आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झळकावले फलक
मुंबई – कोकणातील लोककलेला राजाश्रय हवा. यासाठी शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. कोकणातील खेळे/नमन, जाखडी या लोककलांना अनुदान आणि कलाकार यांना मानधन मिळाले पाहिजे, या मागणीसाठी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी फलक झळकावून या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले.
कोकणच्या कलावंतांनी स्वत:च्या कलेतून जतन केलेल्या लोककला आजही रसिकांच्या मनात कायम आहेत; मात्र या लोककलांना अजूनही राजाश्रय मिळालेला नाही.
कोकणातील नमन व जाखडी या कलाप्रकारांना अनुदानाचा लाभ मिळत नाही. खेळे / नमन व जाखडी हा प्रसिध्द कलाप्रकार कोकणामध्ये प्रसिध्द असून अनेक वर्ष या कलाप्रकाराच्या माध्यमातून अनेक कलावंत आपली कला प्रदर्शित करुन मनोरंजन व प्रबोधन करण्याचे काम करत आहे. pic.twitter.com/crGj08UXAN
— Shekhar G Nikam (@ShekharGNikam99) March 8, 2023
फेब्रुवारी मासाच्या पहिल्या आठवड्यात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने पर्यटन लोककला सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक लेखक प्रकाश देशपांडे आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी लोककलेला राजाश्रय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती; मात्र अद्यापही शासनाने या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारने या लोककलांना राजाश्रय मिळवून दिला, तर खर्या अर्थाने लोककलावंतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.