म्हादई अभयारण्यासह अन्य वनक्षेत्रात अजूनही आग

  • म्हादईची आग कर्नाटकच्या हद्दीपर्यंत पसरली !

  • आगीच्या दुर्घटनांचे तज्ञ समितीच्या माध्यमातून अन्वेषण करण्याची पर्यावरणतज्ञ केरकर यांची मागणी

म्हादई अरण्यात लागलेल्या आगीमुळे पसरलेले धुराचे लोट

पणजी, १० मार्च (वार्ता.) – राज्यात५ मार्चपासून सरकारी वनक्षेत्र, खासगी भूमी, कोमुनिदाद भूमी आणि खासगी वनक्षेत्र येथे आग लागण्याच्या एकूण ४८ घटना नोंद झालेल्या आहेत आणि यातील ४१ ठिकाणची आग विझवण्यात आली आहे, तर म्हादई अभयारण्यासह अन्य वनक्षेत्रात आग १० मार्च म्हणजे सहाव्या दिवशीही धुमसत होती. विझवलेल्या ठिकाणी आग पुन्हा लागण्याचे प्रकार घडत आहेत, त्यावरही देखरेख ठेवली जात आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. म्हादई अभयारण्यात साट्रे-पारोडा, साट्रे-सिडीचा कोंड आणि कृष्णापूर या ३ ठिकाणी, तसेच राज्यात इतरत्र शिगाव, अनमोड घाट, पोत्रे-नेत्रावळी, गुरखे आणि धारबांदोडा-उसगाव येथे एकूण ५ ठिकाणी आग धुमसत आहे. म्हादई अभयारण्यात लागलेली आग गोवा-कर्नाटक हद्दीपर्यंत भागात पसरली आहे. आग आटोक्यात न आणल्यास कर्नाटकच्या जंगलात ही आग पसरू शकते. भारतीय हवाईदलाच्या ‘एम्आय-१७’ हेलिकॉप्टरने आग विझवण्यासाठीचे साहाय्यताकार्य १० मार्च या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून चालू आहे.

वनक्षेत्रातील आगीवर देखरेख ठेवण्यासाठी वन खात्याचे शर्थीचे प्रयत्न ! – वनमंत्री विश्वजीत राणे

वनक्षेत्रातील आगीवर देखरेख ठेवण्यासाठी २४ घंटे कार्यरत असलेला नियंत्रणकक्ष चालू करण्यात आला आहे.

वनक्षेत्रात अनधिकृत प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली आहे, तसेच वन आणि अभयारण्य यांसंबंधी नियमांचे कठोरतेने पालन केले जात आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

 जैवविविधतेने नटलेल्या म्हादई अभयारण्याची मोठ्या प्रमाणावर हानी

म्हादई अभयारण्यात गेले काही दिवस घडलेल्या आगीच्या दुर्घटना या गोव्याच्या इतिहासात प्रथमच घडत आहेत. जैवविविधतेने नटलेले म्हादई अभयारण्य हे उत्तर गोव्यात २०९ चौ.कि.मी. क्षेत्रात व्यापलेले आहे. अभयारण्यामध्ये बिबटा वाघ, अस्वल, गवारेडा आणि हरिण आदी प्राणी, तसेच दुर्मिळ पक्षी आणि वनसंपदा यांचा समावेश आहे. आगीच्या दुर्घटनांमुळे अभयारण्याची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे.

ताळगाव येथे शेतातील गवताला आग

वनक्षेत्रात घडत असलेल्या आगीच्या दुर्घटना आता शहराजवळ घडू लागल्या आहेत. ताळगाव येथे १० मार्च या दिवशी दुपारी शेतातील गवताला मोठी आग लागली. अग्नीशमनदलाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. आगीमुळे दाट धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने त्याचा रस्त्यावरील वाहतूक आणि आसपासच्या लोकवस्तीवर परिणाम झाला. बांबोळी येथील गोवा विद्यापिठाच्या आवारातही सुक्या गवताला आग लागल्याची घटना घडली आहे.

म्हादई अभयारण्यातील आगीच्या दुर्घटना अन्वेषणासाठी तातडीने तज्ञांची समिती नेमा ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

केरी, १० मार्च – म्हादई अभयारण्यातील आगीच्या दुर्घटनांचे अन्वेषण करण्यासाठी तातडीने तज्ञ समिती नेमावी, अशी मागणी प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी केली आहे.

राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, ‘‘मी अभयारण्यात आग लागलेल्या ठिकाणी भेटी देऊन तेथील आगीच्या घटनांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये काहीतरी कटकारस्थान असल्याचा मला संशय आहे. हेतूपुरस्सर हे करण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी वाटते; मात्र हे पुराव्यासह सिद्ध करण्यासाठी तातडीने निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीची नेमणूक केली पाहिजे. या तज्ञ समितीमध्ये ‘बीट्स पिलानी’ शैक्षणिक संस्थेतील शास्त्रज्ञ, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील तज्ञ, वन खात्यातील अधिकारी आदींचा समावेश करावा. मला या समितीमध्ये घ्यावे, अशी माझी मागणी नाही. मी एक निसर्गप्रेमी असल्याने आणि माझे निसर्गाप्रती दायित्व असल्याने मी ही मागणी करत आहे.’’

आग प्रतिबंधक कृती दलाची स्थापना करा !

राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, ‘‘राज्यात वाढलेल्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी वन खात्याने त्वरित आग प्रतिबंधक कृती दलाची स्थापना करण्याची प्रक्रिया चालू केली पाहिजे. कृती दलाच्या सदस्यांना अग्नीशमन संचालनालयाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन वन क्षेत्रांमध्ये लागणार्‍या आगींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. सध्या वन क्षेत्रांमध्ये लागलेल्या आगी या मानवनिर्मित आहेत.’’

‘आय.सी.ए.आर्.’ गटाने साट्रे येथे दिली भेट : ‘डिहायड्रेशन’मुळे एक सदस्य पडला आजारी !

आगीनंतर काजू बागायतीला झालेल्या हानीचा आढावा घेण्यासाठी ‘आय.सी.ए.आर्.’च्या एका गटाने म्हादई अभयारण्यातील साट्रे भागाला भेट दिली. या वेळी गटातील एक सदस्य ‘डिहायड्रेशन’मुळे आजारी पडला. यानंतर हा गट माघारी आला. संबंधित सदस्याला उपचारार्थ वाळपई आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे.

आगीच्या दुर्घटनांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी – आगीच्या दुर्घटनांमुळे केवळ वनसंपदेचीच हानी होत आहे, असे नाही, तर हवेची गुणवत्ताही घटत आहे.

हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. निष्काळजीपणामुळे होणार्‍या अशा घटना टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क आणि जागरूक राहूया, अशी प्रतिक्रिया पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ट्वीट करून व्यक्त केली आहे.

नौसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे ३ दिवसांत १७ टन पाण्याची फवारणी

पणजी – राज्यात गेले काही दिवस अनेक ठिकाणी वनक्षेत्राला आग लागण्याच्या मोठ्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून भारतीय नौसेनेने आगीच्या घटनांवर देखरेख ठेवण्याबरोबरच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

भारतीय नौसेनेने ७ मार्च या दिवशी ‘डॉर्नियर’ विमानाच्या साहाय्याने आगीच्या घटनांचे सर्वेक्षण केले. नौसेनेच्या हेलिकॉप्टरने ३ दिवसांत म्हादई अभयारण्य, कोर्टाली आणि मोर्ले येथे २६ वेळा एकूण १७ टन पाण्याची फवारणी केली. जलाशयांमधून पाणी घेऊन पाण्याची वनक्षेत्रात फवारणी करण्याचे जोखमीचे काम नौसेनेने केले आहे. आग विझवण्यासाठी भारतीय वायूदलाचे ‘मी-१७’ हेलिकॉप्टरचे साहाय्य घेण्यात आले आहे.