आज ‘जागतिक हिंदी दिन’ आहे. त्या निमित्ताने…
हिंदीचे नाव ‘हिंद’ या पर्शियन शब्दावरून पडले आहे, ज्याचा अर्थ ‘सिंधु नदीची भूमी’ असा आहे. हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा मानली जाते. उर्दूऐवजी हिंदी ही ‘अधिकृत भाषा’ म्हणून स्वीकारणारे बिहार हे पहिले राज्य आहे. भारताच्या व्यतिरिक्त नेपाळ, पाकिस्तान आणि शेजारील देशांमध्येही हिंदी मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
हिंदी भाषेशी संबंधित काही तथ्ये
१. इंग्रजी आणि मंदारिन या भाषांनंतर हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
२. जगातील सर्वांत प्रसिद्ध ‘ऑक्सफर्ड’ शब्दकोश प्रतिवर्षी भारतीय शब्दांना स्थान देत आहे. ‘ऑक्सफर्ड’ने त्याच्या प्रतिष्ठित शब्दकोशात ‘आत्मनिर्भरता’, ‘चड्डी’, ‘बापू’, ‘सूर्यनमस्कार’, ‘आधार’, ‘नारी शक्ती’ आणि ‘चांगले’ हे शब्द समाविष्ट केले आहेत. वर्ष २०१७ मध्ये ‘ऑक्सफर्ड’मध्ये सुमारे ७० भारतीय शब्दांचा समावेश होता. त्यापैकी ३३ हून अधिक हिंदी शब्द होते.
३. फिजी हे दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक बेट आहे, जिथे हिंदीला ‘अधिकृत भाषेचा दर्जा’ देण्यात आला आहे.
४. भारताच्या व्यतिरिक्त मॉरिशस, फिलिपिन्स, नेपाळ, तिबेट, फिजी, गपाना, सुरीनाम, त्रिनिदाद आणि पाकिस्तान येथे काही पालटांसह हिंदी योग्य रित्या बोलली अन् समजली जाते.
५. हिंदीतील उच्च संशोधनासाठी भारत सरकारने वर्ष १९६३ मध्ये ‘केंद्रीय हिंदी संस्थे’ची स्थापना केली. त्याची देशभरात ८ केंद्रे आहेत.
६. आता जगातील शेकडो विद्यापिठांमध्ये हिंदी शिकवली जाते आणि जगभरातील लाखो लोक हिंदी बोलतात. अमेरिकेतील १५० हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदी शिकवली जाते.
७. जागतिक स्तरावर हिंदीचा प्रचार करण्यासाठी वर्ष १९७५ पासून ‘वर्ल्ड हिंदी कॉन्फरन्स’ या संस्थेचा प्रारंभ झाला. जागतिक स्तरावर हिंदीचा प्रचार करण्यासाठी प्रतिवर्षी १० जानेवारी या दिवशी ‘जागतिक हिंदी दिना’चे आयोजन केले जाते.
८. ११ व्या शतकाच्या प्रारंभीला गंगेच्या मैदानावर आणि पंजाबवर आक्रमण करणार्या पर्शियन भाषिक तुर्कांनी सिंधू नदीकाठी बोलल्या जाणार्या भाषेला ‘हिंदी’ हे नाव दिले. ही भाषा भारताची ‘अधिकृत भाषा’ आहे आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मान्यताप्राप्त ‘अल्पसंख्यांक भाषा’ आहे.
९. मतांच्या विभाजनामुळे हिंदी देशाची राष्ट्रभाषा होऊ शकली नाही.
(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, गोवा)