देहलीमध्ये होळीच्या वेळी जपानी तरुणीला बलपूर्वक रंग लावून छेडछाड !

३ मुले पोलिसांच्या कह्यात !

नवी देहली – देहलीतील पहाडगंज या भागात एका जपानी तरुणीला रंगपंचमीच्या दिवशी रंग लावत तिची छेड काडणार्‍या ३ मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. यांतील एक मुलगा अल्पवयीन आहे. या तिघांनी त्यांचा अपराध मान्य केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी भारतातून बांगलादेशात निघून गेली आहे. या संदर्भात मुलांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जपानच्या दूतावासाला सांगितले होते; मात्र त्यांच्याकडे या घटनेविषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्याने कळवले आहे. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी देहली पोलिसांना पत्र लिहून आरोपींवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ही मुलगी जपानमधून पहिल्यांदाच होळी खेळण्यासाठी भारतात आली होती आणि तिनेच छेडछाडीच्या घटनेचा व्हिडिओ ट्विटर खात्यावर पोस्ट केला होता  आणि नंतर तो काढूनही टाकला; मात्र आता हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या सणाच्या नावाखाली अशी विकृती करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ‘सण कसे साजरे करावेत’, हेही त्यांना ठाऊक नाही !