छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ आज ‘सकल हिंदु समाजा’चा भव्य मोर्चा !

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ १९ मार्च या दिवशी शहरातून ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. संत, धर्माचार्यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा मोर्चा निघणार आहे. सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून या मोर्च्यास प्रारंभ होईल. २४ फेब्रुवारी या दिवशी शहराच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर या नामांतराला एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. या नामांतराच्या विरोधात त्यांनी चालू केलेले साखळी उपोषण सकल हिंदु समाज मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर स्थगित केले आहे.

विविध धर्माचार्यांसह सकल हिंदु समाजाच्या प्रतिनिधींनी भूमिका मांडतांना, ‘हा मोर्चा कोणताही धर्म आणि नेते यांच्या विरोधात नाही. केवळ देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला समर्थन देण्यासाठी हा मोर्चा आहे’, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. हिंदूंनी सहस्रोंच्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांना आमंत्रण देण्यात येणार आहे.