सामूहिक भावजागृतीचे प्रयोग घेतल्‍याने आसपासचे वातावरण पालटून तेथे प्रत्‍यक्ष भगवंत आल्‍याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘१३.४.२०२१ ते २१.४.२०२१ या कालावधीत, म्‍हणजेच चैत्र नवरात्री आरंभ ते श्रीरामनवमी या कालावधीत ‘महर्षी अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत विभागातील संगीताशी संबंधित एका साधिकेने प्रतिदिन भावजागृतीचा प्रयोग सांगायचा आणि सर्वांनी भाव अनुभवायचा’, असे ठरले होते. त्‍या वेळी साधिका कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेल्‍या चांगल्‍या आणि त्रासदायक अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

कु. रेणुका कुलकर्णी

१. सौ. अनुपमा कानस्‍कर

१ अ. प्रयोग : ‘सुंदर वृक्ष आहे. त्‍याच्‍यावर सुंदर वेली आहेत. त्‍या खाली प्रभु श्रीराम, सीता माता आणि श्री लक्ष्मण बसलेले आहेत. तेव्‍हा ‘सुंदर वेलींमुळे वृक्ष श्रेष्‍ठ कि वृक्षामुळे वेली श्रेष्‍ठ आहेत’, असा प्रश्‍न निर्माण होतो. ‘यात दोन्‍ही श्रेष्‍ठ’, असे लक्ष्मण सांगतो.

१ आ. प्रयोगाच्‍या वेळी कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेला अनुभव : वरील प्रयोगात ‘प्रत्‍यक्ष अवतार असूनही स्‍वतःकडे कर्तेपणा न घेता एकमेकांना श्रेष्‍ठत्‍व देतात’, असे शिकायला मिळाले. हा प्रयोग अनुपमाताई सांगत असतांना ‘तो वृक्ष डोळ्‍यांपुढे आला आणि त्‍या सुंदर वेलींना स्‍पर्श करून वार्‍याची आल्‍हाददायक झुळूक मला स्‍पर्श करत आहे’, असे मला जाणवले. त्‍यामुळे मला हलके वाटले. ‘मी श्री लक्ष्मणाच्‍या समवेत हा संवाद तिथे बसून ऐकत आहे’, असे मला अनुभवता आले. त्‍या सुंदर वेली, तो वृक्ष, सीता, प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना पहात असतांना काही क्षण ‘स्‍व’ला विसरायला झाले आणि मला शांत वाटले.

२. सौ. शुभांगी शेळके

२ अ. प्रयोग : रामनाथी आश्रमात असलेले हिंदु राष्‍ट्र स्‍वतःमध्‍ये कसे रुजवायचे ?

२ आ. प्रयोगाच्‍या वेळी  कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेला अनुभव : या प्रयोगात ३ – ४ मिनिटे माझे मन निर्विचार झाले; परंतु हा प्रयोग अधिक काळ अनुभवता आला नाही. तेव्‍हा ‘मला त्रास देणारी अनिष्‍ट शक्‍ती मी प्रयोग अनुभवू नये; म्‍हणून मला त्रास देत आहे’, असे जाणवले.

३. कु. म्रिण्‍मयी केळशीकर

३ अ. प्रयोग : रामसेतू बांधतांना ज्‍या दगडांवर ‘श्रीराम’ लिहिले नव्‍हते, ते दगड समुद्रात बुडाले आणि ‘श्रीराम’ लिहिलेले दगड पाण्‍यावर तरंगले. आपण सतत देवाच्‍या अनुसंधानात राहून हलके होऊया,  म्‍हणजे आपणही या भवसागरातून तरून जाऊ.

३ आ. प्रयोगाच्‍या वेळी कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेला अनुभव : वरील प्रयोग घेण्‍यापूर्वी दिवसभर मला विविध शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक त्रास होत होते. वातावरणातही जडत्‍व जाणवत होते. प्रयोगापूर्वी ‘आज साधक अल्‍प आहेत, तर प्रयोग घ्‍यायला नको’, असा विचार आला; परंतु म्रिण्‍मयीने प्रयोग घेतल्‍यावर माझे मन आणि बुद्धी यांवर आलेले अनिष्‍ट शक्‍तीचे आवरण नष्‍ट होऊन मला हलके वाटले.

४. सौ. भक्‍ती कुलकर्णी

४ अ. प्रयोग : प्रभु श्रीरामाची सेवा मारुतिरायाने अतिशय भक्‍तीभावाने केली आणि श्रीरामाची कृपा संपादन केली. सर्व साधकांनीही श्रीरामस्‍वरूप असणार्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची सेवा त्‍यांना अपेक्षित अशी आणि समर्पितभावाने करून त्‍यांची कृपा संपादन करावी.

४ आ. प्रयोगाच्‍या वेळी कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेला अनुभव : सौ. भक्‍ती कुलकर्णी यांनी घेतलेल्‍या प्रयोगात माझे मन जड झाले होते. मला त्रासही होत होता. ‘मला त्रास देणारी अनिष्‍ट शक्‍ती प्र्रयोग करण्‍यास विरोध करत आहे’, असे जाणवत होते. गुरुदेवांनीच माझ्‍याकडून हा प्रयोग चालू ठेवला. तेव्‍हा ‘प्रयोगाच्‍या शेवटी सौ. भक्‍ती यांच्‍या जवळ सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले उभे आहेत आणि ते सौ. भक्‍ती यांचे कौतुक करत आहेत’, असे मला दिसले. ते तिला सूक्ष्मातून म्‍हणाले, ‘शाब्‍बास ! भावजागृतीचा प्रयोग छान घेतलास !’

५. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के)

५ अ. प्रयोग : आरंभी श्रीरामाला आर्त भावाने प्रार्थना करून श्रीरामस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना आत्‍मनिवेदन केले. ते अतिशय भावपूर्ण असल्‍याने साधकांची भावजागृती झाली.

५ आ. प्रयोगाच्‍या वेळी कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेला अनुभव : कु. तेजल यांनी भावजागृतीचा प्रयोग घेण्‍यास आरंभ केल्‍यावर माझे मन एकाग्र झाले. त्‍यांच्‍या बोलण्‍यामुळे माझा स्‍थूलदेह हलका होत गेला. त्‍यानंतर ‘सूक्ष्मदेह हा स्‍थूलदेह सोडून हळूहळू वरच्‍या दिशेने जात आहे’, असे मला जाणवले. मधेच एखादा शब्‍द कानावर पडत होता. दोन शब्‍दांनंतर तोही ऐकू येईनासा झाला. ‘मी कुठेतरी वेगळीकडेच आहे’, असे मला जाणवत होते. तेथे २ – ४ वेळा ‘राम राम’ हा जप झाला आणि नंतर मन पूर्णपणे शांत झाले. मला एका पोकळीत गेल्‍याप्रमाणे जाणवले. नंतर काही क्षण ‘काय झाले ? मी कुठे आहे ?’, हे मला कळले नाही. काही क्षणांनी स्‍थूलदेहाची जाणीव झाली. तोपर्यंत ‘स्‍थूलदेह आता सुटलेलाच आहे आणि आत्‍मा वेगळाच प्रवास करत आहे’, असे जाणवले. प्रयोगानंतर काही वेळ शांत आणि त्‍यानंतर काही वेळ आनंद जाणवत होता. जसजसा भावाचा परिणाम उणावत होता, तसतशी शांती उणावून आनंदावस्‍था आणि नंतर केवळ भाव अन् नंतर नेहमीप्रमाणे वाटू लागले. या अनुभूतीचा पूर्ण कालावधी साधारण तीन ते साडेतीन घंटे होता.

६. कु. म्रिणालिनी देवघरे

६ अ. प्रयोग : आपण एका रम्‍य नगरीत जात असून तिथे उत्‍साहाचे वातावरण आहे. त्‍या वातावरणात दैवी सुगंध येत असून त्‍या दैवी सुगंधाच्‍या दिशेने आपण सगळे जात आहोत. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला सुंदर रांगोळ्‍या काढल्‍याने सगळीकडे भावपूर्ण वातावरण आहे. थोड्याच वेळात आपण एका राजमहालात पोचलो. तिथे साक्षात् प्रभु श्रीरामाच्‍या रूपात परात्‍पर गुरु डॉक्‍टर बसले आहेत. आपल्‍याकडे पाहून स्‍मितहास्‍य करत गुरुदेव म्‍हणाले, ‘तुम्‍ही जिथे आहात, तिथे रामराज्‍यच आहे. जिथे भाव-भक्‍ती, श्रद्धा आणि क्षात्रतेज आहे, तिथे रामराज्‍य असते. असेच राज्‍य आपल्‍याला सर्वत्र आणायचे आहे.’ श्रीरामाच्‍या रूपात गुरुदेवांना बघून माझी भावजागृती होत आहे.

६ आ. प्रयोगाच्‍या वेळी कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेला अनुभव : कु. म्रिणालिनी देवघरे यांनी घेतलेल्‍या प्रयोगात पुष्‍कळ आनंद होत होता. मनात आनंदाचे कारंजे उडत होते.

७. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

७ अ. प्रयोग : ‘प्रभु श्रीरामाच्‍या भेटीची हनुमंताप्रमाणे नाही, तर किमान अंशात्‍मक आर्तता तरी अंतरी जागृत व्‍हावी’, अशी माझी प्रार्थना झाली. त्‍यानंतर ‘रामनाथी आश्रम म्‍हणजे अयोध्‍यानगरी आहे. पाय धुतो ती जागा आणि ते जल म्‍हणजे शरयू नदी आहे. येथे प्रत्‍यक्ष श्री सिद्धिविनायक प्रभु चरणी लीन होण्‍याची बुद्धी आणि माता भवानी प्रभु श्रीरामरूपी गुरुदेवांशी एकरूप होण्‍यासाठी शक्‍ती देत आहे.’ अशा आर्तभावात परात्‍पर गुरुदेवांच्‍या श्रीरामरूपाच्‍या चरणांशी मी दास्‍यभावात रहाण्‍याची याचना करत आहे.

७ आ. प्रयोगाच्‍या वेळी कु. रेणुका कुलकर्णी यांना आलेला अनुभव : प्रयोग करत असतांना माझ्‍या मनात अपराधीभाव जागृत झाला. या भावप्रयोगाच्‍या माध्‍यमातून अनेक मासांपासून मनात असलेला हा अपराधीभाव आज जागृत झाला. माझ्‍या मनावर माझ्‍याकडून कळत नकळत घडलेल्‍या अनंत अपराधांचे ओझे होते. ‘प्रयोगात अश्रूंच्‍या माध्‍यमातून प्रभु चरणांशी सर्व अपराधांबद्दल केलेली क्षमायाचना पोेचली’, असे जाणवून मला पुष्‍कळ हलके वाटत होते. स्‍थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले काळ्‍या (त्रासदायक) शक्‍तीचे आवरण नष्‍ट होत होते, चैतन्‍याचे थर जमा होऊन, आनंद आणि भाव यांची माझ्‍या अनाहतचक्राच्‍या जवळ निर्मिती होऊन मला हलके हलके वाटत होते. दोन ते तीन मासांनी परात्‍पर गुरुदेवांच्‍या सगुण रूपाचे, एकदा प्रभु श्रीरामाच्‍या रूपाचे, तर एकदा गुरुदेवांच्‍या रूपाचे दर्शन होत होते. इतके दिवस हे सर्व करायची इच्‍छा असूनही ते होत नव्‍हते. ‘ते माझ्‍या हातात नाहीच’, याची प्रकर्षाने जाणीव होत होती. ‘प्रत्‍यक्ष प्रभु श्रीरामाने मला त्‍यांच्‍या कुशीत घेतले आहे’, असे जाणवत होते. ‘आता भगवंताची दासी बनून केवळ गुरुसेवाच करायची आहे’, हे एकच ध्‍येय आहे’, असे सतत वाटत होते. त्‍यासाठी शरणागतभावाने आणि आर्ततेने प्रार्थना होत होती. ‘संपूर्ण प्रयोगात आसपासचे वातावरण राममय झाले आहे’, असे जाणवत होते. मधेच ‘राम राम’ हा नामजप शांतपणे ऐकू येत होता. मधेच स्‍थिरता वाटत होती. अशा प्रकारे स्‍थिरता, भावजागृती, अपराधीपणा, आनंद, शरणागती, असे संमिश्रभाव अनुभवून शेवटी मला पुष्‍कळ कृतज्ञ वाटत होते.

८. सामूहिक भावजागृतीचे प्रयोग करतांना कु. रेणुका कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे !

८ अ. सामूहिक भावजागृतीचे प्रयोग करतांना नकारात्‍मकता नष्‍ट होऊन आनंद मिळणे : आध्‍यात्मिक त्रासाची तीव्रता अधिक असल्‍याने काही वेळा मला ‘एकटीने भावजागृतीसाठी प्रयोग करावे’, असे वाटत नाही. सामूहिक भावजागृतीचे प्रयोग करतांना मला होणार्‍या त्रासाची तीव्रता अल्‍प असते. माझ्‍यातील नकारात्‍मकता नष्‍ट होऊन सकारात्‍मकता निर्माण होते. त्रास होत असल्‍यास काही क्षणांत तो उणावून प्रत्‍यक्ष भावजागृती अनुभवता येते. ती टिकण्‍याचा, तो परिणाम अनुभवण्‍याचा कालावधी अधिक असतो. माझ्‍या मनाचा संघर्ष होत नाही. क्षणिक झालाच, तर त्‍यावर मात केली जाते. मनात वेगळाच उत्‍साह निर्माण होऊन पुढील कृती आनंदाने केली जाते.’

– कु. रेणुका कुलकर्णी, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२५.४.२०२१)

सामूहिक भावजागृतीचे प्रयोग घेतल्‍याने होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना झालेले लाभ

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

१. ‘जडत्‍व नष्‍ट होऊन स्‍थूलदेहाचे अस्‍तित्‍वच नाहीसे होते.

२. भगवंताशी त्‍वरित अनुसंधान साधले जाणे 

इतर वेळी नामजपादी उपाय करतांना अनुसंधान निर्माण होण्‍यासाठी प्रार्थना आणि कृतज्ञता व्‍यक्‍त करावी लागते अन् देहावरील आवरण काढावे लागते. त्‍यानंतरही काही वेळा नामजप लिहून किंवा फिरत असतांना करणे, असेही करावे लागते. या प्रयोगाच्‍या वेळी भगवंताशी लगेच अनुसंधान साधले जाते.

३. संघभावना निर्माण होणे

सामूहिक भावजागृतीचे प्रयोग करतांना सहसाधकांबद्दलही भाव निर्माण होऊन संघभावना निर्माण होते. ‘सगळेच भगवंताचे आहोत, सर्वांनाच भगवंताजवळ जायचे आहे आणि जाणार आहोत’, असा भाव निर्माण होऊन आनंद होतो.

४. आसपासचे वातावरण पालटून भावजागृतीच्‍या प्रयोगाच्‍या ठिकाणी प्रत्‍यक्ष भगवंत येत असल्‍याची अनुभूती येणे

कधी कधी माझ्‍या वैयक्‍तिक अडचणींमुळे, उदासीनतेमुळे, स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे साधनेचे प्रयत्न करतांना मनात विकल्‍प किंवा शंका येऊन ‘जे प्रयत्न होत आहेत, ते योग्‍य आहेत का ? मला देव भेटेल का ?’, अशा शंकांमुळे माझी श्रद्धा अल्‍प पडते. जेव्‍हा सामूहिक भावजागृतीचा प्रयोग होतो, तेव्‍हा आसपासचे वातावरण पालटून तेथे प्रत्‍यक्ष भगवंत आल्‍याची अनुभूती येते. त्‍यामुळे दिवसभरात ज्‍या उद्देशाने व्‍यष्‍टी साधना आणि सेवा करत आहोत, त्‍याची अंशात्‍मक अनुभूती येते आणि ‘ईश्‍वरप्राप्‍ती निश्‍चितच होईल’, असा भाव निर्माण होतो.

या भावप्रयत्नांमुळे मला खरंच भावावस्‍थेत रहाता आले. केवळ भगवंत, भगवंत आणि भगवंतच या विचाराने माझे मन भरून आले. ‘हे गुरुदेवा, केवळ तुमच्‍याच कृपेने हे शक्‍य आहे. देवा, तूच कृपा कर. तूच ते करवून घे आणि अखंड भावावस्‍थेत ठेव. मी तुला पूर्णत: शरण आले आहे.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२५.४.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक