वारेमाप भाडे आकारून प्रवाशांची केली जात होती लूट !
रत्नागिरी – शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणार्या ५० जणांवर कारवाई करण्यात आली.
रेल्वेतून येणार्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रिक्शा व्यावसायिकांकडून वारेमाप भाडे आकारून प्रवाशांची होणारी लूट थांबवण्याचे आणि त्यांना शिस्त लावण्याचे काम उपप्रादेशिक परिवहन पथकाने केले. येथील रेल्वेस्थानकासमोर मागील ८ दिवस ही पथके २४ तास कार्यरत आहेत.
शिमगोत्सवानिमित्त कोकण रेल्वेने येणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि इच्छीत ठिकाणी रिक्शाने योग्य दरात पोचण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. परिवहन विभाग रत्नागिरीकडून अधिकृत दरपत्रक, तसेच तक्रार निवारणासाठी दूरध्वनी क्रमांक याविषयीचे जनजागृती फलक रेल्वेस्थानक परिसरात लावण्यात आले आहेत.
या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंती चव्हाण आणि साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक आणि साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे, श्री जाधव आदींनी सहभाग नोंदवला.
संपादकीय भूमिकाकेवळ सणांच्या वेळी नव्हे, तर प्रत्येक वेळी अशी कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करणे जनतेला अपेक्षित ! |