वस्‍तू आणि सेवा कर अपव्‍यवहार प्रकरणातील आरोपी सिराजउद्दीनला अटक !

वस्‍तू आणि सेवा कर पुणे विभागाची कारवाई

पुणे – वस्‍तू आणि सेवा कराची (जी.एस्.टी.) ७० कोटी रुपयांची बनावट देयके सादर करून १२ कोटी ५९ लाख रुपयांचा परतावा मिळवल्‍या प्रकरणी ‘ओलायन डेस्‍कॉन इंडस्‍ट्रियल कंपनी’चा प्रवर्तक सिराजउद्दीन चौधरी याला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. ही कारवाई जी.एस्.टी.च्‍या महाराष्‍ट्र विभागाच्‍या पुणे अन्‍वेषण पथकाने केली आहे.

‘ओलायन’ आस्‍थापनाचे ४ पुरवठादार अस्‍तित्‍वात नसतांनाही त्‍याने ७० कोटी रुपयांची बनावट देयके सादर केली. त्‍याकरता त्‍याने मालाच्‍या खरेदीच्‍या पावत्‍या सादर केल्‍या नाहीत. हा अपव्‍यवहार उघडकीस आल्‍यानंतर सिराजउद्दीन पसार झाला होता. महाराष्‍ट्र वस्‍तू आणि सेवा कर विभागाने चालू आर्थिक वर्षामध्‍ये २०२२-२३ मध्‍ये केलेली ही ६८ वी कारवाई आहे. अनेक जण करचोरी करून परराज्‍यात जाऊन लपतात, अशा आरोपींनाही अटक करण्‍यात आली आहे.