वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे. याविषयी अपहाराची कोणती तक्रार असेल, तर शासनाला त्याची माहिती द्या. वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले. ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेतील ४१ लाख झाडे लावण्यात आली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्नाच्या वेळी केला. यावर वनमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ष २०१९ पासून करण्यात आलेली वृक्ष लागवड आणि जगलेल्या झाडांची टक्केवारी सभागृहात सादर केली. या वेळी मुनगंटीवार म्हणाले, ‘‘वृक्ष लागवडीच्या कामात अपहार झाल्याचे उदाहरण दिल्यास ३ मासांच्या आत अन्वेषण पूर्ण करण्यात येईल. काही मिथ्या तक्रारी असतात. त्यातून कुणा निर्दाेषी व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. झाड लावल्यानंतर ५ वर्षांनी ते जिवंत रहाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असते. प्रत्येक आमदाराने आमदार निधीतून २५ लाख रुपयांपर्यंतचा निधी त्यांच्या मतदारसंघात एखादे उद्यानाच्या निमिर्तीसाठी द्यावा. जिवंत रहाण्यासाठी सर्वजण प्राणवायू घेतात; मात्र त्या बदल्यात निसर्गाला आपण काय देतो ? त्यामुळे वृक्षलागवडीची योजना ही केवळ सरकारी कर्मचार्‍यांपुरती मर्यादित राहू नये, तर ती एक लोकचळवळ व्हावी.’’