#Exclusive : खेड (जिल्हा रत्नागिरी) बसस्थानकावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

खेड, २५ मार्च (वार्ता.) – खेड बसस्थानकाच्या परिसरात इतके खड्डे आहेत की, बसगाड्या बसस्थानकाच्या बाहेर काढेपर्यंत गाडीत आसनावर बसलेल्या प्रवाशांची मोठी कसरत होते. मागील अनेक मासांपासून बसस्थानकाच्या आवारात असलेले हे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. यामुळे बसस्थानकाच्या परिसरात वावरतांनाही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

बसस्थानकावरील खड्डे आणि त्यांमध्ये साजलेले पाणी

चालक-वाहक यांच्या विश्रामगृहाकडे जाणारा लोखंडी जीना अतिशय जीर्ण होऊन त्याच्या २ पायर्‍या तुटल्या आहेत. मागील अनेक वर्षे ही अशी स्थिती आहे. येथील भिंतींवर शेवाळ साचले आहे; मात्र ते काढले जात नाही. त्यामुळे हे शेवाळ हळूहळू संपूर्ण भिंतीवर पसरून भिंती अतिशय विद्रूप झाल्या आहेत. चालक-वाहक यांच्यासाठी असलेल्या बेसिनचे भांडे शेवाळ आणि बुरशी यांनी काळवंडले आहे. चालक-वाहक यांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाचे दरवाजे तुटलेले आहेत. प्रसाधनगृहातील बेसिनच्या टाईल्सही विद्रूप झाल्या आहेत. अनेक दिवस त्या स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत. चालक-वाहक यांच्या विश्रामगृहात कपडे, कागदपत्रे अस्ताव्यस्त ठेवण्यात आलेली आहेत. विश्रामगृहात चालक-वाहक यांचे कपडे ठेवण्यासाठी दोरी बांधण्यात आली आहे; मात्र त्यावर सर्व कपडे अस्ताव्यस्त ठेवण्यात येतात.

कर्मचार्‍यांच्या विश्रांतीगृहाकडे जाणार्‍या गंजून सडलेला लोखंडी जीना
विश्रांतीगृहात अस्ताव्यस्थ कपडे आणि कागदपत्रे
प्रसाधनगृहातील अस्वच्छ आणि टाईल्स तुटलेले बेसिन
प्रसाधनगृहातील तुटलेला दरवाजा
कचर्‍याच्या जाळीत साचलेल्या बाटल्या आणि बाहेर टाकण्यात आलेला कचरा

विश्रामगृहातील माळ्यावर ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांवर अतिशय धूळ साचली आहे. अनेक मास त्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याचे दिसून येते. बसस्थानकातील गाड्यांचीही दुरवस्था झाली आहे. काही गाड्यांना पत्रे ठोकून त्या वापरल्या जात आहेत.

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा !

आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्वीटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा.