कोलकाता (बंगाल) येथे स्‍थायिक असलेले मूळचे जर्मनी येथील रुद्रवीणावादक पं. कास्‍टन विकी (Carsten Wicke) यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट !

‘रुद्रवीणेच्‍या धीरगंभीर स्‍वरांनी श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध करणारे पं. कास्‍टन विकी यांनी २७.१.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट दिली. त्‍या वेळी त्‍यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संगीत आणि नृत्‍य यांविषयीच्‍या संशोधनाचे कार्यही जाणून घेतले. ते पणजी येथे २६.१.२०२३ या दिवशी ‘अनाम प्रेम’ संस्‍थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या रुद्रवीणावादनाच्‍या कार्यक्रमासाठी गोव्‍यात आले होते. या कार्यक्रमाला महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संगीत आणि नृत्‍य विभागातील साधक उपस्‍थित होते. त्‍या वेळी साधकांनी पं. कास्‍टन विकी यांना संशोधन केंद्राला भेट देण्‍याचे निमंत्रण दिले होते.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन सदस्‍य श्री. शॉन क्‍लार्क (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) आणि सौ. श्‍वेता शॉन क्‍लार्क यांनी त्‍यांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत अन् नृत्‍य यांविषयीच्‍या संशोधन कार्यासमवेतच अन्‍य संशोधन कार्यही सांगितले. या वेळी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक कु. तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) याही उपस्‍थित होत्‍या. हे कार्य पाहून पं. कास्‍टन विकी प्रभावित झाले. त्‍यांनी या कार्यात योगदान देण्‍याची आणि या संशोधन केंद्रामध्‍ये येऊन काही काळ राहून संगीत संशोधनात सहभागी होण्‍याची इच्‍छा प्रगट केली.

९ मार्च २०२३ या दिवशीच्‍या दैनिकात या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.             

(भाग २)

भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/660777.html

६. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या कार्याविषयी पं. कास्‍टन विकी यांनी काढलेले गौरवोद़्‍गार !

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

६ अ. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्रातील वातावरण आणि येथे साधकांना आध्‍यात्मिकदृष्‍ट्या केले जाणारे मार्गदर्शन, हे सर्वच वैशिष्‍ट्यपूर्ण आहे ! : पणजी येथे प्रथम भेटीत महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधक-कलाकारांनी त्‍यांचे संगीत आणि नृत्‍य यांविषयीचे संशोधन थोडक्‍यात सांगितल्‍यावर पं. कास्‍टन विकी म्‍हणाले, ‘‘हे करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे समाजातील बुद्धीवादी वर्गामध्‍ये यात रुची निर्माण होईल’, असे वाटून मी संशोधन केंद्रात येण्‍याचा निर्णय घेतला.’’ महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन कार्याची पीपीटी (टीप) पाहिल्‍यावर पं. कास्‍टन विकी यांना ती पुष्‍कळ आवडली. ते म्‍हणाले, ‘‘प्राचीन काळी लोकांना अशा प्रकारे मोजमाप करण्‍याची आवश्‍यकता भासली नाही; कारण त्‍यांची ऋषिमुनींच्‍या शब्‍दावर श्रद्धा होती. त्‍यांना आलेल्‍या अनुभवांवर लोक विश्‍वास ठेवत होते. आताच्‍या २१ व्‍या शतकात प्रत्‍येकाला प्रमाण हवे आहे. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्रातील वातावरण आणि येथे साधकांना आध्‍यात्मिकदृष्‍ट्या केले जाणारे मार्गदर्शन, हे सर्वच वैशिष्‍ट्यपूर्ण आहे.’’

टीप – पीपीटी : Power Point Presentation, माहिती सादर करण्‍याची एक संगणकीय पद्धत

६ आ. ‘संशोधन केंद्रात एवढ्या लहान वयात संगीत आणि साधना यांविषयी विचार करणारी तरुण मुले आहेत’, याचा मला आनंद झाला आणि आश्‍चर्य वाटले : संशोधन केंद्र पहातांना त्‍यांना ‘या केंद्रात आणि संगीत विभागात एवढी तरुण मुले आहेत’, हे बघून आनंद झाला. सध्‍याची बहुतांश तरुण पिढी संगीताचा खरा आनंद प्राप्‍त करू शकत नाही. ‘साधना ही शक्‍यतो वयाच्‍या ५० व्‍या वर्षानंतर करायची असते’, असा विचार समाजात केला जातो. भारतीय संगीत हे स्‍वतःच्‍या खर्‍या स्‍वरूपाचा अनुभव करून देते. त्‍यामुळे (गाणार्‍याचा किंवा ऐकणार्‍याचा) हा देह २० वर्षांचा आहे किंवा ५० वर्षांचा आहे, याने काही फरक पडत नाही. हे संगीत आपण समवेत ठेवले, तर त्‍यातून ईश्‍वरप्राप्‍ती होते. त्‍यामुळे ‘संशोधन केंद्रात एवढी तरुण मुले आहेत’, याचा मला आनंद झाला.

७. ‘अनाम प्रेम’ या संस्‍थेच्‍या वतीने आयोजित कार्यक्रमात पं. कास्‍टन विकी यांचे रुद्रवीणावादन ऐकतांना साधकांना आलेल्‍या अनुभूती

७ अ. कु. रेणुका कुलकर्णी, कवळे, गोवा.

१. ‘पं. कास्‍टन विकी यांचे वादन ऐकतांना मला ध्‍यान लागल्‍याप्रमाणे वाटले.

२. त्‍यांच्‍या मनातील स्‍थिरता आणि त्‍यांची साधना त्‍यांच्‍या वादनात दिसून येत होती.

३. वादन करतांना त्‍यांनी खर्ज, म्‍हणजेच खालचे स्‍वर वाजवले. ते ऐकतांना ‘त्‍यातून ‘ॐ’कार नाद येत आहे’, असे वाटले आणि भगवान शिवाचे स्‍मरण होऊन माझी पुष्‍कळ भावजागृती झाली.’

७ आ. कु. म्रिणालिनी देवघरे, फोंडा, गोवा. (३.२.२०२३)

१. ‘पं. कास्‍टन विकी यांनी राग ‘शुद्ध सारंग’ वाजवला. त्‍या वेळी आपतत्त्व जाणवून ‘पाऊस पडत आहे’, असे मला जाणवले.

२. वादन चालू असतांना मला माझ्‍या अनाहतचक्रावर संवेदना जाणवली.

३. माझ्‍याकडून भगवान श्रीकृष्‍णाचे स्‍मरण सतत होत होते.

७ इ. कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे), फोंडा, गोवा. 

१. ‘पं. कास्‍टन विकी यांनी रुद्रवीणेवर राग ‘शुद्ध सारंग’ वाजवल्‍यावर मला वातावरणात कृष्‍णतत्त्व जाणवू लागले.

२. मला माझे आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांवर स्‍पंदने जाणवू लागली, तसेच काही वेळाने मला आनंदाची स्‍पंदने जाणवत होती.

३. डोळे मिटल्‍यावर मला सूक्ष्मातून प्रकाश दिसत होता.

४. नंतर मला देवीतत्त्व जाणवू लागले आणि श्री भवानीदेवीचे स्‍मरण झाले.

५. वातावरणात काही प्रमाणात मारक तत्त्वही जाणवू लागले.

संकलक : सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२७.२.२०२३)

(समाप्‍त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक