‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’चा उपक्रम
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ७ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात महापुरुषांनी अनेक दैदिप्यमान परंपरा चालू केल्या आहेत. त्यापैकीच एक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा म्हणजे ‘वार्ताफलक.’ काळाच्या ओघात ही परंपरा नामशेष होतांना येथील ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’ने ही उज्ज्वल परंपरा पुन्हा चालू केली आहे. येथील अनिलनगर आणि झेंडेगल्ली परिसरातील प्रमुख चौकात ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’ या वार्ताफलकाचे अनावरण स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
‘डिजिटल’च्या युगात वाचन संस्कृती मागे पडत आहे. भ्रमणभाषचा अतीवापर होत असतांना भावी पिढी पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे वळावी, सुविचार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच सण, उत्सव यांची माहिती परिसरातील आबालवृद्धांपासून सर्वांना मिळावी, या उद्देशाने ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष नीलेश माने यांच्या संकल्पनेतून या वार्ताफलकाची उभारणी करण्यात आली.