पाथरी (जिल्हा परभणी) येथील कर्मचार्‍यावरील गुन्हा नोंद प्रकरणाची पुन्हा पडताळणी करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – पाथरी येथील नवीन आठवडा बाजारात बसण्यासाठी प्रतिमास ५ सहस्र रुपये खंडणी न दिल्यास भाजीपाला विकता येणार नाही, असे सांगून जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचार्‍याविरुद्ध खंडणी वसूल केल्याविषयी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा नोंद करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या पूर्व अनुमतीची आवश्यकता नाही. अन्वेषणाअंती न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले असून सद्यःस्थितीत गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाची १ मासाच्या आत वरिष्ठ अधिकार्‍यांद्वारे पुन्हा अन्वेषण केले जाईल. कुणावरही अन्याय केला जाणार नाही, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नात दिली.

पाथरी नगरपालिकेतील कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद करतांना सर्वाेच्च न्यायालयाने अर्निष कुमार विरुद्ध बिहार राज्य सरकार यांच्या खटल्यामधील निर्देशाप्रमाणे कारवाई केली नसल्याविषयीचे सूत्र सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केले होते. त्या वेळी फडणवीस बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाग घेतला.