गोव्यात ‘पी.एफ्.आय.’च्या कारवायांना थारा देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

बंदी घातलेली ‘पी.एफ्.आय.’ गोव्यात निरनिराळ्या नावांनी कारवाया करत असल्याचा आमदारांचा आरोप

पणजी, ३१ मार्च (वार्ता.) – देशात बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या संघटनेला गोव्यात थारा दिला जाणार नाही. गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ आणि तिचा संशयित अल्ताफ हुसेन आणि अन्य सदस्य यांच्या कारवायांवर सरकार देखरेख ठेवून आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३१ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ‘गोव्यात ‘पी.एफ्.आय.’च्या वाढत्या कारवाया चालू असल्याने गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडत असल्याने सरकार यावर कोणती कारवाई करणार ?’, असा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. या सूचनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. या चर्चमध्ये भाजपचे आमदार कृष्णा साळकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सहभाग घेतला.

प्रारंभी आमदार कृष्णा साळकर म्हणाले, ‘‘बंदी घातलेली ‘पी.एफ्.आय.’ संघटना आता निरनिराळ्या नावांनी कारवाया करत आहे. ‘ही संघटना धार्मिक कट्टरता निर्माण करून सामाजिक सौहार्द बिघडवण्यात यशस्वी होत आहे कि काय ?’, असा प्रश्न पडू लागला आहे. या संघटनेने केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. ही संघटना धर्मांतर आणि इतरांवर अत्याचार करणे आदी कृती करते. ‘या संघटनेला निधी कोण पुरवतो आणि तो कुठे वापरला जातो ?’, याची चौकशी केली पाहिजे. (आतंकवाद्यांशी संबंधित संघटनेवर कारवाईच्या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार्‍या आमदारांचे अभिनंदन ! – संपादक) माझ्याकडे याविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. या संघटनेचा हेतू काय आहे ? याचा शोध काढून त्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. यावर आताच कारवाई न झाल्यास पुढे गोव्यात दूषित वातावरण निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.’’

यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘पी.एफ्.आय.’चा सदस्य अल्ताफ हुसेन आणि अन्य मिळून एकूण २३ सदस्यांचे सखोल अन्वेषण करण्यात आले आहे. अन्वेषणात अल्ताफ हुसेन हा ‘वी फॉर फातोर्डा’ या संघटनेला निधी पुरवत असल्याने, तसेच त्याच्या विरोधात काही कारवायावरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचे समोर आले आहे.

‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातली, तेव्हा ३२ सदस्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून फातोर्डा, मायणा-कुडतरी, वास्को, वाळपई, फोंडा आणि मडगाव येथील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांमधून कह्यात घेण्यात आले होते. संघटनेच्या गोव्यातील कार्यालयांना टाळे ठोकून कादगपत्रे कह्यात घेण्यात आली होती.’’

भूखंड केवळ विशिष्ट समाजालाच मिळतात, तर इतरांना नाही ! – भाजपचे आमदार कृष्णा साळकर

आमदार कृष्णा साळकर

केपे येथे ५०० भूखंड पाडण्यात आले असून ते केवळ विशिष्ट समाजालाच मिळतात, तर इतरांना मिळत नाहीत. ‘पी.एफ्.आय.’ ही संघटना पाकिस्तान या शत्रूराष्ट्राचा झेंडा लावत आहे, तरीही आम्ही गप्प का बसतो ? असा संतप्त प्रश्न आमदार कृष्णा साळकर यांनी चर्चेच्या वेळी उपस्थित केला.