पारंपरिक मासेमारांची हानी टाळण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर बंदी आणावी !

भाजपचे आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी

प्रकाशझोतातील मासेमारी

मुंबई – प्रकाशझोतात केली जाणारी (एल्.इ.डी.) मासेमारी ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक मासेमारांसाठी समस्या ठरली आहे.  या पद्धतीच्या मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारांची मोठी हानी होत आहे. त्यामुळे एल्.ई.डी. मासेमारी थांबवली जावी. केंद्र आणि राज्य शासन यांनी समन्वय साधून ही समस्या सोडवावी, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केली.

आमदार नितेश राणे, भाजपा

विधानसभेत २० मार्च या दिवशी राज्यातील मासेमारांच्या विविध मागण्यांविषयी आमदार राजन साळवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सहभागी होत आमदार राणे यांनी ‘कोकणातील ‘एल्.ई.डी.’ पद्धतीची मासेमारी बंद होणार का ?’, असा प्रश्न उपस्थित केला. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नावर उत्तर देतांना सांगितले, ‘‘एकत्रित चर्चा करून सोडवायच्या प्रश्नात एल्.ई.डी. मासेमारीचा प्रश्न आहे. यावर लवकरच निर्णय घेऊ.’’

या वेळी आमदार नितेश राणे म्हणाले, ‘‘मंत्री मुनगंटीवार यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये येथील मत्स्य महाविद्यालयाची उभारणी, मासेमारांना डिझेल परतावा मिळणे, असे अनेक विषय योग्य पद्धतीने हाताळले आहेत. एल्.ई.डी. मासेमारीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे एल्.ई.डी. मासेमारीचा विषय त्याच पद्धतीने हाताळावा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक मासेमारांची यातून सुटका करावी.’’