला आणि सावरकर यांची काँग्रेस वर्तुळातही वाहवा झाली. प्रत्यक्ष नेहरूंच्या ‘नॅशनल हेराल्ड’ पत्राने म्हटले, ‘सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्याशी बोलतांना, सावरकर यांनी बुद्धीची अशी चमक दाखवली की, क्रिप्सला त्याचा कधीच विसर पडणार नाही.’ आजही हिंदूंचा तेजोभंग करण्यासाठी ‘हिंदुस्थान कधीच एकसंघ देश नव्हता’, असे सांगण्यात येते, त्यातील फोलपणा आपण त्वरित दाखवून द्यायला हवा !
क्रिप्स योजनेमुळे बॅ. जीनांना आनंद झाला होता; पण त्यांना पाहिजे असलेल्या पाकिस्तानची पूर्ण हमी त्यात नव्हती; म्हणून काही दिवसांनी त्यांनी ही योजना फेटाळली. काँग्रेसनेही बरीच चर्चा करून ही योजना अमान्य केली; मात्र तसे करतांना त्यांनी प्रांतांना स्वयंनिर्णय देण्याचे म्हणजेच हिंदुस्थानमधून फुटून निघण्याचे घातकी तत्त्व मान्य केले ! क्रिप्सच्या तोंडावरच तो मसुदा धिक्कारण्याचे धाडस आणि बुद्धीमत्ता केवळ सावरकरांनी दाखवली !
२. मुसलमानांची दंगल शेवटची कधी ठरेल ?
वर्ष १९४१ च्या फेब्रुवारीत जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या विरोधात मुसलमानांनी मोठी दंगल केली. तेथील हिंदूंनी अखिल भारतीय हिंदु महासभेचे अध्यक्ष असलेल्या सावरकर यांना साहाय्यार्थ तार पाठवली. या तारेला सावरकर यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी एक क्रांतीकारी उत्तर पाठवले. आजही वैयक्तिक किंवा गावाच्या संरक्षणाची सिद्धता स्थानिक पातळीवर न ठेवणार्या हिंदूंच्या डोळ्यांत हे उत्तर म्हणजे झणझणीत अंजनच आहे. सावरकर त्या उत्तरात लिहितात, ‘जबलपूरमध्ये सहस्रावधी हिंदू रहातात. त्या माझ्या हिंदु बांधवांना मला असे निक्षून सांगावयाचे आहे की, त्यांनी स्वत:चे रक्षण नागरिक निर्बंधानुसार (सिव्हील राईट्स) मिळणार्या सर्व अधिकारांचा पुरेपूर लाभ घेऊन केले पाहिजे. या दंगलीच्या रोगावर तोच एकमेव रामबाण उपाय आहे. चौकशी समिती आणि प्रश्नोत्तरे यांतून काय निर्माण होणार ? अत्याचारांनी पीडित झालेल्या तुम्हांस सत्य काय आहे, हे ठाऊकच आहे. सरकार आणि आक्रमण करणारे अत्याचारी यांनाही सत्य काय ते ठाऊक आहे. अशा प्रसंगी नंतरच्या चौकशीवर विश्वासून बसणे भ्याडपणाचे आहे. या आठवड्यात सुमारे २० ठिकाणांहून दंगलीच्या हकिकती (घटना) माझ्याकडे आल्या आहेत. केवळ वक्तव्य प्रकाशित करून किंवा सरकारकडे तारा पाठवून या गोष्टी थांबणार्या नाहीत.
सुमारे १०० शूर हिंदु तरुण त्यांच्या बांधवांच्या रक्षणार्थ त्यांचे सर्वस्व समर्पिण्यास सिद्ध होतील, तर आक्रमकांच्या आक्रमणांच्या अनेक चौकशा आणि सरकारकडे पाठवण्यात येणार्या शेकडो तारा यांच्यापेक्षा त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल !
सर्वांत आश्चर्याची गोष्ट ही की, आम्ही वेळेवर आक्रमकांचा प्रतिकार करत नाही. विरोध प्रदर्शक सभा किंवा प्रस्ताव याकडे उगीच फाजील लक्ष पुरवतो. आता यापुढे तरी स्थानिक आक्रमणाचा प्रतिकार तात्काळ आपल्या शक्तीच्या जोरावर केला पाहिजे. बाहेरील साहाय्याची अपेक्षा करणे व्यर्थ होय. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. एकमेकांनी एकमेकांना साहाय्य करण्यास शिकले पाहिजे. अशा धोक्याच्या प्रसंगी सर्वांनी एके ठिकाणी जमले पाहिजे.
या दंगलीसंबंधी असे म्हटले जाते की, मुसलमानांनी पूर्वसंकल्पाप्रमाणे दंगल केली. मला असे विचारायचे आहे की, हिंदूंनीही आत्मरक्षणाचा उपाय आधीच का योजला नाही ? हिंदू आक्रमणाच्या प्रतिकारार्थ सज्ज का राहिले नाहीत ? मोहरम आणि अशा प्रकारची आक्रमणे प्रतिवर्षी होत नाहीत का ? गेल्या १ सहस्र वर्षांचा इतिहास हिंदूंना ठाऊक नाही का ? मग अशा ठिकाणी आम्ही सिद्धतेवाचून का जातो ? आणि संकटात का पडतो ? हेच मला कळत नाही ! या चुका आम्ही जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत असल्या दंगलीही थांबणार नाहीत. वरील गोष्टी जर जबलपूरच्या हिंदूंनी ध्यानी आणल्या, तर ही दंगल जबलपुरातील शेवटचीच समजली जाईल !’
केवळ जबलपूरमधीलच नव्हे, तर भारतातील सर्वच ठिकाणच्या धर्मांध मुसलमानांच्या दंगली शेवटच्या ठरण्यासाठी जबलपूरच्या १०० हिंदु तरुणांना प्राणपणाने लढण्याचे सावरकर यांनी वर्ष १९४१ मध्ये केलेले हे आवाहन आजही ठिकठिकाणच्या हिंदु तरुणांनी हृदयांत कोरून ठेवायला हवे !
३. सावरकर यांची शस्त्रभांडाराची कल्पना
एकीकडे आत्मभान विसरलेल्या हिंदु समाजाला सावरकर शब्दांनी स्फुल्लिंग देत होते, तसेच ते हिंदूंना शस्त्रसज्ज होण्याचाही उपदेश करत होते. क्रिप्स निघून गेले, तरी त्यांनी खतपाणी घातलेले पाकिस्तानचे रोपटे येथे वाढू लागले होते. पाकिस्तानची मागणी पूर्ण करण्यासाठी मुसलमान ठिकठिकाणी दंगली करत. हिंदू नि:शस्त्र असल्यामुळे अनेकदा ते या दंगलीत मार खात. अशा वेळी सावरकरांच्या प्रेरणेने शस्त्रसज्ज होऊ इच्छिणार्या हिंदूंना ‘हिंदु भांडारा’तून शस्त्रे पुरवण्याची व्यवस्था केली जाई. या ठिकठिकाणच्या भांडारांतून निर्बंधात (कायद्यात) बसणारी शस्त्रे उघडपणे पुरवली जात. या वेळी गांधीभक्त जरी ‘चरखा चला चलाके स्वराज्य लेंगे’ म्हणत होते, तरी शस्त्राला शस्त्रानेच उत्तर देणार्या सावरकरभक्तांमुळे पुढे फाळणीच्या वेळी पंजाब आणि बंगालमधील अनेक हिंदूंचे रक्षण झाले !
४. जातीवंत हिरा !
११ एप्रिल १९४४ या दिवशी सावरकर यांनी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘सायन्स इन्स्टिट्यूट’ या जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. सी.व्ही. रामन यांच्या संस्थेला भेट दिली. तेथे डॉ. रामन यांनी सावरकर यांना त्यांच्या हिर्यांच्या संशोधनाची माहिती दिली. नंतर चर्चेच्या ओघात डॉ. रामन म्हणाले, ‘‘आजवर मी अनेक हिरे पाहिले. ते चकाकतात, प्रकाश देतात; पण हिंदुजातीला सत्य प्रकाश देणारा खरा नि अत्यंत तेजस्वी असा जिवंत अन् जातीवंत हिरा आज येथे प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनाचे सार्थक झाले !’’
अजूनही अनेक वर्षे ‘सावरकर’ नावाचा हा तेजस्वी हिरा हिंदु जगताला प्रकाश देतच राहील !