पृथ्वीवर उतरून हेरगिरी करत आहेत ‘एलियन्स !’ – अमेरिकेची चेतावणी

(एलियन्स म्हणजे परग्रहावरील जीव)

वॉशिंग्टन – अमेरिका अज्ञात ‘उडत्या तबकड्या’ (परग्रहवासियांची विमाने) या सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. अमेरिकेचा विश्‍वास आहे की, एलियन्स अस्तित्वात असून ते सूर्यमालेत आहेत. त्याविषयीच्या संशोधनावर अमेरिका प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय ‘पेंटागॉन’ने एक चेतावणी दिली आहे. त्यामध्ये एलियन्स त्यांचे हेर पृथ्वीवर पाठवत असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

१. पेंटागॉनच्या चेतावणीमध्ये म्हटले आहे की, सूर्यमालेतील इतर ग्रहांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ ज्या प्रकारे उपकरणे वापरते, त्याच प्रकारे एलियन्स ‘मदरशिप’चा (मुख्य आणि मोठ्या विमानाचा) वापर करतात. पेंटागॉनच्या अधिकार्‍यांनी चेतावणी दिली आहे की, एलियन्स आपल्या सूर्यमालेत असू शकतात आणि ते पृथ्वीविषयी गुप्त माहिती पाठवत आहेत.

पेंटागॉनने वाढवली चिंता !

वर्ष २०२२ मध्ये पेंटागॉनच्या ‘ऑल-डोमेन अनोमली रिझोल्यूशन ऑफिस’ची स्थापना करण्यात आली. ‘ऑल-डोमेन अनोमली रिझोल्यूशन ऑफिस’चा मुख्य उद्देश ‘अज्ञात गोष्टींचा मागोवा घेणे’, हा आहे; मग ती वस्तू आकाशात असो, बाहेरील अवकाशात असो किंवा अगदी पाण्याखाली असो. नासाप्रमाणेच एलियन मदरशिपही काम करत आहे, असे ‘ऑल-डोमेन अनोमली रिझोल्यूशन ऑफिस’चे निर्देशक सीन किर्कपेट्रिक यांनी सांगितले.

मदरशिपचा दावा

‘उडत्या तबकड्यां’विषयी अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉन अनेक वर्षांपासून शोधकार्य करत आहे. त्याचा एक अभ्यासगट मदरशिपचा दावा करते. पेंटागॉनचे ‘उडत्या तबकड्या’ विभागाच्या प्रमुखांच्या मते सौर यंत्रणेत एक मदरशिप असू शकते, ज्यावर एलियन्स कदाचित् रहात असतील.

‘उडत्या तबकड्या’ पृथ्वीवर हेरगिरी करू शकतात !

‘ऑल-डोमेन अनोमली रिझोल्यूशन ऑफिस’चे संचालक सीन किर्कपेट्रिक यांनी लिहिले आहे की, एक कृत्रिम आंतरतारकीय वस्तू पृथ्वीच्या जवळ आल्यावर विविध प्रकारची माहिती गोळा करून घेऊन जाऊ शकते. या छोट्या वस्तूला शास्त्रज्ञांनी ‘ओमुअमुआ’ असे नाव दिले आहे.

चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल !

काही दिवसांपूर्वी एक चमत्कारिक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. यामुळे लांब, पातळ, पेन्सिल आकाराच्या ‘ओमुअमुआ’चा शोध लागला. ही एक अज्ञात आंतरतारकीय वस्तू होती. अनेक शास्त्रज्ञांना वाटले की, या ‘उडत्या तबकड्या’ असू शकतात. याविषयीचे संशोधन पुढे चालू ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या आकाशातून एलियन्सने प्रवास केल्याचा दावा केला होता. याविषयीचा एक व्हिडिओ बनवण्यात आला होता.