२९६ रोग वगळून ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने येणार !

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – ज्या रोगांवर उपचार घेतले जात नाहीत, असे २९६ रोग वगळून पुढील मासात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने आणण्यात येईल आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. ‘या योजनेमध्ये मनोविकारांचा समावेश करण्यात येईल का ?’ याविषयी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर बोलतांना आरोग्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना डॉ. तानाजी सावंत म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये एकूण १ सहस्र २०९ रोगांचा समावेश आहे. ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तून वगळण्यात येणार्‍या रोगांऐवजी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’तील आवश्यक रोगांचा समावेश त्यात करण्यात येईल. ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’त ५ मनोविकारांचा समावेश असून सदस्यांनी सुचवलेल्या अन्य ५ मनोविकारांचा योजनेत समावेश करण्यात येईल.’’