उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद़्गुरु सत्यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त… !
सद़्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञापूर्वक नमस्कार !
चैत्र शुक्ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सद़्गुरु सत्यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला त्यांच्यातील काही गुणांचे घडलेले दर्शन आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. साधिकेला आध्यात्मिक त्रास होत असतांना तिला सूक्ष्मातून सद़्गुरु सत्यवान कदम यांचे दर्शन होणे आणि तिचा त्रास उणावणे
‘मी काही दिवस कुडाळ सेवाकेंद्रात असतांना मला सद़्गुरु सत्यवान कदम यांचा सत्संग लाभला. मला कुडाळ सेवाकेंद्रात येऊन २ दिवस झाले होते. त्या २ – ३ दिवसांत सद़्गुरु सत्यवानदादा सेवाकेंद्रात नव्हते. एक दिवस सकाळी उठतांना मला आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा मी अर्धवट झोपेत होते. त्या वेळी ‘सद़्गुरु दादा माझ्या खोलीत आले आहेत आणि त्यांच्या देहातून पांढरा प्रकाश बाहेर पडून मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले अन् माझा त्रास उणावला. तेव्हा ‘संत सूक्ष्मातून कसे कार्य करतात ?’, हे माझ्या लक्षात आले.
२. सद़्गुरु सत्यवान कदम यांचे सूक्ष्मातील जाणण्याचे सामर्थ्य
दोन दिवस मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा सद़्गुरु दादांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सर्व साधकांच्या नामजपादी आध्यात्मिक उपायांचा आढावा घेतला. त्यामुळे माझ्यामध्ये नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्य निर्माण झाले.
३. सद़्गुरु सत्यवान कदम यांनी साधिकेला तिच्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषावर मात करण्यासाठी दिलेला अनमोल दृष्टीकोन आणि त्याचा साधिकेला झालेला लाभ
सद़्गुरु सत्यवान कदम घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात बसण्याची मला संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना माझ्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषामुळे मला होत असलेल्या त्रासांविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘भगवंताने आपल्याकडून साधना करून घेऊन आपल्याला काही विशिष्ट पातळीपर्यंत आणलेले असते. अनिष्ट शक्ती आपल्या मनात भावनाशीलतेचे विचार घालतात. त्यामध्ये आपण अडकून राहिल्याने आपली साधनेत घसरण होते. त्यामुळे आपण त्या विचारांकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.’’
त्यानंतर सद़्गुरु दादांनी सांगितलेला दृष्टीकोन घेऊन मी स्वयंसूचना सत्रे गांभीर्याने केल्यावर मला भावनाशीलता उफाळून येणार्या प्रसंगांतून बाहेर पडता आले. सद़्गुरु दादांनी सांगितलेला दृष्टीकोन माझ्या अंतर्मनावर कोरण्याचे कठीण कार्य त्यांनीच केले. ‘हे कार्य संतच करू शकतात’, असे मला वाटते.
४. अनुभूती
४ अ. सद़्गुरु सत्यवानदादांमध्ये हनुमंताचे रूप दिसणे : एकदा मला सद़्गुरु दादा सेवाकेंद्राच्या खालच्या आणि वरच्या माळ्याच्या मार्गिकेत ये-जा करतांना दिसले. एरव्ही कधी ते अशी ये-जा करत असल्याचे मला दिसले नव्हते. मला त्यांच्यामध्ये मारुतीचे पूर्ण रूप दिसले. मला मारुतीचे तेजःपुंज शेपूटही दिसले. जणू काही ‘मारुतिराया युद्धात टेहळणी (दुरून लक्ष ठेवणे, पहाणी करणे) करतात, तसे सद़्गुरु दादा टेहळणी करून अनिष्ट शक्तींच्या आक्रमणाची दिशा शोधून काढून त्यावर उपाय काढत आहेत’, असे मला जाणवले. आश्रमाच्या रक्षणासाठी सद़्गुरूंच्या माध्यमातून प्रत्यक्ष हनुमंतच टेहळणी करत असल्याचे जाणवून मला मनोमन पुष्कळ कृतज्ञता वाटली.
स्वतःच्या आचरणातून आनंद देऊन आमच्या मनाची मरगळ घालवणार्या आणि गुरुस्मरणाची आठवण करून देणार्या सद़्गुरु सत्यवानदादांच्या चरणी आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२२)
साधकाने ‘सेवा हे गुरुकृपेचे माध्यम आहे’, हे लक्षात घेऊन भावपूर्ण सेवा करावी ! – सद़्गुरु सत्यवान कदम |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |