साधकांच्‍या अडचणी दूर करून त्‍यांच्‍या साधनेला गती देणारे आणि साधकांना आपलेसे करून त्‍यांना घडवणारे सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर !

 १३.३.२०२३ या दिवशीच्‍या दैनिकात आपण पू. अशोक पात्रीकरकाका यांच्‍याविषयी साधकांना आलेल्‍या अनुभूतींचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/662056.html
पू. अशोक पात्रीकर

साधकांची साधना चांगली व्‍हावी, अशी तळमळ असणारे पू. अशोक पात्रीकर !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

१. पू. पात्रीकरकाकांच्‍या केवळ उपस्‍थितीनेही साधकांना उत्‍साह आणि चैतन्‍य मिळत असणे : ‘पू. पात्रीकरकाकांची ‘साधकांची साधना चांगली व्‍हावी’, याची पुष्‍कळ तळमळ आहे. पू. काका सर्व सत्‍संगांना उपस्‍थित असतात. त्‍यांच्‍याकडून साधकांना चैतन्‍य मिळते. केवळ त्‍यांच्‍या उपस्‍थितीने साधक उत्‍साही आणि सकारात्‍मक राहून व्‍यष्‍टी साधना अन् समष्‍टी सेवा करत आहेत. ‘पू. काकांना सांगितल्‍यावर लगेच अडचण सुटते’, असा अनुभव सर्वच साधकांना आला आहे.

२. साधकांना स्‍वभावदोषांच्‍या मुळाशी जायला शिकवणे : पू. काका व्‍यस्‍त असले, तरीही प्रतिदिन साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. त्‍यामुळे साधकांनाही शिस्‍त लागली आहे. ते घेत असलेल्‍या आढाव्‍यामुळे आम्‍हाला ‘चुकांच्‍या मुळाशी जाऊन प्रयत्न कसे करायचे ?’, हे शिकायला मिळाले.

३. साधकांनी चांगली कृती केली, तर पू. काका साधकांचे कौतुक करतात आणि ‘मलाही शिकायला मिळाले’, असे म्‍हणतात.’

– पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, वर्धा

१२. सौ. तुलसी सब्राह, रामनगर, वर्धा.

१२ अ. साधकांना वेळेचे गांभीर्य लक्षात आणून देणे आणि स्‍वतःही सत्‍संगांना वेळेवर उपस्‍थित रहाणे : ‘एकदा पू. पात्रीकरकाकांचे वर्धा जिल्‍ह्यातील साधकांसाठी मार्गदर्शन होते. तेव्‍हा काही साधक २ – ३ मिनिटे उशिरा आले. तेव्‍हा पू. काकांनी उशिरा येणार्‍या साधकांना अडचणी विचारून त्‍यांना वेळेचे महत्त्व सांगितले. तेव्‍हापासून मलाही स्‍वयंशिस्‍तीची जाणीव झाली.

पू. काकांना काही वेळा बरे नसल्‍याचे त्‍यांच्‍या आवाजावरून लक्षात येते, तरीही ते वेळेवर ‘ऑनलाईन’ सत्‍संगांना जोडतात आणि मार्गदर्शन करतात.

१२ आ. पू. पात्रीकरकाकांनी प्रीतीने साधकांना आपलेसे करणे : पू. पात्रीकरकाका साधकांच्‍या अडचणी समजून घेऊन त्‍यांना उपाय सांगतात. ते साधकांची कुवत आणि परिस्‍थिती यांनुसार त्‍यांना समजावून सांगतात. त्‍यामुळे साधकांना त्‍यांना अडचणी मनमोकळेपणाने विचारता येतात. परात्‍पर गुरुदेवांनी संत घडवले आणि त्‍या संतांनी सर्व साधकांना आपलेसे करून घेतले. त्‍यामुळे नातेवाइकांपेक्षा सनातनचे संत आणि साधक हेच अधिक जवळचे वाटतात.

गेल्‍या दीड वर्षापासून सगळीकडे कोरोना महामारी चालू आहे. अशा काळातही आम्‍हाला पू. काकांच्‍या माध्‍यमातून नियमितपणे चैतन्‍य मिळत आहे. प्रारब्‍धानुसार या महामारीचा मार बसला; पण त्‍याची भीती न वाटता आम्‍ही आनंदाने प्रारब्‍ध भोगले. यासाठी परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे. आमची कोणतीही क्षमता नसतांना केवळ पूर्वपुण्‍याईमुळे आम्‍हाला सनातन संस्‍थेमध्‍ये जीवनाचा उद्धार करण्‍याची संधी मिळाली. ‘परात्‍पर गुरुदेवांनी आमच्‍याकडून त्‍यांना अपेक्षित असे प्रयत्न करून घ्‍यावेत’, अशी त्‍यांच्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

१३. सौ. सविता भोंडे, सेलू

१३ अ. पू. पात्रीकरकाकांनी ‘घर किंवा व्‍यवसाय यातील प्रत्‍येकच कृती साधना म्‍हणून केल्‍यास त्‍याचे ओझे वाटणार नाही’, असे सांगणे : ‘आमचा शीतपेये (कोल्‍ड्रींक्‍स) विकण्‍याचा व्‍यवसाय आहे. ‘व्‍यवसायामुळे साधना नीट करता येत नाही’, असे मला नेहमी वाटायचे. एकदा पू. पात्रीकरकाका आमच्‍या घरी आले होते. तेव्‍हा माझ्‍या यजमानांनी त्‍यांना माझ्‍यामधील स्‍वभावदोषांविषयी सांगितले. तेव्‍हा पू. काका मला म्‍हणाले, ‘प्रत्‍येक गोष्‍ट साधना म्‍हणून केेली, तर त्‍याचे ओझे वाटणार नाही. मग ती घरातील सेवा असो किंवा व्‍यवसायातील गोष्‍ट असो.’

१३ आ. पू. पात्रीकरकाकांनी केलेल्‍या मार्गदर्शनानुसार प्रयत्न केल्‍यावर साधिकेला स्‍वतःमध्‍ये पालट जाणवणे आणि त्‍यानंतर यजमानांचा विरोध अल्‍प होऊन साधिकेची समष्‍टी सेवाही होऊ लागणे : त्‍यानंतर मी प्रत्‍येक गोष्‍ट साधना म्‍हणून करायला लागले. त्‍यामुळे माझ्‍या स्‍वभावात पालट होऊ लागला. माझ्‍या स्‍वभावातील पालट घरातील व्‍यक्‍तींच्‍याही लक्षात आला. पू. काकांमुळे माझी साधना नीट होऊ लागली आणि माझ्‍याकडून समष्‍टी सेवेचे प्रयत्नही भावपूर्ण व्‍हायला लागले. माझी स्‍वीकारण्‍याची आणि शिकण्‍याची वृत्ती वाढली. त्‍यानंतर माझ्‍या यजमानांचा मला साधनेसाठी असलेला विरोध न्‍यून झाला. त्‍यामुळे माझी व्‍यष्‍टी साधना आणि समष्‍टी सेवाही तळमळीने होऊ लागली.

१४. सौ. सरोज बोडनासे, गडचिरोली

१४ अ. पू. पात्रीकरकाकांनी साधिकेच्‍या मुलाला साधनेविषयी मार्गदर्शन करून नकारात्‍मक विचारांवर मात करण्‍यासाठी नामजप सांगणे, मुलात पालट झाल्‍यामुळे साधिकेची साधना सुरळीत चालू होणे : ‘मी साधनेत आल्‍यापासून पू. पात्रीकरकाकांनी मला आनंदाचा मार्ग दाखवला. त्‍यांनी माझ्‍या मुलाला त्‍याच्‍या मनात येणार्‍या नकारात्‍मक विचारांवर नामजप सांगून साधनेविषयी चांगले मार्गदर्शन केले. त्‍यामुळे त्‍याची चिडचिड न्‍यून झाली. पूर्वी आमच्‍या घराला घरपण नव्‍हते, घरी पुष्‍कळ त्रास जाणवायचा. ‘परात्‍पर गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) पू. काकांना मला मार्गदर्शन करण्‍यासाठी पाठवले’, असे मला वाटले. मी आता व्‍यष्‍टी साधना आणि समष्‍टी सेवा करू शकत आहे. ‘पू. काकांचे मार्गदर्शन ऐकतांना ‘माझे वडीलच मला मार्गदर्शन करत आहेत’, असे मला वाटते.’

१५. कु. अर्चना रामकृष्‍ण निखार, वर्धा

१५ अ. पू. पात्रीकरकाकांनी साधकांना व्‍यष्‍टी साधनेतील उदासिनता लक्षात आणून देणे, त्‍यानंतर साधकांमध्‍ये पालट जाणवणे आणि पू. पात्रीकरकाकांनी साधकांना सेवा करतांना येणार्‍या अडचणी जाणून घेऊन त्‍यावर उपाययोजना सांगणे : ‘पूर्वी साधकांचा व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात ‘मला जमेल तेवढेच करणार’, असा भाग होता. पू. पात्रीकरकाकांनी साधकांना चुकांची जाणीव करून दिल्‍यानंतर त्‍यांच्‍यात पालट जाणवत आहेत. पू. काकांनी प्रत्‍येक साधकाची स्‍थिती जाणून घेऊन त्‍यांना येणार्‍या अडचणींवर सहजतेने उपाययोजना सांगितल्‍या. यातून पू. पात्रीकरकाकांमधील ‘सहजता, साधकांविषयी असलेला प्रेमभाव आणि गुरुकार्याची तळमळ’, हे गुण मला शिकायला मिळाले. पू. काकांच्‍या केवळ आठवणीनेही मला सेवेची प्रेरणा मिळते.

१६. सौ. सौख्‍या चौधरी, वर्धा

१६ अ. साधकांचे पालकत्‍व घेणे : ‘पू. पात्रीकरकाका अतिशय निर्मळ आहेत. साधकांच्‍या चुका सांगतांना त्‍यांच्‍यात पालकत्‍वाचा भाव जागृत असतो. ते स्‍पष्‍टपणे चुका सांगून साधकांमध्‍ये भावाच्‍या स्‍तरावर गांभीर्य निर्माण करतात. त्‍यामुळे त्‍यांनी सांगितलेली चूक साधकांच्‍या अंतःकरणापर्यंत पोचते आणि ‘पुन्‍हा तशी चूक होऊ नये’, यासाठी साधकांकडून आपोआप प्रयत्न होतात.

१६ आ. पू. पात्रीकरकाकांनी साधिकेला सतत सेवेमध्‍ये ठेवणे आणि त्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनातून साधिकेला प्रेरणा मिळणे : मी आश्रमातून घरी आले. तेव्‍हा ‘आता मी सेवा कशी करणार ?’, याचा मला पुष्‍कळ ताण आला होता. मी निराशही झाले होते; पण पू. काकांच्‍या कृपेने मला सेवा मिळून माझ्‍यावर गुरुकृपेचा वर्षाव झाला. पू. काकांनी केलेल्‍या मार्गदर्शनातून मला प्रेरणा मिळाली. माझ्‍या मनातील पुढाकार घेण्‍याची भीती दूर झाली. पू. काकांनी सांगितलेले सूत्र, म्‍हणजे त्‍यांचा संकल्‍पच वाटतो.

१६ इ. परिपूर्ण कृती करण्‍याची तळमळ : एकदा सामूहिक नामजप सत्‍संगात पू. काकांना सूत्रे सांगायची होती. आम्‍ही त्‍या सत्‍संगाचा सराव करत होतो. तेव्‍हा पू. काका म्‍हणाले, ‘‘आता मीही माझा विषय घेतो, म्‍हणजे माझाही वेळेचा अभ्‍यास होईल.’’ त्‍याप्रमाणे त्‍यांनी लगेच सराव केला. यातून त्‍यांची परिपूर्ण कृती करण्‍याची तळमळ शिकायला मिळाली.’

१७. सौ. अनिता मनोहर फुसे, सिंदी (रेल्‍वे), वर्धा.

१७ अ. पू. पात्रीकरकाकांनी केलेल्‍या मार्गदर्शनामुळे साधनेची दिशा मिळणे आणि ‘त्‍यांच्‍या माध्‍यमातून गुरुदेवच सांगत आहेत’, असे वाटून भाव जागृत होणे : ‘मी प्रथम पू. पात्रीकरकाकांना पाहिल्‍यावर मला त्‍यांच्‍यात गुरुमाऊलींचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन होऊन माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. पू. काका सूत्रे सांगत असतांना माझ्‍या मनात ‘गुरुदेवच (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) सांगत आहेत’, असा विचार येऊन माझा भाव जागृत झाला. पू. काकांच्‍या मार्गदर्शनाने मला चैतन्‍य मिळून साधना करण्‍याची नवीन दिशा मिळाली. पू. काकांनी मार्गदर्शन केल्‍यानंतर माझे साधनेचे प्रयत्न वाढले, माझ्‍यातील सकारात्‍मकता वाढली, मला वाटत असलेली चुका सांगण्‍याची भीती दूर झाली आणि माझ्‍यातील मनमोकळेपणा वाढला.

१८. सौ. वंदना कलोडे, वर्धा

१८ अ. पू. पात्रीकरकाकांनी ‘परम पूज्‍य हेच साधकांसाठी देव आहेत’, असे सांगणे आणि साधिकेने देवघरात परम पूज्‍यांचे छायाचित्र ठेवल्‍यावर तिला चांगले वाटणे : ‘एकदा पू. पात्रीकरकाका आमच्‍या घरी आले होते. त्‍यांनी आमचे देवघर बघितले. त्‍यांनी सांगितले, ‘‘साधकांसाठी परम पूज्‍य देव आहेत. काही साधकांनी परम पूज्‍यांचे छायाचित्र देवघरात ठेवल्‍यावर त्‍यांना लाभ झाला आहे.’’ हे ऐकून मला पुष्‍कळ आनंद झाला. माझी पुष्‍कळ दिवसांपासून परम पूज्‍यांचे छायाचित्र देवघरात ठेवण्‍याची इच्‍छा होती; पण माझ्‍या यजमानांचा परम पूज्‍यांवर विश्‍वास नव्‍हता. त्‍यामुळे ‘यजमान काय म्‍हणतील ?’, याची मला भीती वाटायची. पू. काकांनी असे सांगितल्‍यावर मी लगेचच देवघरात परम पूज्‍यांचे छायाचित्र ठेवले. तेव्‍हा माझ्‍या यजमानांनीही काही म्‍हटले नाही. पू. काकांनी सांगितल्‍याप्रमाणे देवघरात पालट केल्‍यावर मला पुष्‍कळ चांगले वाटले.’

‘परात्‍पर गुरुमाऊलीच्‍या कृपेने आम्‍हाला पू. पात्रीकरकाका यांच्‍यासारखे प्रेमळ संत मिळाले. त्‍यांच्‍याच प्रेरणेने आम्‍ही हे लिहून देऊ शकलो, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – विदर्भातील साधक

पू. पात्रीकरकाका यांचा लेख लिहिणार्‍या विदर्भातील साधकांची काही वैशिष्‍ट्यपूर्ण आडनावे

१. कलोडे, २. खटी, ३. चमूरकर, ४. जमनारे, ५. डगवार, ६. निखार, ७. फुसे, ८. बारई, बोडनासे, ९. भोंडे, १०. थोटे, ११. वाकडे, १२. सब्राह

(समाप्‍त)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२८.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक