गोव्यात ठिकठिकाणी आगीच्या दुर्घटना : म्हादई अभयारण्य अजूनही धुमसत आहे !

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, ९ मार्च (वार्ता.) – म्हादई अभयारण्यात लागलेली आग अजूनही धुमसत असून काणकोण, हडफडे, कारापूर, तिवरे, काले-सांगे, कल्पवाडा-उसगाव, काकोडा आणि साळगाव या ठिकाणी सुकलेल्या गवताला आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या. काही ठिकाणी गवताला लागलेली आग बागायतीत शिरल्याने बागायती खाक झाल्या आहेत. ओशेल, बार्देश येथे स्मशानभूमीजवळील जंगलातही आग पसरली आहे. बेतोडा, फोंडा येथे ८ मार्च या दिवशी डोंगराळ भागात मोठी आग लागल्यानंतर अग्नीशमन दल आणि स्थानिक यांनी ती आटोक्यात आणली. नावेलीनंतर परिसरातील सारझोरा येथील डोंगरकड्याने पेट घेतला. ८ मार्च या दिवशी मध्यरात्री ही आग विझवण्यात आली.

वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘९ मार्च या दिवशी सकाळी ८ वाजता म्हादई अभयारण्यात साट्रे, दिरोडे येथील एकूण ३ ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली. ८ मार्च या दिवशी अभयारण्यात एकूण २८ ठिकाणी लागलेल्या आगी विझवण्यात आल्या. साट्रे आणि दिरोडे या ठिकाणची आग विझवण्यासाठी ९ मार्चला सकाळी ९.१५ वाजता नौसेनेला पाचारण करण्यात आले. भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने राज्यभरात आगीच्या घटनांवर देखरेख ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.’’

राज्यात दिवसभरात २८ ठिकाणी आगीच्या दुर्घटना नोंद

राज्यात ९ मार्चला दुपारपर्यंत झरीवाडा-विठ्ठलापूर-सांखळी, बेनुर्डे-कुंकळ्ळी, बोरी-फोंडा येथील श्री सिद्धनाथ मंदिराजवळ, अनमोड घाटात दूधसागर मंदिराजवळ, नगर्से-काणकोण येथील रेल्वेस्थानकाजवळ, उसगाव येथील अळंबीची निर्मिती करणारा कारखाना आदी ठिकाणी मिळून एकूण २८ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. अनमोड घाट, शिगाव-काले, कारेमोळ-काले, पत्रे-नेत्रावळी आणि धारबांदोडा या ठिकाणच्या वनात आगीच्या दुर्घटना घडल्या.

अग्नीशमन दलाने केलेल्या शिफारसींकडे वन खात्याचे दुर्लक्ष !

अग्नीशमन दल, गोवा

वन क्षेत्रातील संभाव्य आगीचे प्रकार नियंत्रणात आणण्याच्या हेतूने वन खात्याच्या सज्जतेसाठी अग्नीशमन दलाचे तत्कालीन संचालक अशोक मेनन यांनी वर्ष २०२१ मध्ये काही शिफारसी वन खात्याला केल्या होत्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी वनक्षेत्रात भूमीगत पाण्याच्या टाक्या उभारणे, ‘बफर झोन’मध्ये पाण्याचा साठा सिद्ध करणे, आदी शिफारसी करण्यात आल्या होत्या. केंद्रशासन अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यासाठी निधी देत असल्याने कोणत्या प्रकारच्या साधनसुविधा खरेदी कराव्यात ? यावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत प्रधान मुख्य वन संरक्षकांना याविषयी अवगत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘मोटरसायकल वनरक्षक’ संकल्पना आणि ‘फायर बीटर्स’ यंत्रणा राबवण्याची सूचना करण्यात आली होती; परंतु गेल्या काही दिवसांत वनक्षेत्रात लागत असलेल्या आगीच्या दुर्घटनांवरून वन खात्याने या शिफारसींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. (याची नोंद घेऊन शासन योग्य ती कार्यवाही करेल का ? – संपादक)

आग विझवण्यासाठी ७९७ लोकांची नेमणूक ! – वनमंत्री राणे

पणजी – राज्यात आग विझवण्यासाठी ठिकठिकाणी ७९७ लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. मोले येथील वनक्षेत्रात दुर्मिळ भागात आगीसंबंधी दुर्घटना हाताळण्यासाठी ५० लोकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आग फोफावत आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय नौसेना आणि भारतीय वायू सेना वन खात्याशी समन्वय करत आहेत, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

मागील १५ दिवसांच्या आगकांडात १ कोटी ६ लाख रुपये किमतीच्या संपत्तीची हानी

(प्रतिकात्मक चित्र)

२४ घंट्यांमध्ये नोंद झालेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये सुमारे १२ लाख १७ सहस्र रुपयांची हानी झाली आहे, तसेच मागील १५ दिवस लागलेल्या आगीत १ कोटी ६ लाख रुपयांच्या संपत्तीची हानी झाली आहे, अशी माहिती अग्नीशमन केंद्राने दिली. मागील १५ दिवसांत आगीसंबंधी ८२२ दुर्घटना घडल्या.