पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात १ टन द्राक्षांची सजावट केलेली होती. त्यानंतर केवळ २ घंट्यांतच ती द्राक्षे मंदिरातून गायब झाली. येथे मंदिर समिती म्हणते, ‘‘द्राक्षे भाविकांनी नेली’’, तर भाविक म्हणतात, ‘‘मंदिरातील कर्मचार्यांनीच द्राक्षे नेली !’’ दिवसाढवळ्या झालेल्या प्रसंगात एवढ्या मोठ्या प्रमाणात गायब झालेली द्राक्षे कुणी नेली, हे समजत नसेल, तर याला काय म्हणावे ? असाच प्रश्न सामान्यांना पडतो.
श्रीक्षेत्र सप्तश्रृंगीगड या तीर्थक्षेत्रावरील भगवतीच्या मंदिरात चोरी होऊन दानपेटीजवळ काही नोटा जाळलेल्या अवस्थेत सापडल्या. चोरांनी ही घटना ‘सीसीटीव्ही कॅमेरा’मध्ये मुद्रित होऊ नये; म्हणून त्यावर चुना लावल्याचे समजते; परंतु याची पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केलेली नाही. येथे मंदिर प्रवेशद्वारापासून ते गाभार्यापर्यंत ४० सुरक्षारक्षक तैनात असतांना चोरी झाली आहे. ही तर अत्यंत गंभीर आणि सर्वच अंगांनी सामान्य जनतेला अनेक प्रश्न निर्माण करणारी घटना आहे. एकूणच काय तर हिंदूंची मंदिरे दिवसेंदिवस असुरक्षित होत आहेत.
महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यालाही त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने आदर्श होण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण मिळणेही आवश्यक आहे. यासाठी शाळांपासून ते कारागृहापर्यंत सर्वत्रच प्रत्येकाला धर्मशिक्षण देण्याची सोय सरकारने करायला हवी. सरकारने हे सर्व करण्यासाठी जनतेनेही जागृत होऊन त्याचा पाठपुरावा घ्यायला हवा !
– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.