सातारा येथे प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्तींची विक्री करण्‍यास प्रतिबंध !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २७ मार्च (वार्ता.) – पर्यावरणाची हानी टाळण्‍यासाठी शासनाने प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्ती निर्माण करण्‍यास आणि त्‍याची विक्री करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे. याविषयीचे नियम अधिक कडक करण्‍यात आले आहेत, अशी माहिती सातारा नगरपालिकेतील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवाविषयी देहली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पारित केलेल्‍या १२ मे २०२० या दिवशीच्‍या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्‍याही विषारी, अजैविक कच्‍चा माल जसे की, पारंपरिक चिकणमाती आणि माती, तसेच प्‍लास्‍टिक आणि थर्माकोलविरहित नैसर्गिक, जैव विघटनशील, पर्यावरणास अनुकूल असलेल्‍या कच्च्या मालापासून बनवलेल्‍या मूर्तींना प्रोत्‍साहन आणि अनुमती देण्‍यात यावी. प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्तींवर बंदी घालण्‍यात यावी, असे सुचवण्‍यात आले आहे.

धार्मिक उत्‍सव साजरे करतांना नैसर्गिक जलस्रोतांच्‍या गुणवत्तेवर आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्‍चित करण्‍यासाठी नियम सिद्ध करण्‍यात आले आहेत. याविषयी मुंबई उच्‍च न्‍यायालयात ‘रिट पिटीशन’ प्रविष्‍ट करण्‍यात आले असून ही गोष्‍ट न्‍यायप्रविष्‍ट आहे.