शौचालयामध्‍ये चपलेचा वापर करणे अत्‍यावश्‍यक का आहे ?

वैद्य समीर मुकुंद परांजपे

‘जंत म्‍हणजे कृमी होण्‍याची अनेक कारणे आहेत. बाजारामधील अनेक उत्‍पादने कृमींची वाढ होण्‍यासाठी पूरक असतात. यांच्‍या चिकित्‍सेसाठीसुद्धा अनेक औषधे वारंवार घेतली जातात. तरीही त्‍यांचा हा त्रास अल्‍प होत नाही, असे लक्षात येते. यांमध्‍ये आहारीय कारणांचा शोध घेऊन ती बंद करता येतात; पण विहारीय (दैनंदिन कृतीतील) कारणांमधील एक दुर्लक्षित कारण, म्‍हणजे शौचालयामध्‍ये चपलेचा वापर न करणे होय.

गावामध्‍ये पुरेशी जागा असल्‍याने घराच्‍या बाहेर शौचालय असते. त्‍या तुलनेत शहरामध्‍ये जागेची उपलब्‍धता अल्‍प असल्‍याने घर किंवा सदनिकेमध्‍येच शौचालय असते. एक तर शहरातील ही अशी रचना अयोग्‍य आहे. त्‍यात अधिक अयोग्‍य म्‍हणजे अनेक लोक शौचालयामध्‍ये चप्‍पल न घालता जातात आणि बाहेर आल्‍यावर तळपाय अन् पाय स्‍वच्‍छ धुवत नाहीत.

शौचालयाची कितीही स्‍वच्‍छता केली, तरी त्‍यात कृमींची अंडी असतात. आपले पाय आणि तळपाय यांच्‍यामध्‍ये असणारी त्‍वचा म्‍हणजे बोटांच्‍या पेरांमधील त्‍वचा पुष्‍कळ नाजूक असते. त्‍या त्‍वचेतून सूक्ष्म कृमी शरिरातील रक्‍तात जातात. रक्‍त आणि शरिरातील अन्‍य द्रवांच्‍या प्रवाहासह हे कृमी सर्व शरिरामध्‍ये संचार करतात. हृदय, फुफ्‍फुस आणि अगदी मेंदूपर्यंत पोचतात. शेवटी ते आतड्यांचा आश्रय घेतात; कारण त्‍यामध्‍ये त्‍यांना त्‍यांचे खाद्य सहज मिळते. तिथे राहून ते रक्‍त पिण्‍याचे कार्य करतात. त्‍यामुळे त्‍या व्‍यक्‍तीने कितीही अन्‍न खाल्ले, तरी त्‍याच्‍या शरिरामध्‍ये रक्‍ताल्‍पता असणे, अंगी न लागणे, थकवा येणे, पित्ताचे विकार, अपचन, मळमळणे, उलट्या, जुलाब, अधोवात होणे (गुदद्वाराद्वारे वायू बाहेर पडणे), खोकला, दमा, अंगाला खाज येणे, मानस विकार, अशी कृमींच्‍या लक्षणांची पुष्‍कळ मोठी सूची आहे.

हे सर्व त्रास टाळण्‍यासाठी कृमी होण्‍याच्‍या कारणांमधील एक दुर्लक्षित कारण टाळा, म्‍हणजेच शौचालयामध्‍ये चपलेचा वापर निश्‍चितच करा आणि प्रत्‍येक वेळी पायांची स्‍वच्‍छता योग्‍य प्रकारे करा. यामुळे शरिरात कृमी प्रवेशित होण्‍याचा एक मार्ग आपण बंद करू शकू आणि निरोगी राहू शकू !’

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (५.१.२०२३)

(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])

(https://youtu.be/OHbHoXmVLM0)