उग्ररथ शांतीविधीच्‍या वेळी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांंविषयी जाणवलेली सूत्रे !

९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा उग्ररथ शांतीविधी झाला. या वेळी त्‍यांना सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित, साधक आणि नातेवाइक यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.    

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/659823.html

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. ‘विधीची सिद्धता करण्‍यासाठी रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील सनातन पाठशाळेतील साधक पुरोहित आले होते. त्‍या साधकांनी त्‍यांची ‘साधना’ म्‍हणून हा विधी केला. या साधकांमध्‍ये पुष्‍कळ भाव आहे.

२. साधक-पुरोहितांचे मंत्रोच्‍चार सुस्‍पष्‍ट असल्‍यामुळे मला त्‍या मंत्रोच्‍चारांवर एकाग्रता साधता येत होती. त्‍यामुळे प्रत्‍येक कृतीमागील शास्‍त्र, त्‍याचा अर्थ इत्‍यादी समजून घेऊन मला ती ती कृती करता येत होती.

३. समाजामध्‍ये केवळ ‘साधना’ म्‍हणून पौरोहित्‍य करणार्‍यांचे प्रमाण अत्‍यल्‍प झाले आहे. विधी करणारे पुरोहित सात्त्विक आणि साधना करणारे असतील, तर विधी भावपूर्ण होऊन विधीमध्‍ये मोठ्या प्रमाणात चैतन्‍य निर्माण होते. सनातन पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहितांमधील सेवा परिपूर्ण करण्‍याच्‍या तळमळीमुळे प्रत्‍यक्ष विधीच्‍या वेळी पुष्‍कळ चैतन्‍य निर्माण झाले होते.

४. साधक-पुरोहितांनी अतिशय सुंदर पद्धतीने विधी केल्‍यामुळे विधीच्‍या शेवटी त्‍यांना कृतज्ञतेने नमस्‍कार करतांना माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्‍या वेळी माझ्‍या डोळ्‍यांतून अश्रू येत होते.’                                                         (समाप्‍त)

– (सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.१.२०२३)

‘सर्व साधक ‘आपल्‍याच कुटुंबातील कार्यक्रम आहे’, अशा आत्‍मीयतेने विधीतील सर्व सेवा करत होते. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी आश्रमातील साधकांना असे घडवले आहे की, साधक कुटुंबभावनेने सर्व सेवा करतात.’ – (सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे (२५.१.२०२३)

सनातनच्‍या साधक-पुरोहितांनी केलेले विधी पाहून सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या नातेवाइकांनी प्रभावित होऊन दिलेले अभिप्राय !

‘कार्यक्रमाला उपस्‍थित असलेले माझे सर्व नातेवाईक हा विधी अत्‍यंत शांतपणे पहात होते. सनातनच्‍या साधक-पुरोहितांनी केलेले पौरोहित्‍य त्‍यांना फारच आवडले. नातेवाईक इतके प्रभावित झाले होते की, त्‍यांनी पुढील अभिप्राय दिले.

१. आम्‍ही अशा प्रकारचे विधी कुठेच बघितलेले नाहीत. आम्‍हाला पुष्‍कळ आनंद मिळाला. आता आम्‍हीही अशाच प्रकारचे विधी करू.

२. साधक-पुरोहित मंत्रोच्‍चारांच्‍या समवेत प्रत्‍येक विधीमागील शास्‍त्रही समजून सांगत होते. त्‍यामुळे ‘असे विधी का आणि कसे करावेत ?’, हे चांगल्‍या प्रकारे आमच्‍या लक्षात आले.’

– (सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे  (२५.१.२०२३)


देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी त्‍यांच्‍या पत्नी सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना आलेल्‍या अनुभूती

‘२ – ३ मासांपूर्वी माझे यजमान सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांची ‘उग्ररथ शांतीविधी’ करण्‍याचे ठरवले. त्‍या वेळी मी त्‍या विधीसाठी लागणार्‍या सर्व वस्‍तूंची सिद्धता करत होते. तेव्‍हा माझ्‍याकडून सतत प्रार्थना होत होती, ‘हे देवा, हा ‘उग्ररथ शांतीविधी’ निर्विघ्‍नपणे पार पडू दे आणि या शांतीविधीतून आम्‍हाला शांतता अन् स्‍थिरता लाभू दे.’

सौ. मीनल शिंदे

१. दिवसभरात थकवा न जाणवणे, ९ – १० घंटे नऊवारी साडी नेसूनही त्रास न होणे आणि आनंद मिळणे

हा विधी सकाळी ७.३० वाजता चालू होणार होता. त्‍यामुळे मला पूर्वसिद्धतेसाठी सकाळी लवकर उठावे लागले; पण मला दिवसभरात काहीच थकवा जाणवला नाही. या पूर्वी मी कधीच नऊवारी साडी नेसून विधी केले नव्‍हते; पण या विधीला मी ९ – १० घंटे नऊवारी नेसून होते. तेव्‍हा मला कसलाच त्रास झाला नाही. मला आनंद मिळत होता.

२. प्रत्‍येक साधक आपापली सेवा अचूक करण्‍याचा प्रयत्न करत होता. हे पाहून माझे मन भावूक होत होते आणि माझ्‍याकडून परात्‍पर गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) चरणी अनेक वेळा कृतज्ञता व्‍यक्‍त होत होती.

३. विधीच्‍या ठिकाणी देवीदेवता उपस्‍थित असल्‍याचे जाणवणे

श्री गणेशपूजनाच्‍या वेळी ‘प्रत्‍यक्ष गणपति माझ्‍या समोर उभा आहे’, असे मला जाणवत होते. तेव्‍हा माझे मन निर्विचार झाले होते. प्रत्‍यक्ष विधीच्‍या ठिकाणी ‘देवीदेवता उपस्‍थित आहेत’, असे मला सतत जाणवत होते.

४. वातावरणात उत्‍साह, चैतन्‍य, सकारात्‍मक ऊर्जा आणि आनंद जाणवत होता. माझे मन तृप्‍त आणि प्रसन्‍न झाल्‍यासारखे वाटत होते.

५. शांतीविधीनंतर चेहर्‍यात चांगला पालट होणे

दुसर्‍या दिवशी मी आरशात पाहिले, तर माझा चेहरा तेजस्‍वी आणि गुलाबी दिसत होता. काही दिवसांनी मी रामनाथी आश्रमात आल्‍यावर साधकही मला म्‍हणाले, ‘‘तुमच्‍या चेहर्‍यात पालट झाला आहे.’’  हे ऐकून माझ्‍याकडून गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

६. ‘विधी होऊन ९ – १० दिवस झाले, तरी त्‍या दिवशी अनुभवलेले चैतन्‍य आणि गुरुकृपा यांचा प्रभाव टिकून आहे’, असे मला जाणवले.

‘हे गुरुदेवा, ‘आमच्‍याकडून हा विधी करून घेतला’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मीनल राजेंद्र शिंदे (सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या पत्नी), फोंडा, गोवा. (२५.१.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक