देशभक्‍तीचे धडे देणारे प्रसिद्ध निबंधलेखक विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर !

आज १७ मार्च २०२३ या दिवशी ‘विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर स्‍मृतीदिन’ आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या चरणी विनम्र अभिवादन !

‘१७ मार्च १८८२ या दिवशी अर्वाचीन मराठी वाङ्‍मयातील प्रसिद्ध निबंधलेखक आणि टीकाकार विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर यांचे निधन झाले.

अव्‍वल इंग्रजीतील प्रसिद्ध पंडित कृष्‍णशास्‍त्री चिपळूणकर यांचे हे ज्‍येष्‍ठ चिरंजीव. महाविद्यालयामध्‍ये असतांनाच विष्‍णुशास्‍त्री यांना विद्याव्‍यासंगाचा नाद लागला. वडिलांनी चालू केलेल्‍या रासेलसच्‍या भाषांतराचे काम पूर्ण करून विष्‍णुशास्‍त्री यांनी आत्‍मविश्‍वास संपादन केला. हे शिक्षण संपल्‍यावर ते ‘पूना हायस्‍कूल’मध्‍ये शिक्षकाचे काम पाहू लागले. पुढे त्‍यांचे स्‍थानांतर रत्नागिरी हायस्‍कूलमध्‍ये झाले. विद्यार्थ्‍यांच्‍या मनात स्‍वाभिमान निर्माण करून त्‍यांना देशभक्‍तीचे धडे देण्‍याची महनीय कामगिरी विष्‍णुशास्‍त्री करत होते.

वर्ष १८७४ मध्‍ये त्‍यांनी स्‍वतःचे प्रसिद्ध असे ‘निबंधमाला’ मासिक चालू केले. त्‍यामुळे मराठी भाषेत एक नवीन युगच चालू झाले. विष्‍णुशास्‍त्री यांनी ओजस्‍वी लिखाण करून मराठी भाषा आणि महाराष्‍ट्रीय लोक यांच्‍यात आत्‍मविश्‍वास निर्माण केला. इंग्रजांनी राजकीय पारतंत्र्यासह मानसिक गुलामगिरीही पराकाष्‍ठेची निर्माण केली होती. तिचा प्रतिकार करण्‍यास तितकाच कठोर आक्रमण करणारा पुरुष निर्माण व्‍हायला हवा होता. तो विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर यांच्‍या रूपाने पुढे आला. धर्म, चालीरिती, वाङ्‍मय आदींची जितक्‍या उत्‍कटतेने पायमल्ली चालली होती, तितक्‍याच उत्‍कटतेने प्रतिआक्रमण करणारे चिपळूणकर होते. त्‍यांनी देशातील विचारांची दिशाच पालटण्‍याचे काम केले. स्‍वत्‍वापासून भ्रष्‍ट झालेल्‍या महाराष्‍ट्रात विचार जागृती करून आत्‍मनाशापासून परावृत्त करण्‍याची श्रेष्‍ठ कामगिरी चिपळूणकर यांनी केली.

‘निबंधमाला’ मासिकाचे ८ वर्षांत एकूण ८४ अंक प्रकाशित झाले. त्‍यात मुख्‍यत्‍वे करून भाषाविषयक, सामाजिक, राजकीय वाङ्‍मयीन असेच निबंध होते. त्‍या निबंधांच्‍या वाचनाने पुढे मराठी साहित्‍यात एक चांगली पिढी निर्माण झाली. ‘चित्रशाळा’, ‘किताबखाना’ नावाचे पुस्‍तकांचे दुकान, दैनिक ‘केसरी’ मराठी भाषेतील आणि ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र चालू केले. त्‍यांनी पुण्‍यात ‘न्‍यू इंग्‍लिश स्‍कूल’ची स्‍थापना केली. असे महान देशभक्‍त असलेले विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर यांचे अवघ्‍या ३२ व्‍या वर्षी निधन झाले.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्‍हाद नरहर जोशी)