कोलकाता (बंगाल) येथे स्‍थायिक असलेले मूळचे जर्मनी येथील रुद्रवीणावादक पं. कास्‍टन विकी (Carsten Wicke) यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट !

पं. कास्‍टन विकी

‘रुद्रवीणेच्‍या धीरगंभीर स्‍वरांनी श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध करणारे पं. कास्‍टन विकी यांनी २७.१.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट दिली. त्‍या वेळी त्‍यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संगीत आणि नृत्‍य यांविषयीच्‍या संशोधनाचे कार्यही जाणून घेतले. ते पणजी येथे २६.१.२०२३ या दिवशी ‘अनाम प्रेम’ संस्‍थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या रुद्रवीणावादनाच्‍या कार्यक्रमासाठी गोव्‍यात आले होते. या कार्यक्रमाला महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संगीत आणि नृत्‍य विभागातील साधक उपस्‍थित होते. त्‍या वेळी साधकांनी पं. कास्‍टन विकी यांना संशोधन केंद्राला भेट देण्‍याचे निमंत्रण दिले होते.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन सदस्‍य श्री. शॉन क्‍लार्क (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) आणि सौ. श्‍वेता शॉन क्‍लार्क यांनी त्‍यांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत अन् नृत्‍य यांविषयीच्‍या संशोधन कार्यासमवेतच अन्‍य संशोधन कार्यही सांगितले. या वेळी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक कु. तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) याही उपस्‍थित होत्‍या. हे कार्य पाहून पं. कास्‍टन विकी प्रभावित झाले. त्‍यांनी या कार्यात योगदान देण्‍याची आणि या संशोधन केंद्रामध्‍ये येऊन काही काळ राहून संगीत संशोधनात सहभागी होण्‍याची इच्‍छा प्रगट केली.

परिचय

पं. कास्‍टन विकी हे मूळचे जर्मनी येथील असून सध्‍या ते कोलकाता (बंगाल) येथे स्‍थायिक झालेे आहेत. पूर्वायुष्‍यात बालपणी त्‍यांनी व्‍हायोलिन आणि पाश्‍चात्त्य संगीताचे धडे घेतले होते. त्‍यानंतर तरुण वयात भारतीय संगीतामुळे प्रभावित होऊन त्‍यांनी वर्ष १९९० मध्‍ये पं. अनिंदो चॅटर्जी (चटोपाध्‍याय) यांच्‍याकडे तबला शिकण्‍यास प्रारंभ केला. तेव्‍हा त्‍यांची ओळख प्राचीन धृपद संगीताशी झाली. त्‍यातून ते रुद्रवीणेकडे वळले. त्‍यांना उस्‍ताद असद अली खान हे गुरु म्‍हणून लाभले. त्‍यांच्‍याकडे ते पारंपरिक खंडारबानी धृपद शैलीतील रुद्रवीणावादन शिकले. भोपाळमधील धृपद केंद्रातील सध्‍याचे दिग्‍दर्शक आणि शिक्षक

श्री. आशिष सांकृत्‍यायन यांच्‍या समवेत डागरबानी शैलीच्‍या धृपदाच्‍या गायन परंपरेचा अभ्‍यास केल्‍याने कास्‍टन यांचे वीणावादन परिपूर्ण झाले. त्‍यांचे रुद्रवीणावादनाचे कार्यक्रम देश-विदेशात होतात. ते या कलेमध्‍ये अनेक शिष्‍यही सिद्ध करत आहेत.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

१. पं. कास्‍टन विकी यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधक-कलाकारांविषयी काढलेले कौतुकोद़्‍गार !

पणजी येथील कार्यक्रमात प्रथम भेटीतच पं. कास्‍टन विकी यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्रामध्‍ये येण्‍याच्‍या निमंत्रणाला सहजतेने होकार दिला. याविषयी सांगतांना ते म्‍हणाले, ‘‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयातील साधक-कलाकारांनी माझ्‍या रुद्रवीणावादनाच्‍या कार्यक्रमाच्‍या वेळी त्‍यांना आलेल्‍या विविध अनुभूती सांगितल्‍या. तेव्‍हा त्‍यांच्‍या सूक्ष्म अनुभूती ऐकून मला त्‍यांची सूक्ष्म दृष्‍टी भावली. अशी सूक्ष्म दृष्‍टी अन्‍य कुणामध्‍ये आढळून येत नाही. त्‍यामुळेच माझ्‍या मनात ‘संशोधन केंद्रात जाऊन तेथील कार्य बघावे’, असा विचार तीव्रतेने आला.’’

२. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला भेट दिल्‍यावर साधकांमधील ‘मनमोकळेपणा आणि सहजता’, या गुणांमुळे त्‍यांनी साधकांशी लगेच जवळीक साधली.

३. पं. कास्‍टन विकी यांनी सांगितलेले रुद्रवीणावादनाचे वैशिष्‍ट्य

३ अ. रुद्रवीणावादन ही आंतरिक यात्रा असून हे वादन अंतर्मुख करणारे असते ! : सर्व रुद्रवीणावादक हे स्‍वतः गायकही असतात. ते गायनाचे प्रस्‍तुतीकरण करत नाहीत. रुद्रवीणेद्वारे त्‍यांच्‍या आतल्‍या आवाजाचे (गायनाचे) प्रस्‍तुतीकरण केले जाते. ‘मला स्‍वतःला आतून काय वाटते ?’, हे मी रुद्रवीणेवर वाजवून व्‍यक्‍त करतो. रुद्रवीणावादन ही आंतरिक यात्रा आहे. हे वादन अंतर्मुख करणारे आहे. त्‍यामुळे ज्‍यांना मोठा कलाकार (स्‍टार) व्‍हायचे असेल किंवा व्‍यासपीठ गाजवायचे आहे, त्‍यांच्‍यासाठी हे वाद्य नाही.

४. पं. कास्‍टन विकी यांचा रुद्रवीणेप्रतीचा भाव !

४ अ. रुद्रवीणा हे माझे सर्वस्‍व आहे ! : ‘रुद्रवीणेविषयी काय वाटते ?’, असे विचारले असता ते म्‍हणाले, ‘‘Rudraveena is my life. Rudraveena is my wife. It’s my everything. याचा अर्थ, रुद्रवीणा माझे आयुष्‍य असून ती माझी जीवनसाथी आहे आणि माझे सर्वस्‍वही आहे. ‘मला ही (रुद्रवीणा) शिकवली गेली’, याविषयी मी कृतज्ञ आहे. मला अनेक विद्यार्थी भेटतात. त्‍यांना मी सांगतो, ‘‘आयुष्‍यात काहीतरी असे मिळवा, ज्‍याला काहीतरी अर्थ आहे. ते करतांना तुम्‍ही अन्‍य सर्वकाही विसराल. तशी मला रुद्रवीणा मिळाली आहे. हीच माझ्‍यासाठी भक्‍ती आहे. हाच माझा आयुष्‍यातला उच्‍च स्‍तर आहे.

४ आ. रुद्रवीणा हा एक वैश्‍विक आवाज असून त्‍यासाठीच मी जर्मनी सोडून भारतात येऊन वीणा सिद्ध केली ! : ‘मी रुद्रवीणाच का निवडली ? बासरी किंवा सतार का नाही ?’, असा प्रश्‍न मला अनेकांनी विचारला. हा प्रश्‍न मीसुद्धा स्‍वतःला विचारला. प्रत्‍येक वादक त्‍याचे वाद्य निवडतो. गायकाचे वाद्य हा त्‍याचा गळा आहे. रुद्रवीणेच्‍या मूळ गाभ्‍यात प्रवेश केल्‍यास तुमच्‍या लक्षात येईल की, हे कुठलेही प्रादेशिक वाद्य नाही. हा तर एक वैश्‍विक आवाज आहे. त्‍यामुळेच मी जर्मनी सोडून भारतात येऊन राहिलो. ही वीणा सिद्ध केली आणि यात माझे आयुष्‍य खर्ची घातले.’’

५. पं. कास्‍टन विकी यांनी सांगितलेले भारतीय संगीताचे महत्त्व

५ अ. भारतीय संगीत हृदयाला भिडणारे असून त्‍याला एक खोली आहे ! : ‘मी रुद्रवीणेकडे कसा वळलो ?’, हे सांगतांना ते म्‍हणाले, ‘‘मी बालपणी पाश्‍चात्त्य व्‍हायोलिन शिकलो. त्‍यानंतर मी जेव्‍हा भारतात आलो, तेव्‍हा मला भारतीय संगीत अधिक आवडले. भारतीय संगीत हे लिखित स्‍वरूपात नाही.

गायन आणि वादन करतांना त्‍या क्षणाला आपली जी मनःस्‍थिती असते, तसेच व्‍यासपिठावर बसतांना आपल्‍याला जे जाणवते, ते त्‍या संगीतातून व्‍यक्‍त होते. याउलट पाश्‍चात्त्य संगीत हे लिखित आणि आधीच बनवलेले (precomposed) असते. याचा अर्थ ‘पूर्वीच्‍या कलाकारांनी त्‍यांच्‍या मनःस्‍थितीनुसार निर्माण केलेले संगीत मी पुन्‍हा वाजवायचे’, असे पाश्‍चात्त्य संगीताचे स्‍वरूप आहे. ते संगीत म्‍हणून चांगलेच आहे; परंतु बांधलेले संगीत वाजवल्‍यामुळे कलाकाराच्‍या सृजनशीलतेला त्‍यात वाव नाही. भारतीय संगीत हे हृदयाला भिडते आणि त्‍याला एक खोली आहे.’’

५ आ. ‘भारतीय संगीताची शक्‍ती आधुनिक काळात समाजाला काय देऊ शकते ?’, हे मी भारताबाहेरचा असल्‍याने अधिक चांगल्‍या प्रकारे सांगू शकतो ! : या जन्‍मात मी भारताबाहेर जन्‍माला आलो असून तेथून भारतात आलो आहे. त्‍यामुळे मी भारतीय संगीताच्‍या शक्‍तीची प्रशंसा करू शकतो. ‘ही शक्‍ती कुठून आली ? ती या आधुनिक काळात समाजाला काय देऊ शकते ?’, हे मी भारताबाहेरचा असल्‍याने अधिक चांगल्‍या प्रकारे सांगू शकतो. भारतात जन्‍माला आलो असतो, तर मला तेवढे सांगता आले नसते.’’  (क्रमशः)

संकलक : सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२७.२.२०२३)

भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/665269.html