सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या सत्‍संगात साधकाने अनुभवलेले अनमोल क्षणमोती !

‘साधारणपणे वर्ष १९९७ मध्‍ये मिरज येथे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांची आणि माझी भेट झाली. त्‍या वेळी मी साधनेत नव्‍हतो. तेव्‍हा ‘साधना म्‍हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्‍हते आणि मला त्‍याविषयी गोडीही नव्‍हती. बेळगावला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन होते. त्‍यासाठी माझी पत्नी सौ. सुजाता गेली होती. त्‍यानंतर आम्‍ही रहात होतो, तेथे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे संपर्कासाठी आले होते. नंतर नकळतपणे मी त्‍यांच्‍याकडे ओढला गेलो. ‘ते कसे झाले ?’, ते त्‍या वेळी मला समजले नाही; पण तेव्‍हापासून मी साधना करायला लागलो. तेव्‍हापासून आजपर्यंत त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाका यांचा सत्‍संग मिळणे आणि साधनेला प्रारंभ होणे

१ अ. सद़्‍गुरु डॉ. पिंगळे यांच्‍या सत्‍संगामुळे साधनेविषयी जिज्ञासा निर्माण होणे : माझी ओळख झाल्‍यावर ते सकाळी कधी कधी आणि नंतर प्रतिदिन आमच्‍याकडे येत असत. ते मला सत्‍संग, परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍याविषयी नवीन नवीन गोष्‍टी सांगत असत. यातून त्‍यांनी आमच्‍यात जिज्ञासा निर्माण केली आणि आमची उत्‍सुकताही वाढली. अशातून त्‍यांची आणि आमची जवळीक पुष्‍कळ वाढली. ते कधी कधी त्‍यांच्‍या चिकित्‍सालयात जायचे विसरूनच जायचे, एवढे ते या सत्‍संगाच्‍या वेळी तल्लीन व्‍हायचे.

१ आ. व्‍यवसायामुळे सद़्‍गुरु डॉ. पिंगळे यांची भेट घेणे टाळणे; पण तरीही त्‍यांनी जवळीक साधणे : त्‍या वेळी माझा व्‍यवसाय चांगला चालला होता. सद़्‍गुरु डॉ. पिंगळे ज्‍या वेळी यायचे, त्‍या वेळी मला बांधकामाच्‍या जागेवर (साईटवर) जाणे अत्‍यावश्‍यक असायचे; म्‍हणून काही वेळा ‘ते येत आहेत’, असे लक्षात आल्‍यावर मी दुसर्‍या मार्गाने बाहेर जात असे. हेही त्‍यांना कळले; पण त्‍यांनी मात्र माझ्‍याशी जवळीक करणे सोडले नाही. हे त्‍यांचे खरे मोठेपण होते.

१ इ. साधकामध्‍ये साधनेची गोडी निर्माण करून त्‍याला सेवेची ओढ लावणारे सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाका ! : सद़्‍गुरु काकांनी माझ्‍यासाठी एवढा वेळ दिला की, त्‍यामुळे मी साधनेला आरंभ केला. नंतर अशी स्‍थिती आली की, माझे व्‍यवसायाकडे लक्ष न्‍यून झाले. मी त्‍यांच्‍या समवेत सत्‍संग, अभ्‍यासवर्ग आणि सभा यांच्‍या सेवेला जायला लागलो आणि मला त्‍यांची ओढ लागली. त्‍याचे कारण म्‍हणजे केवळ सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाका होते.

१ ई. वारकरी संप्रदायाच्‍या एका सत्‍संगामध्‍ये सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी एका श्‍लोकाचा पूर्ण अर्थ सांगणे, त्‍या वेळी प्रभावित होणे आणि ‘आपणसुद्धा अधिकाधिक साधना करावी’, असे वाटणे : एकदा मी त्‍यांच्‍या समवेत वारकरी संप्रदायाच्‍या एका सत्‍संगाला गेलो होतो. एक घंट्याने सत्‍संग संपणार होता आणि नंतर भक्‍तांची जेवायची वेळ होती. तेथे वारकर्‍यांनी आम्‍हाला विचारले, ‘‘काही सांगायचे आहे का ?’’ त्‍या वेळी सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाकांनी ‘वदनी कवळ घेता नाम घ्‍या श्रीहरीचे ।’, या श्‍लोकाचा पूर्ण अर्थ सांगून ‘यातून साधना कशी होते ? खरा यज्ञ कोणता आहे ?’, यांचे सुंदर वर्णन केले. मलाही ते पुष्‍कळ भावले आणि ‘हे पुष्‍कळ वेगळेच आहेत’, अशी अनुभूती आली. ‘इतके ज्ञान त्‍यांच्‍याकडे कसे काय ?’, असाही प्रश्‍न माझ्‍या मनात निर्माण झाला. ‘स्‍वतः एक आधुनिक वैद्य असूनही सर्व सोडून ते साधना करतात’, हे लक्षात आल्‍यावर माझी जिज्ञासा वाढली. ‘आपणसुद्धा अधिकाधिक साधना करावी’, असे मला वाटू लागले. त्‍यांनी मला पुष्‍कळ वेळ देऊन साधनेची गोडी लावली.

१ उ. सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाकांनी सनातनच्‍या ग्रंथांतील ज्ञान आत्‍मसात केलेले असणे : ‘त्‍या वेळी छापण्‍यात आलेल्‍या सनातनच्‍या प्रत्‍येक ग्रंथात काय आहे ? कुठल्‍या पानावर आहे अन् त्‍याचा उपयोग कसा करायचा ?’, हे त्‍यांना चांगलेच ठाऊक होतेे. त्‍यामुळे ते ग्रंथांचा आधार घेऊन सत्‍संगात वेगवेगळ्‍या प्रकारची उदाहरणे देत असत.

२. कशाचीही आसक्‍ती नसणे

‘सद़्‍गुरु काकांना स्‍वतःच्‍या जीवनात कशाचीच कधी आसक्‍ती नाही’, हे मी अनेकदा अनुभवले आहे. मिरजेला असतांना ते चटईवर झोपत असत. ‘गादी पाहिजे’, असा आग्रह त्‍यांनी कधीच धरला नाही.

३. ‘परात्‍पर गुरुदेवांना अपेक्षित सेवा कशी करायची ?’, हे स्‍वतःच्‍या कृतीतून शिकवणारे सद़्‌गुरु डॉ. पिंगळेकाका !

श्री. मधुसूदन कुलकर्णी

रामनाथी आश्रमात असतांना सद़्‍गुरु काका चिकित्‍सालयात सेवा करत होते. त्‍या वेळी मी रामनाथी आश्रमात रहायला आलो होतो. चिकित्‍सालयात सेवा करत असतांना ते सातत्‍याने जिन्‍यावरून खाली-वर करत होते. त्‍या वेळी विजेवर चालणारे उद़्‍वाहन (लिफ्‍ट) नव्‍हते. एकदा मी भोजनकक्षात अल्‍पाहार करत असतांना मला ते जिन्‍यावरून सारखे खाली-वर करत असलेले दिसले. तेव्‍हा मी सद़्‌गुरु काकांना विचारले, ‘‘सारखे खाली-वर का करता ?’’ त्‍या वेळी ते म्‍हणाले, ‘‘वर रुग्‍ण असतात ना ? ‘त्‍यांना काही होऊ नये; म्‍हणून त्‍यांची काळजी घेणे’, ही माझी सेवा आहे. त्‍यामुळे आवश्‍यकतेनुसार त्‍यांना बघायला जातो.’’ मी त्‍यांना विचारले, ‘‘पाय नाही का दुखत ?’’ तेव्‍हा ते मला म्‍हणाले, ‘‘सेवा करतांना तन-मन-धन अर्पण करायचे असते ना ? पायाचा कशाला विचार करायचा ?’’ ते पुढे म्‍हणाले, ‘‘सेवा परिपूर्ण व्‍हायला हवी. परम पूज्‍य डॉक्‍टरांना ती आवडायला हवी; म्‍हणून हे सर्व करतो.’’ त्‍यातून ‘सेवा कशी करावी ?’, याचा उत्‍कृष्‍ट परिपाठ त्‍यांनी घालून दिला. त्‍यासह ‘सेवेची तळमळ आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांविषयीचा भाव कसा असावा ?’, हे मला त्‍यांच्‍या वागण्‍यातून शिकायला मिळाले.

४. एका प्रसिद्ध अधिवक्‍त्‍यांंनी सद़्‌गुरु डॉ. पिंगळेकाकांना ‘गुरुत्‍वाकर्षण’ या विषयावर अनेक प्रश्‍न विचारणे आणि सद़्‌गुरु डॉ. पिंगळेकाकांनी दिलेल्‍या उत्तरामुळे प्रभावित झालेले अधिवक्‍ते नंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होणे

सद़्‌गुरु डॉ. पिंगळेकाकांच्‍या समवेत मी बर्‍याच ठिकाणी वैयक्‍तिक संपर्क करण्‍यासाठी जात असे. एकदा आम्‍हाला मिरजेतील एका प्रसिद्ध अधिवक्‍त्‍यांंना भेटण्‍याची संधी मिळाली. त्‍या वेळी नाम, सत्‍संग आणि सत्‍सेवा यांवर जास्‍त भर होता, तसेच सद़्‌गुरु पिंगळेकाका त्‍यागाचे महत्त्व सांगत असत. बोलता बोलता गुरुत्‍वाकर्षणाचा विषय निघाला. ते अधिवक्‍ता ‘गुरुत्‍वाकर्षण’ या विषयावर अनेक प्रश्‍न विचारायला लागले. त्‍यांनी ‘अलीकडचे शास्‍त्रज्ञ कसे श्रेष्‍ठ आहेत ?’, हे सांगायला प्रारंभ केला. त्‍या वेळी सद़्‍गुरु काकांनी तो विषय त्‍यांना अतिशय सुलभतेने समजावून सांगितला. ‘गुरुत्‍वाकर्षणाचा शोध आपल्‍या ऋषिमुनींनी लावला आहे’, सद़्‍गुरु काकांनी त्‍यांना हे सोदाहरण पटवून दिले. तेव्‍हा त्‍या अधिवक्‍त्‍यांना बोलताच येईना. त्‍यांनी शांतपणे सद़्‍गुरु काकांचे सर्व बोलणे समजून घेतले आणि ‘मला पटले’, असे सांगितले. यातून मला ‘त्‍यांचे ज्ञान आणि पटवून देण्‍याची हातोटी विलक्षण आहे’, याची प्रचीती आली. नंतर ते अधिवक्‍ता दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक झाले; कारण सद़्‍गुरु काकांच्‍या सत्‍संगाचा फार मोठा परिणाम त्‍यांच्‍यावर झाला होता.

५. ‘भाव कसा असला पाहिजे ?’, हे सद़्‍गुरु पिंगळेकाकांकडून शिकायला मिळणे

डोंबिवलीला एक सभा होती. त्‍या सभेच्‍या वेळी आम्‍ही एकत्र होतो. सभा सायंकाळी ५ वाजता होती. आम्‍ही सकाळी सेवेसाठी तिकडे गेलो होतो. सभा चालू होण्‍यापूर्वी साधकांना सत्‍संग मिळावा; म्‍हणून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या आवाजातील मार्गदर्शनाची ध्‍वनीचकती लावली होती. त्‍या मार्गदर्शनातील परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या आवाजातील पहिला शब्‍द ऐकतांनाच सद़्‍गुरु काकांची भावजागृती झाली. ते देहभान विसरून गेले आणि तिथे स्‍तब्‍धपणे उभे राहिले. ते माझ्‍यासाठी नवीन होते; पण ‘भाव कसा असला पाहिजे ?’, हे मला शिकायला मिळाले. ‘हेच शिकणे’, हे माझ्‍या दृष्‍टीने त्‍या सभेला गेल्‍याचे फलित आणि वैशिष्‍ट्य होते’, हे मला कधी विसरता आले नाही आणि येतही नाही.

६. एका संतांनी सद़्‍गुरु काकांकडे बघून लगेच ‘तुमची पूर्वजन्‍मीची साधना आहे’, असे सांगणे

आम्‍ही व्‍यवहारातील अडचणी सोडवणार्‍या आणि तंत्रमार्गाने साधना करणार्‍या मिरजेतील एका संतांकडे गेलो होतो. ‘त्‍या वेळी सद़्‍गुरु पिंगळेकाकांकडे बघून त्‍यांनी लगेच सांगितले, ‘‘आपली पूर्वजन्‍मीची साधना आहे.’’ ते संत ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने डॉ. पिंगळे पुढे संत आणि सद़्‍गुरु होणार’, याचीच निश्‍चिती देत होते’, असे आता आम्‍हाला वाटते.

७. सद़्‍गुरु पिंगळेकाकांनी ‘आध्‍यात्मिक पातळीप्रमाणे कोणते प्रयत्न करायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन !

अलीकडेच सद़्‍गुरु काकांची भेट झाली असता बोलतांना ते म्‍हणाले, ‘‘आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के झाली की, सतत कृतज्ञताभावात रहायचे आणि संत झालो की, सतत शरणागतभावात रहायचे. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर काय काय करतात ?’, ते केवळ पहात रहायचे. आपण काही करू शकत नाही. ‘देव सगळे करतो’, याची अनुभूती घ्‍यायची.’’

परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपाशीर्वादामुळे आजपर्यंत आम्‍हाला सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाकांचा सत्‍संग मिळाला, तसेच परात्‍पर गुरुदेवांनी ही सूत्रे शब्‍दबद्ध करून घेतली; म्‍हणून त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. मधुसूदन कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०२१)