#Exclusive : ‘तुंबलेली मुतारी आणि त्यातून बाहेर सोडण्यात आलेली घाण’ असे स्वच्छतेचे सोयरसुतक नसलेले आर्णी (यवतमाळ) बसस्थानक !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

श्री. दत्तात्रय फोकमारे, यवतमाळ

यवतमाळ, २४ मार्च (वार्ता.) – तुंबलेली मुतारी आणि त्यातून बसस्थानकाच्या परिसरात उघड्यावरच सोडण्यात आलेली त्यातील घाण यामुळे ‘डुकरांना लोळण्याचे ठिकाण वाटावे’, असा चिखल मुतारीच्या बाहेर साचला आहे. ‘लघुशंकेसाठी जायचे झाल्यास मुतारीची स्थिती पाहूनच प्रवासी माघारी फिरेल’, अशी बसस्थानकावरील मुतारीची अवस्था आहे. आर्णी बसस्थानकावरील अशी स्थिती पहाता, ‘एस्.टी. महामंडळ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवत असलेली मोहीम नेमकी कुठे राबवत आहे ?’ असा प्रश्‍न पडल्याविना रहात नाही.

मुतारीत लादीवर पसरलेले मूत्र

उघड्यावर सोडण्यात आलेल्या मूत्रामुळे झालेला चिखल
मुतारीतील तुटलेल्या फरशा
मुतारीतील पाण्याविना असलेले नुसते बेसीन

तुळजापूर-नागपूर महामार्गावरील या महत्त्वाच्या बसस्थानकाची स्थिती अस्वच्छतेमुळे अत्यंत दयनीय झाली आहे. बसस्थानकावर प्रवाशांसाठी असलेल्या मुतारीमध्ये स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्थाच नाही. लघुशंकेला जायचे झाल्यास दुर्गंधीतून वाट काढत आणि एका हाताने नाक दाबून जाण्याची वेळ प्रवाशांवर येते. मुतारीतील मूत्र परिसरात उघड्यावरच सोडण्यात येत आहे. ही स्थिती पाहून ‘एस्.टी. महामंडळाचा कसला अमृत महोत्सवी संकल्प आणि कसली स्वच्छता ?’ असा प्रश्‍न पडतो. संपूर्ण बसस्थानकात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी मुतारीत जाण्याऐवजी बसस्थानकाच्या मागच्या बाजूला उघड्यावर लघुशंका करतात. मुतारीतून बाहेर येत असलेल्या मूत्रामुळे बसस्थानकाच्या मागील परिसरात चिखल झाला आहे. त्यातच प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खाऊची वेष्टने टाकण्यात येतात. त्यामुळे सर्वत्र कचरा पसरलेला आहे.

पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही !

नळ आण पाणी नसलेली बंद अवस्थेतील पाणपोई

बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई बांधण्यात आली आहे; मात्र हे काम अनेक मास अर्धवट ठेवण्यात आले आहे. पाणपोईत ना पाणी आहे, ना नळ.  संपूर्ण बसस्थानकावरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतागृहात पाण्यासाठी एक नवीन बेसीन लावण्यात आले आहे; मात्र त्यात पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

खड्डेमय बसस्थानक !

खड्डे पडलेला बसस्थानकाचा परिसर

बसस्थानकाच्या परिसरात अनेक खड्डे आहेत. उन्हाळ्यात बसगाड्या गेल्यावर धूळ बसस्थानकावर पसरते, तर पावसाळ्यात बसस्थानकावरील खड्डयांत पाणी साचते. बसस्थानकावर डांबरीकरण नाही. बसस्थानकावर बाकड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना उभे रहावे लागते.

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा !

आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्वीटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा.