नवी मुंबई, ३० मार्च (वार्ता.) – नवी मुंबईत ठिकठिकाणी श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तुर्भे गाव येथील संत श्री रामतनुमाता मंदिर येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचे यंदा हे ८३ वे वर्षे होते.
ठाणे-बेलापूर पट्ट्यातील सर्वांत पुरातन म्हणून ओळखल्या जाणार्या बेलापूर गावातील श्रीराम मंदिर येथे भव्य स्वरूपात श्रीरामनवमी साजरी करण्यात आली. श्रीराम मारुति जन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी भजने, श्रीरामरायांना अभिषेक, त्यानंतर ह.भ.प. राजेंद्र महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन सादर झाले.
दिवाळे कोळीवाडा येथील ‘छाया सर्कल’ यांच्या वतीने श्रीराम जन्मानंतर सुस्वर ब्रास बँडवादन केले. ९ भजनी मंडळांनी भजने सादर केली. परंपरेनुसार यंदाही कुस्त्यांचे सामने झाले. यामध्ये सर्वश्रेष्ठ कुस्तीपटूला ढाल, रोख रक्कम आणि ‘बेलापूर केसरी’ हा मानाचा किताब देण्यात आला.
तुर्भे येथे २३ ते २९ मार्च या कालावधीत श्री रामनवमीनिमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये श्रीरामतनु चरितायन (शांता महिला मंडळ), अखंड रामनाम गजर रामरक्षा सहस्रावर्तने, अखंड रामनाम, हरिपाठ, भजने सादर करण्यात आली. ३० मार्च या दिवशी सकाळी शांता महिला मंडळाच्या वतीने श्रीरामतनु चरितायन सादर करण्यात आले.
तुर्भे येथील कलावती माता भजन मंडळ, शिव प्रासादिक भजन मंडळ, दारावे येथील गावदेवी प्रासादिक भजनी मंडळ यांनी सुश्राव्य भजने सादर करून उपस्थित श्रीरामभक्तांना मंत्रमुग्ध केले. नंतर ह.भ.प. सौ. विजया जोशी यांनी श्रीरामजन्माचे कीर्तन केले.
सायंकाळी पंचक्रोशीत काढण्यात आलेल्या पालखी सोहळयाला गणेश प्रासादिक भजनी मंडळाने उत्तम साथ दिली.
शिवसेना सानपाडा विभागाच्या वतीने ‘चैत्र नवरात्र उत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रीराम नवमीनिमित्त सकाळी आरती, नित्यपाठ, भगवान श्रीराम मूर्तीचे पूजन, आरती आणि नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.