रामनाथी, गोवा येथे असलेला सनातन संस्थेचा आश्रम पहाण्यासाठी आणि येथे चालणारे आध्यात्मिक कार्य समजून घेण्यासाठी देश-विदेशातून अन् विविध क्षेत्रांतील अनेक पाहुणे सातत्याने येत असतात. उच्च पदावर कार्यरत असणार्या प्रतिष्ठित पाहुण्यांपासून, सर्वसामान्य जिज्ञांसूपर्यंत, संगीत (गायन, वादन आणि नृत्य) कलाकार, तसेच उच्च आध्यात्मिक पातळी असलेले, म्हणजेच अनेक संत-महंत त्यांच्या भक्तगणांसह येत असतात. त्यांना आश्रम, म्हणजे आश्रमात चाललेल्या विविध सेवा दाखवण्याची सेवा काही साधक करतात. श्री. अमोल हंबर्डे यांनाही अशी संधी अनेकदा मिळाली आहे. ती सेवा करतांना त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. आरंभी समाजातील प्रतिष्ठित पाहुण्यांना आश्रम दाखवतांना ताण येणे; पण प.पू. गुरुदेवांंच्या चरणी कळकळीने प्रार्थना केल्यावर ‘तेच स्वतःकडून बोलून घेत आहेत’, असे जाणवून ताण उणावून आनंद मिळणे
‘आरंभी समाजातील प्रतिष्ठित पाहुण्यांना आश्रम दाखवण्याची सेवा करतांना मला ताण येत असे. आश्रम दाखवायला आरंभ करण्यापूर्वी माझ्याकडून प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कळकळीने प्रार्थना व्हायची, ‘देवा, मी अज्ञानी आहे. तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी ही सेेवा करून घ्या. मला काहीच येत नाही. ‘पाहुण्यांना काय आणि कसे सांगायचे ?’, हे मला कळत नाही. ‘माझ्या सांगण्याने ते साधनेला आरंभ करतील’, असे अजिबात नाही. केवळ तुमच्या कृपेनेच ते शक्य आहे. त्यामुळे तुम्हीच माझ्या माध्यमातून पाहुण्यांना आवश्यक अशी सूत्रे सांगून घ्या.’ नंतर माझ्या लक्षात आले, ‘खरंच, गुरुदेव माझ्याकडून बोलून घेत आहेत.’ तेव्हा माझ्या मनात आले, ‘जर प.पू. गुरुदेवच माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत, तर तेच सर्व काळजी घेतील.’ त्यामुळे माझ्या मनावरील ताण उणावून मला या सेवेतून आनंद मिळू लागला.
२. अनुभूती
प.पू. गुरुदेव साधकाच्या मुखातून ‘पाहुण्यांना त्यांच्या साधनेसाठी आवश्यक अशी सूत्रे सांगून घेत आहेत’, असे जाणवणे : आश्रम दाखवतांना माझ्याकडून पाहुण्यांची रुची लक्षात घेऊन त्यांना त्याविषयीची सूत्रे अधिक सांगितली जातात, उदा. संगीत क्षेत्राशी संबंधित पाहुणे असतील, तर ‘संगीतातील संशोधन आणि संगीतातून साधना’ हा विषय अधिक सांगितला जातो. ‘संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले, तसेच प.पू. गुरुदेव माझ्या मुखातून आश्रम दाखवण्याची सेवा करून घेत आहेत’, असे मला नेहमी जाणवते. मी पाहुण्यांना आश्रम दाखवतो, तेव्हा मी बोलत नसून ‘प.पू. गुरुदेव पाहुण्यांना त्यांच्या साधनेसाठी आवश्यक अशी सूत्रे माझ्या मुखातून सांगून घेत आहेत’, असे मला जाणवते; कारण ‘पाहुण्यांना कुठली सूत्रे सांगितली ?’, हे नंतर मला आठवत नाही; पण ‘प्रत्येक वेळी माझ्याकडून पाहुण्यांना नवीन सूत्रेे सांगितली जातात’, असे माझ्या लक्षात आले आहे.
३. आश्रमाची वैशिष्टपूर्ण सूत्रे दाखवतांना पाहुण्यांना पुष्कळ आश्चर्य वाटणे आणि आपोआप प.पू. गुरुदेवांची महती गायली जाणे
‘प.पू. गुरुदेवांनी निर्माण केलेले आश्रम, आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती, साधकांची नवीन सेवा शिकून घेऊन ती अधिकाधिक चांगली करण्याची तळमळ, साधकांची सेवेप्रती असलेली आत्मीयता आणि समर्पणभाव, सेवा परिपूर्ण करण्याचा ध्यास, प्रत्येक सेवेतून ईश्वरप्राप्ती करण्याची धडपड, प्रतिदिन मोठ्या प्रमाणात सिद्ध करण्यात येणारा प्रसाद-महाप्रसाद अन् आश्रमाचे चैतन्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने संपूर्ण आश्रमाची प्रतिदिन केली जाणारी स्वच्छता’, हे सर्व पाहून पाहुण्यांना पुष्कळ आश्चर्य वाटते. या गोष्टी दाखवतांना मला प.पू. गुरुदेवांची महती गाता येते, नव्हे, ती आपोआपच गायली जाते !
४. ‘पाहुण्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन घेण्याची ओढ वाटणे’, हेच आश्रम दाखवल्याचे फलित आहे’, असे वाटणे
सगळ्यांत महत्त्वपूर्ण गोष्ट, म्हणजे प.पू. गुरुदेवांची अप्रतिम शिकवण ! त्यामुळेच इतके सगळे साधक एकाच ठिकाणी, एका परिवाराप्रमाणे एकत्र रहातात, ते एकमेकांना एकमेकांच्या चुका सांगून साधनेत साहाय्य करतात आणि स्वतःकडून झालेल्या चुका फलकावर लिहून चित्तशुद्धी करतात. ‘हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाने होत आहे’, असे पाहुण्यांना सांगितल्यावर पाहुण्यांच्या मनात प.पू. गुरुदेवांच्या प्रती श्रद्धा निर्माण होते किंवा ती दृढ होते. ‘पाहुण्यांच्या मनात प.पू. गुरुदेवांचे दर्शन घेण्याची निर्माण होणारी ओढ’, हेच आश्रम दाखवण्याचे फलित आहे’, असे मला वाटते.
५. कृतज्ञता
केवळ गुरुकृपेनेच गेल्या काही वर्षांमधे मला पुष्कळ प्रतिष्ठित पाहुण्यांना आश्रम दाखवण्याची संधी मिळाली. वास्तविक पहाता जीवनात अशा प्रतिष्ठित पाहुण्यांना आणि संत-महंतांना भेटण्याची संधीही मिळत नाही. त्यांच्याशी बोलणे किंवा त्यांच्याशी जवळीक साधणे, ही फार दूरची गोष्ट आहे. गुरुदेवांच्या अपार कृपेनेच मला ही सेवा करण्याची अमूल्य संधी मिळत आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘प.पू. गुरुदेव, आश्रम दाखवण्याच्या सेवेतून आपण मला एवढी मोठी अनुभूती दिलीत’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आपल्या चरणांची धूळ होण्यास आतुरलेला,
श्री. अमोल अ. हंबर्डे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.२.२०२३)
|