भारताच्‍या पुण्‍य आणि पवित्र भूमीत सांस्‍कृतिक मुहूर्तमेढ रोवणारे रघुवंशीय !

३०.३.२०२३ या दिवशी ‘श्रीरामनवमी’ आहे. त्‍या निमित्ताने…

महाकवी कालिदास यांनी ‘रघुवंश’ हे महाकाव्‍य रचले. मधुररसाने ओथंबलेले हे महाकाव्‍य महाकवी कालिदास यांच्‍या लेखणीतून उतरले आहे. त्‍यांची भाषा प्रासादिक, अर्थगंभीर आणि सरळ आहे. भारतीय संस्‍कृतीमधील आदर्श जीवन कोणते ? आदर्श नागरिक कोण ? तो कसा असतो ? तपस्‍वी आणि संसारी कसा असतो ? याचे अत्‍यंत उत्‍कृष्‍ट आणि सुरम्‍य वर्णन आपल्‍याला कालिदासांच्‍या महाकाव्‍यात आढळते. श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या रूपात भगवंताने मानवी जीवनासाठी फार मोठे काम करून आदर्श उभा केला आहे. रघुवंश कुळातील व्‍यक्‍तींनी जीवनात आदर्श गुणांचे बीजारोपण केले पाहिजे, दैवी गुणांनी संपन्‍न असलेल्‍या व्‍यक्‍तींचे जीवन जाणून तसे गुण आपल्‍या अंगी बाणवण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे, ही शिकवण दिली.

रघुवंश हा शुद्ध पवित्र वंश म्‍हणून भारतीय संस्‍कृतीत आदरणीय आणि वंदनीय ठरला आहे. रघुवंशाने या भारताच्‍या पुण्‍य आणि पवित्र भूमीत सांस्‍कृतिक मुहूर्तमेढ रोवली. रघुवंशातील सर्व राजे सामर्थ्‍य संपन्‍न होते. संपूर्ण पृथ्‍वीवर त्‍यांचे राज्‍य पसरले होते. त्‍यांच्‍या विजयी रथाला अडवणारा एकही वीर या भूतलावर नव्‍हता. रघुवंशाने संपूर्ण मानवी समाजाला सभ्‍य आणि आदर्श जीवन कसे असते, ते स्‍वतःच्‍या आचरणाने दाखवून दिले. त्‍यांनी एक आदर्श निर्माण केला. कोणतेही जीवन स्‍थिर करायचे असेल, तर एकट्या माणसाचे काम नाही. रघुवंशातील अनेक पिढ्यांनी सांस्‍कृतिक आदर्श जीवन उभे करण्‍यासाठी आपल्‍या हाडांची काडे केली. आपले आयुष्‍य खर्ची घातले. आग्रहाने आणि निग्रहाने समाजाच्‍या उत्‍थानासाठी आपले जीवन वेचले. अशा अत्‍यंत शुद्ध आणि पवित्र रघुकुलात प्रभु रामचंद्रांचा जन्‍म झाला.

श्री. दुर्गेश परुळकर

१. महाकवी कालिदास यांनी श्रीरामांच्‍या सूर्यवंशाला ‘रघुवंश’ म्‍हणण्‍यामागील कारणमीमांसा !

महाकवी कालिदास यांनी श्रीरामांच्‍या सूर्यवंशाला जो नंतर ‘इक्ष्वाकु’ म्‍हणून ओळखला जाऊ लागला, त्‍याला ‘रघुवंश का म्‍हटले ?’ असा प्रश्‍न कुणाच्‍याही मनात निर्माण होऊ शकतो. महाकवी कालिदासांना दिलीप राजाच्‍या उदार आणि शूरपुत्र रघुराजाच्‍या चारित्र्याने आकर्षित केले. महाकवी कालिदासांनी रघुवंशाच्‍या प्रस्‍तावनेत आपल्‍या ग्रंथाला रघुवंश नाव का दिले ? ते सांगितले आहे. महाकवी कालिदास त्‍या प्रस्‍तावनेत लिहितात….

‘जन्‍मापासून शुद्ध फळ प्राप्‍त होईपर्यंत प्रयत्न करणारे, एक छत्री साम्राज्‍य गाजवणारे, स्‍वर्गाच्‍या दारापर्यंत आपले रथ नेऊन भिडवणारे, यथाशक्‍ती यज्ञ करणारे, याचकांचे मनोगत पुरवणारे, अपराध्‍यांना योग्‍य दंड ठोठावणारे, वेळीच सावध होणारे, दान देण्‍यासाठीच संपत्ती मिळवणारे, वंश सातत्‍यासाठी गृहस्‍थाश्रम पत्‍करणारे, बाल्‍यावस्‍थेत विद्याभ्‍यास, तारुण्‍यात विषयांचा उपभोग, वृद्धपणी मुनीव्रत स्‍वीकारणारे आणि अखेर नश्‍वर देह योग मार्गाने सोडून देऊन आत्‍मस्‍वरूपामध्‍ये विलीन होणारे सूर्यवंशी ‘इक्ष्वाकु’ कुळात राजे जन्‍माला आले. इक्ष्वाकु कुळातल्‍या राजांची ही सर्व विशेषणे रघुराजाला लागू पडतात. प्रभु रामचंद्र ही या संपूर्ण विशेषणांचा विशेष होऊ शकले नाहीत. म्‍हणून रघुराजासारख्‍या उदार शूर वंशाचा कर्ता, अनंत कीर्तीमान राजाचे नाव या महाकाव्‍याला देत आहे.’

२. प्रभु रामचंद्रांच्‍या पूर्वजांच्‍या नामावलीविषयी

वाल्‍मीकि रामायणातील बालकांडात प्रभु रामचंद्रांच्‍या पूर्वजांची नामावली दिली आहे. त्‍या नामावलीनुसार रघुराजा हा काकुत्‍स्‍थाचा मुलगा आहे. तथापि कालिदासांनी रघुराजा हा दिलीप राजाचा पुत्र असल्‍याचे म्‍हटले आहे. याविषयी संशोधन करून डॉ. हरदत्त शर्मा यांनी ‘पद्मपुराण’ आणि ‘कालिदास’ या आपल्‍या ग्रंथात जी प्रस्‍तावना लिहिली आहे. त्‍या प्रस्‍तावनेत त्‍यांनी म्‍हटले आहे की, ‘शाकुंतल’ आणि ‘रघुवंश’ या दोन महाकाव्‍यात पद्मपुराणाचा आधार घेतला आहे.

काही तज्ञांच्‍या मते ‘वायुपुराण’ आणि ‘विष्‍णुपुराण’ यांमध्‍ये प्रभु रामचंद्र यांच्‍या पूर्वजांची नामावली देण्‍यात आली आहे. त्‍या नामावलीला अनुसरून ‘रघुराजा हा दिलीप राजाचा पुत्र आहे’, असे निश्‍चितपणे सांगता येते. तोच आधार कालिदासांनी घेतला असावा. ‘पद्मपुराणा’त दिलीप राजाचा मुलगा रघु, रघुराजाचा मुलगा अजय, अजय राजाचा मुलगा दशरथ राजा असा क्रम दिला आहे. (साभार : ‘संस्‍कृत काव्‍याचे पंचप्राण’, लेखक – डॉ. केशव नारायण वाटवे, प्रकाशक – मनोहर ग्रंथमाला, सदाशिव पेठ, पुणे)

३. रघुवंशातील राजांचे वैशिष्‍ट्य

रघुवंशातील राजांनी त्‍यांच्‍याकडे आलेल्‍या याचकांची इच्‍छा यथायोग्‍यपणे पूर्ण केली. ‘आपल्‍याकडे आलेला याचक भगवान आहे’, असे रघुवंशातील राजांना वाटत होते. भगवंताला मान्‍य असणार्‍या आणि त्‍याच्‍या कामाला अनुकूल ठरणार्‍या लोकांच्‍या इच्‍छा पूर्ण करण्‍याचे काम रघुवंशातील राजांनी केले. अन्‍यायाने, सत्तेच्‍या बळावर, सामर्थ्‍याच्‍या बळावर रघुवंशातील एकाही राजाने कुणाचेही धन लुबाडले नाही. त्‍यांनी जे वैभव निर्माण केले, जी संपत्ती स्‍वकष्‍टाने निर्माण केली, त्‍यातील एकही पैसा त्‍याने स्‍वतःच्‍या विलासासाठी व्‍यय केला नाही. हेच रघुवंशातील राजांचे वैशिष्‍ट्य आहे. ‘स्‍वतःजवळ असलेल्‍या धनाचा उपयोग योग्‍य कार्यासाठीच खर्च करायचा’, हा रघुवंशातील राजांचा गुण आहे. या गुणामुळेच रघुवंशातील एकाही राजाच्‍या मनात स्‍वार्थाचा लवलेश नव्‍हता. याचे उदाहरण म्‍हणजे रघुराजाकडे याचक म्‍हणून आलेल्‍या कौत्‍सासारख्‍या याचकाला रघुराजाने रिक्‍त हस्‍ते पाठवले नाही. त्‍याला गुरुदक्षिणा देण्‍यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रांची आवश्‍यकता होती. कुबेराकडून तेवढ्या सुवर्णमुद्रा आणण्‍याचा विचार रघुराजाच्‍या मनात आला. त्‍याच क्षणी त्‍याचा खजिना सुवर्णमुद्रांनी भरून गेला. त्‍याने तो सारा खजिना कौत्‍साला अर्पण केला. कौत्‍साने सुद्धा आवश्‍यक तेवढ्याच सुवर्णमुद्रा स्‍वीकारल्‍या. अशा प्रकारे दानी आणि याचक दोघेही श्रेष्‍ठ होते.

४. अपराधाप्रमाणे शिक्षा देणारे रघुवंशीय राजे

ज्‍या प्रकारचा अपराध त्‍या प्रकारची शिक्षा देण्‍यामध्‍ये रघुवंशीय राजे प्रसिद्ध होते. प्रभु रामचंद्रांच्‍या राजवटीत अपराध्‍यांना दंड देण्‍याचा अधिकार ऋषी मंडळाकडे होता. स्‍वार्थीपणा, चारित्र्यहीनता असे दोष रामराज्‍यातील कोणत्‍याही अधिकार्‍यात आढळून येत नव्‍हते. रघुवंशातील राजांनी आत्‍मशासनाचा संस्‍कार मानवी समाजावर केलेला आढळतो. तसेच समाजातील प्रत्‍येक माणसाच्‍या अंत:करणातील शुद्धतेचे दर्शन घडत होते. नकळत जरी आपल्‍या हातून एखादा अपराध घडला, तर त्‍यावर स्‍वतःच स्‍वतःला शिक्षा देण्‍यासाठी आग्रही भूमिका घेणारा स्‍वयंशासित समाज रघुवंशातील राजांनी निर्माण केला होता.

५. रघुवंशीय राजांमधील आदर्श प्रभु श्रीराम !

समाजातील लोकांचे प्रबोधन करण्‍याचे महत्त्वपूर्ण कार्य रघुवंशातील राजांनी केले. हा त्‍यांचा श्रेष्‍ठतम गुण आहे. भगवंतासाठी आणि भगवंताच्‍या विश्‍वासावर केलेली कामे म्‍हणजेच कर्मे माणसासह येतात. कीर्ती, वैभव आणि स्‍वार्थ यांसाठी केलेली कर्मे भौतिक जगात उपयोगी पडतात. त्‍याची फळेही याच भौतिक जगात भोगावी लागतात. योग्‍य वेळी सावध राहून भगवंताचे कार्य करण्‍यासाठी धडपडणारे रघुवंशातील राजे आदर्श राजे म्‍हणून ओळखले जातात.

प्रभु रामचंद्र हे त्‍याचे उत्तम उदाहरण आहे. रघुवंशातील राजे विश्‍व विजयी झाले; पण त्‍यांनी इतर राज्‍यांना जिंकून मांडलिक केले नाही. प्रभु श्रीरामांनी वालीचा वध केला. त्‍यानंतर ती किष्‍किंधानगरी वालीचा भाऊ सुग्रीव यांच्‍या हवाली केली. त्‍यालाच त्‍या नगरीचे सम्राट पद बहाल केले. श्रीरामांनी रघुकुलाचा वारसदार किष्‍किंधानगरीवर राजा म्‍हणून लादला नाही. त्‍याचप्रमाणे श्रीरामांनी रावणाचा वध केल्‍यावर त्‍याचा भाऊ बिभीषणाला लंकेचे राज्‍य दिले. बिभीषण लंकेचा सत्ताधीश झाला.

६. गृहस्‍थाश्रमातील एक आदर्श जीवन प्रभु श्रीरामांनी दाखवणे

ध्‍येय, पवित्र, मांगल्‍य यांचा विस्‍तार करणारे ते संतान (संतती) होय. ‘पित्‍याने घेतलेल्‍या, पाळलेल्‍या जीवननिष्‍ठा पुढे अखंड चालू रहाव्‍यात म्‍हणून त्‍यांच्‍या हाती सोपवण्‍यासाठी संतती आणि पुत्र हवेत’, अशी आपली संस्‍कृती सांगते. रघुवंशातील राजांना संतती धर्मरक्षण, जीवनमूल्‍ये आणि जीवननिष्‍ठा यांची जोपासना करण्‍यासाठी हवी होती. या कारणासाठीच त्‍यांनी गृहस्‍थाश्रम स्‍वीकारला आणि एक आदर्श जीवन समाजासमोर उभे केले.

रघुवंशातील राजाने अनासक्‍त होऊन विषयांचा उपभोग घेतला. प्रभु श्रीरामांनी आपल्‍या वर्तनातून हे दाखवून दिले. युवराज म्‍हणून राज्‍याभिषेकासाठी श्रीरामांनी सिद्धता केली; पण नंतर लगेच त्‍यांना वनवासात जायला सांगितले. युवराजाची वस्‍त्रे परिधान करतांना त्‍यांची जी मनोवस्‍था होती, तीच मनोवस्‍था वनवासात जाण्‍यासाठी वल्‍कले धारण करतांना होती.

७. रघुवंशातील राजांमध्‍ये मुनीवृत्ती आढळणे

रघुवंशातील राजे अनुभव, ज्ञान आणि भाव यांमध्‍ये पुढे होते. अशा जीवनविषयक चिंतनात रघुवंशातील राजांनी स्‍वतः आपले जीवन व्‍यतीत केले. ध्‍येय आणि ईश्‍वर निष्‍ठा या दोन महान वटवृक्षांच्‍या छायेत रघुवंशातील राजांनी संसारनिष्‍ठा जोपासली. थोडक्‍यात रघुवंशातील राजांमध्‍ये मुनीवृत्ती आढळते.

मुनीवृत्तीचे दोन अर्थ आहेत –

अ. जो मननशील आहे, त्‍याला मुनी म्‍हणतात.

आ. ज्‍याच्‍या इंद्रियांनी मौन स्‍वीकारले आहे, त्‍याला मुनी म्‍हणतात.रघुवंशातील राजांची इंद्रिय लालसा नगण्‍य होती. कोणत्‍याही गोष्‍टीची अभिलाषा त्‍यांच्‍या मनाला स्‍पर्श करू शकली नाही. त्‍यामुळे अभिलाषेकडे इंद्रिये कधीही आकर्षित झाली नाहीत. रघुवंशातील राजांनी योगसाधनेच्‍या सहाय्‍याने देहत्‍याग केला. माणसाने भगवंताशी कर्म आणि ज्ञान यांनी स्‍वतःला जोडले पाहिजे. भगवंतावर दृढ श्रद्धा आणि निष्‍ठा ठेवून रघुवंशातील राजांनी कर्मयोग साधला. सत्ता, वैभव, कीर्ती यांपैकी कोणत्‍याही गोष्‍टीची भुरळ त्‍यांना पडली नाही.

(साभार : ‘रघुवंश’, महाकवी कालिदास)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (७.३.२०२३)