सनातनच्या संतांची एकमेकांप्रती असलेली आगळी-वेगळी प्रीती आणि आदरभाव !

सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई यांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने… !

पू. सीताराम देसाई

‘४.१.२०२३ या दिवशी पू. (सौ.) मालिनी देसाई (सनातनच्या ५२ व्या व्यष्टी संत, वय ७६ वर्षे) आणि पू. सीताराम देसाई (सनातनचे ५३ वे व्यष्टी संत, वय ८२ वर्षे) यांची पू. महेंद्र क्षत्रीय (सनातनचे ४३ वे व्यष्टी संत, वय ७० वर्षे) अन् त्यांची मुले (कु. सिद्धि क्षत्रीय (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), कु. अमृता क्षत्रीय आणि श्री. कौस्तुभ क्षत्रीय) यांनी भेट घेतली. तेव्हा आम्हा कुटुंबियांना पू. देसाईआजोबा आणि पू. (सौ.) देसाईआजी यांच्यातील प्रीती अनुभवता आली.

पू. सीताराम देसाई यांच्या चरणी ८२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. पू. देसाईआजोबा आणि पू. (सौ.) देसाईआजी यांच्या वागण्यातील अनुभवलेला आदरभाव !

पू. (सौ.) मालिनी देसाई

पू. बाबा (पू. महेंद्र क्षत्रीय) आणि आम्ही कुटुंबीय पू. देसाईआजोबा अन् पू. (सौ.) देसाईआजी यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी लगेच आम्हाला बसायला सांगितले. आम्ही सर्व जण बसेपर्यंत पू. आजोबा आणि पू. (सौ.) आजी बसले नाहीत.

२. पू. देसाईआजोबांमधील वात्सल्यभाव !

कु. सिद्धि क्षत्रीय

त्यांनी आम्हा सर्वांना पुष्कळ आग्रहाने खाऊ आणि चहा दिला. चहा गरम असल्याने पू. बाबा तो गार होण्यासाठी थांबले होते. ‘पू. बाबा चहा घ्यायचे थांबले आहेत’, हे पाहून पू. आजोबांनी पू. बाबांचा चहा बशीत ओतून गार केला आणि स्वतःच पू. बाबांना पाजला.

३. पू. देसाईआजोबांच्या बोलण्यातील गोडवा !

कु. अमृता क्षत्रीय

पू. आजोबा त्यांच्या शेतीची देखरेख करायचे, तेव्हाचे त्यांचे अनुभव सांगत होते. ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटत होते. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला संत सावता महाराज यांची आठवण झाली.

४. ‘देव सर्व देण्यासाठीच देतो’, असा भाव असलेले पू. देसाईआजोबा !

श्री. कौस्तुभ क्षत्रीय

पू. आजोबांनी आम्हा सर्वांना खाऊ दिला. ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे काही नाही. सर्व काही तो (देव) देतो. देव आपल्याला देतो, ते घेण्यासाठी नाही, तर देण्यासाठी आहे !’’

५. संतांचे आध्यात्मिक स्तरावरील बोलणे

पू. महेंद्र क्षत्रिय

पू. बाबांनी पू. आजोबा आणि पू. (सौ.) आजी यांच्यासाठी आणलेला खाऊ त्यांना दिला. तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.

पू. आजोबा : तुम्ही कशाला एवढा त्रास घेता ? (खाऊ आणायचा त्रास कशाला घेता ?)

पू. बाबा (पू. क्षत्रीय) : मी कुठे आणतो ? (बोट वर करून) हे तोच देतो (देवच देतो).

पू. आजोबा : असे बोलून तुम्ही मला गप्प केले !

पू. (सौ.) आजी (पू. क्षत्रीय यांना) : तुमचे जेवण झाले ना ? तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या. फार वेळ बसून पाठ दुखेल.

पू. बाबा (पू. क्षत्रीय) : आनंद आहे.

पू. आजोबा : आपण एकमेकांशी बोलतो (सत्संग होतो), हीच विश्रांती ! झोपतो ती नाही.

‘या प्रसंगातून संतांचे बोलणे आध्यात्मिक स्तरावर कसे असते’, हे आम्हाला शिकायला मिळाले.

६. संतांची एकमेकांप्रती असलेली प्रीती आणि आदरभाव !

त्यांच्या खोलीतून निघतांना आम्ही पू. (सौ.) आजी आणि पू. आजोबा यांना नमस्कार केला. पू. (सौ.) आजींनी पुष्कळ प्रेमाने आणि मायेने ‘‘देव बरे करो’’, असा आम्हा कुटुंबियांना आशीर्वाद दिला. पू. आजोबा पू. बाबांचा हात धरून उद्वाहनापर्यंत (लिफ्टपर्यंत) सोडायला आले. आम्ही सर्व जण उद्वाहनामध्ये जाईपर्यंत पू. आजोबा उद्वाहनापाशी उभे राहिले होते.

यातून आम्हाला संतांची एकमेकांप्रती असलेली अपार प्रीती अनुभवता आली.’

– कु. सिद्धि क्षत्रीय (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा, कु. अमृता क्षत्रीय, नाशिक आणि श्री. कौस्तुभ क्षत्रीय, नाशिक. (२१.२.२०२३)